विद्यार्थ्यांचे प्रेरणास्रोत साने गुरुजी जयंती विशेष 24 डिसेंबर 2023

 

 

जीवनातील वास्तवता लक्षात घेऊन ध्येयवादी प्रवृत्तीने कार्य करणाऱ्या व येणाऱ्या अडचणींना हसत हसत तोंड देणारा खरा ज्ञानी असतो हा सिद्धांत मला आवडतो ,वास्तवता स्वप्न,सृष्टी व हास्य रस या तिन्ही गोष्टीचे एकत्र मिश्रण म्हणजे साने गुरुजी होय. हे जीवनाचे गणित आज मला मान्य आहे. जीवनात जे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात; ते क्षणभंगुर राहतात आणि नंतर भडक होतात. परंतु ज्यावेळीही किरणे कोवळी दिसतात त्यावेळी त्याची तेज ते रम्य स्वरूप पाहून मला आनंद वाटतो. साने गुरुजींच्या प्रयत्नाने अनेक योजना, संघर्ष लढे , सभा, मिरवणुका यशस्वी झाल्या, त्यांच्या मूल्याधिष्ठित जीवन धोरणेमुळे अनेकांच्या जीवनाचे सोने झाले , आपुलकीचा, ममतेचा कर्तुत्वाचा आणि सद्भावना त्यांच्या मनात होत्या,जंगलाच्या वाटेने जात असताना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला की त्याचे पाणी पिताना केवढा आनंद होतो तसे साने गुरुजी कडे पाहिल्यानंतर अनेक लोकांना वाटत होते .जुन्यापासून बोध आणि नव्याचा शोध घेत घेत जाणारा हा मानवी जीवन प्रवाह आहे असे ते तत्त्वनिष्ठ ध्येयनिष्ठ विचारवंत साने गुरुजी होते.
मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक, स्वातंत्र्यसैनिक ,पत्रकार, समाजसेवक ,लोकशिक्षक साने गुरुजी यांची आज जयंती

*खरा तो एकची धर्म ।जगाला प्रेम अर्पावे।।* जगामध्ये हिंदू ,मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन ,ज्यू असे कितीतरी धर्म आहेत. वेगवेगळ्या धर्मामध्ये मत मतांतरे आहेत ,तेढ आहेत पण सर्वांनीच एकमेकांशी सदभावनेने प्रेमाने वागले तर मानवी जीवन सुखी होईल जगावर प्रेम करणे हाच खरा धर्म सर्वांनी मानला पाहिजे
असे आपल्याला मानवतावादी धर्म शिकविणाऱ्या साने गुरुजीचे नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड या गावी झाला. समाजातील जातीभेद ,अस्पृश्यता, अनिष्ट रूढी प्रथा परंपरा, वेडगळ समजूती यांना त्यांनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात त्यांनी सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून महाराष्ट्राचा दौरा केला. शेवटी उपोषण केले आणि त्यांच्या या कार्याला यश आले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असे त्यांनी मुक्त कंठाने पंढरपूरच्या विठ्ठलाला म्हटले.
संपूर्ण भारत जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला .मानवतावाद सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात पावलोपावली दिसतात कथा, कादंबऱ्या ,लेख ,निबंध, चरित्रे ,कविता स्फूटलेखन यांचा समावेश त्यांच्या साहित्यात आहे त्यानी संपूर्ण हयातीत 80 पुस्तके लिहिली भारताचा शोध, तीन मुले, महात्मा गौतम बुद्ध ,कर्तव्याची हाक, सुंदर पत्रे ,सुंदर कथा, स्वर्गातील माळ असे अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत त्यात *श्यामची आई* ही कादंबरी आजरामर झाली, धुळे येथील तुरुंगात त्यांना कारावासाची शिक्षा झाली ,15 महिने ते तेथे होते.

मातेबद्दल असणारे प्रेम भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई या पुस्तकात मांडलेले आहेत. पूज्य साने गुरुजी हे अतिशय मृदू संयमी व्यक्तिमत्त्वाचे होते *करी मनोरंजन जो मुलाचे। जडेल नाते प्रभुशी तयांचे* हे गुरुजीच्या जीवनाचे सार होते.भारतीय संस्कृती व हिंदू धर्मावर अतिशय प्रेम त्यांनी केले .
मोरी गाय, मोलकरीण या कादंबऱ्या अंत:करणात बसतात, :* ते नेहमी सर्वधर्मसमभावाची शिकवण देतात, समतेसाठी शिक्षण असावे असे ते नेहमी म्हणत असत, हसत खेळत शिक्षण देण्यावर त्यांचा भर होता. आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्यात दौरे काढून लोकांमधील तेढ एकमेकाविषयी असणारा द्वेष संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मनावर महात्मा गांधीजींच्या विचाराचा प्रभाव होता. म्हणून आज संपूर्ण भारतात विद्यार्थ्यांचे श्रद्धास्थान / प्रेरणास्थान म्हणून गुरुजीला ओळखले जाते,
गुरुजीचे गुरुजी अशाही त्यांना काही जण उपाधी लावतात, तसेच मातृहदयी साने गुरुजी असेही म्हटले जाते. समाजाला अंधारातून प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे कार्य जर कोणी केले असेल तर ते त्या काळात साने गुरुजींनी केले. यात तीळ मात्र शंका नाही.

निर्मळ वस्त्र परिधान करून निर्मळ मनाने मानवतावादी विचार मुखातून प्रकट करणारे एकमेव शिक्षक म्हणजेच साने गुरुजी होत . त्यांच्या साहित्यातून समाज उभा राहिला आहे. त्यांचे साहित्य दर्जेदार व मानवतावादी आहे. समाजाचे वास्तव त्यांनी त्यांच्या साहित्यात मांडलेले आहे. आई काय असते? हे त्यांनी श्यामची आई या पुस्तकातून जगाला सांगितलेले आहे।.सुसंस्कृत व्यक्तिमत्व कोट्यावधी लोकांचे प्रेरणास्त्रोत म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते .
1938 मध्ये पूर्व खानदेशात एकाएकी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक बुडाले, सर्वत्र हालाखीची परिस्थिती निर्माण झाली सर्व शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी जाऊन सभा घेतल्या ; मिरवणुका काढून कलेक्टर कचेरीवर गेले, त्यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी 1942 च्या क्रांतिपर्वात सामील झाले होते .अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष झाले, किसान कामगारांची एकजूट त्यांनी बांधली. खानदेशातील धुळे, अमळनेर हे कामगार संघटनाची प्रबळ केंद्रे उभारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे साने गुरुजीचे नाव सर्वत्र मानवतावादी व लोकशिक्षक म्हणून घेतले जाते, राष्ट्रपुरुषांच्या, देशभक्तीच्या विश्वबंधुत्वाच्या, समतेच्या ,एकात्मतेच्या अशा अनेक कविता लिहून समाजाला नि:स्वार्थी पणाचा, सदगुणांचा मांगल्याचा, जनसेवेचा, देशभक्तीचा संदेश त्यांनी सर्व समाजाला दिला.

 

भारतीय समाजाला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक पुसून काढण्याचे महान कार्य साने गुरुजींनी केले. सुंदर पत्रे मधून त्यांच्या पुतनीला सुधा हिला पत्र लिहिता लिहिता महाराष्ट्रातील सर्व मुलांना निसर्गाचे जीवनातील विविध अंगाचे दर्शन त्यांनी घडवले.
काँग्रेसचे 50 वे अधिवेशन महाराष्ट्रा तील खानदेशातील फैजपूर या गावी घेण्याचे ठरले; तेव्हा साने गुरुजींनी लोकांना प्रत्यक्ष भेटून पदयात्रा काढून लोकांना माहिती दिली. निधी जमा केला, देशभक्तीपर गीते लिहून समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण केले ,खानदेशातून अधिवेशनासाठी 45 हजार सभासद जमा झाले. असे महान कार्य त्यांनी केले, साधना साप्ताहिक काढून त्यामधून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला . विद्यार्थी मासिका मधून त्यांनी परिवर्तनवादी विचार मांडले,
साने गुरुजींच्या दृष्टीने खेळ म्हणजे निष्ठा ,सत्यता आणि स्वतःचा विकास होय ,भुजंगासन, गरुडासन, शीर्षासन हे आसने ते रोज करत असत. स्वतःचे कपडे स्वतः धुवावे, खोली झाडावी, भांडी घासावी, घरात पाणी भरावे, कोणत्याही कामाची लाज वाटणार नाही हे श्रम संस्कार त्यांनी त्या काळात मुलांना शिकविले.

 

*प्रभूची लेकरे सारी।तयाला सर्वही प्यारी। कोणांना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे ।।* असा महान संदेश त्यांनी दिला अशा विशाल विचाराचे काव्य लिहून सर्व मानव जातीला एकात्मता शिकवली. कोणी कोणाला दलित, वंचित, दीन, हीन समजू नये आपण सर्वजण एक आहोत असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. *बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो* असे स्फूर्तीदायी गीते त्यांनी गाऊन देशाला मानाचे स्थान दिले आहे,
प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे एकादी थोर स्त्री असते असे ते नेहमी म्हणत, माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतात म्हणून मातृदेवो भव असे म्हटले जाते,
आई विना दुसरे दैवत नाही *स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी*।।*अशी आई बद्दल त्यांना वाटे त्यांची आई यशोदाबाई मरण पावल्यानंतर त्यांना फार दुःख झाले त्यांनी आईची आठवण म्हणून श्यामची आई ही एक करुणामय कादंबरी लिहिली या कादंबरीवर आधारित आचार्य अत्रे यांनी चित्रपट तयार केला या चित्रपटाला राष्ट्रपती कडून सुवर्णपदक मिळाले; अनेक संस्थांमध्ये हा चित्रपट करमुक्त दाखवण्यात आला. सत्कार आणि प्रसिद्धी पासून ते नेहमी दूर राहिले साहित्यिक आचार्य अत्रे यांनी *मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी* म्हणून त्यांचा गौरव केला ,मराठीतील कोणत्याही मनोवृत्तीच्या समीक्षकांनी पूज्य साने गुरुजींच्या साहित्याची समीक्षा योग्य केली नाही. म्हणून त्यांच्या साहित्याचे मूल्य कधीच कमी होत नाही उलट जसा जसा काळ जातो तसे तसे ते जनमानसात अधिकाधिक मानाचे स्थान मिळत आहेत ,त्यांच्या विचारांना देशात सन्मानाचे स्थान आहे. आजही ते अनेक लोकांचे/समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत ,आजचा विद्यार्थी काय करीत आहे ?आजच्या काही विद्यार्थ्याचे प्रेरणास्रोत वेगवेगळे नट नटी आहेत. आताचा विद्यार्थी ज्ञानार्थी नसून परीक्षार्थी झाले आहेत ,श्रम प्रतिष्ठा कमी झाली, अनेक विद्यार्थ्यांचे सर्वत्र लाड केले जात आहेत

 

.आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात आहे,
,त्यामुळे विद्यार्थी आळशी बनले आहेत, साने गुरुजींच्या काळातला विद्यार्थी *छडी लागे छम छम । विद्या येई घमघम*असे म्हणत असत,परंतु आजचा विद्यार्थी गुरुजीलाच भीती दाखवत आहेत. कारण त्याच्या मागे बालहक्क कायदा मजबूत उभा आहे. त्यामुळे तो वडीलधाऱ्या माणसांचा कोणत्याही मान ठेवेल की नाही, अशी शंका येत आहे, सर्वजण असे नसले तरी त्यांची संख्या काही कमी नाही असे मला वाटते, आपण सर्वांनी साने गुरुजींचे विचार आत्मसात केल्यास त्यांच्या कार्याचे सार्थक झाले;असे म्हणता येईल,त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विठूमाऊली प्रतिष्ठान कडून विनम्रपणे अभिवादन

 

शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *