कंधार ( दिगांबर वाघमारे )
आगामी दि. २२ जानेवारी २०२४ हा दिवस सर्वासाठी आणि विशेषतः हिंदूसाठी स्वाभिमानाचा दिवस ठरणार आहे. याची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी होणार आहे. दिवाळी झाली, असली तरी हा दिवस सर्वांनी दिवाळीप्रमाणे हर्षोउल्हासात साजरा करावा असे आवाहन संत एकनाथ महाराज यांनी केले.
येत्या दि.२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभु रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जगभरातील संत महंतांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तसेच दि. १९ फेब्रवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत.
त्या निमित्ताने लोकोत्सव समिती कंधारच्या वतीने तालुक्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कंधार शहरातील नगरेश्वर मंदीर येथे नुकतीच एक बैठक घेण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उमरज मठ संस्थांनचे मठाधिपती संत एकनाथ महाराज होते तर व्यासपीठावर बाबुराव गंजेवार, शिवा मामडे, दिनेश व्यास, श्रीमती वडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते. दि. १ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत लोकत्सव समितीच्या वतीने घरोघर संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वत्र नियोजनपूर्वक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सर्व मंदिरांवर आकर्षक रोषणाई, गावातून मिरवणुका यासारखे सामाजिक कार्यक्रम करावेत. यामधे समाजातील सर्व घटकांचा सहभाग असावा, अशा सूचना कार्यकर्त्यांना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वि. हिं. प. चे शशिकांत पाटील यांनी केले. मंदीर निर्माणापर्यंतचा इतिहास व कायदेशीर लढाईत मिळालेल्या यशाची सविस्तर माहिती अॅड. पत्की यांनी दिली. राजीव सोनटक्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाच्या अनुषंगाने माहिती दिली. या बैठकीला कंधार तालुक्यातील राजकीय, सामाजिक, व्यापारी सर्व स्तरातील नागरीक महिला भगिनी उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार अॅड. रवि केंद्रे यांनी केले.