ऱिया आणि राज दोघेही वरचेवर म्हणजे जवळपास रोजच भेटतात .. भेटल्यावर त्यांना एकमेकांना हग करायचं असतं.. किस करायचं असतं.. त्या दोघांपैकी कोणी love you म्हटलं नाही तर त्यांना रुसायचही असतं.. आज तु मेसेजेस फार कमी केलेस.. तु मला मिस केलस का ?? मिस केलं म्हटलं, तर खरच का असा दुसऱ्याकडुन प्रश्न येतो .. दोघान्मधे भांडण होतं , नाराजी.. एकमेकांना ब्लॉक केलं जातं.. दोघांचा इगो आडवा येतो .. तो बोलत नाही तर मग मी का बोलु ?? किवा मेसेज करु ??.. असं बरच काही…
हे सगळं जेव्हा मी अवतीभवती पहाते तेव्हा जाणवतं , आपल्या आईबाबानी कुठे एकमेकांना लव्ह यु म्हटलं तरीही वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचं नातं टिकुन आहे हे फक्त आणि फक्त इंटीमसीवर. दोघान्मधे अबोल संवाद होतो.. त्यांचे अबोल संवाद हेच त्यांचं प्रेम.. अहो , टॉवेल ठेवलाय हा बाथरुममधे या एका वाक्यात किती रोमॅन्टिकपणा आहे ना..
अहो , तुम्ही आंघोळीला जाताय का ??.. पाणी काढु का ??
त्या अहो मधेच “हाय मरजावा “चं फीलींग आहे.. एकदा लाडात येउन मी सचिन ला अहो अशी हाक मारली तर तो म्हणाला , काही हवय का गं??.. कप्पाळ माझं म्हणत कामाला लागले म्हणजे आमच्यात प्रेम नाही का ?? .. तर आहे ना .. पण आई जेव्हा बाबांकडे पहाते ना तो रोमॅन्टिकपणा यात नक्कीच नाही.. ऑफीसला जाताना वरुन बाल्कनीतुन ती फक्त टाटा करते आणि त्यावेळी दोघांची झालेली नजरानजर जीवघेणी असते हे तितकच खरं..
आपल्यात इंटीमसीची कमतरता आहे हे अनेकदा जाणवतं आणि म्हणुन प्रेम अपुरं , अधुरं वाटत असेल का ??.. असा विचार सहज मनात येउन गेला आईच्या वाढदिवशी बाबानी आणलेला मोगऱ्याचा गजरा त्यांनी कितीही लपवला तरिही त्याचा सुगंध आमच्यापर्यंत पोचतोच आणि मग तो गजरा मिरवत ती जेव्हा बाबांच्या समोर येते तेव्हा मात्र love you .. डोळ्यातुन ओघळतं आणि माझ्यासारखी लेखिका ते अलवार टिपते.. आई बाबांच्या हातात चहा देताना एकमेकांच्या हाताचा झालेला स्पर्शही दोघांना मोहरुन टाकतो आणि स्पर्शाशिवाय नकळत ते एकमेकांच्या मिठीत जातात आणि त्याचक्षणी म्हणावं वाटतं , How Romantic..
…. माझे आई बाबा तरुणपणी कधीही भांडलेले मी पाहिले नाहीत पण आज दोघेही सारखेच एकमेकांवर कुरबुरी करतात आताही त्यांचं प्रेम दिसतं पण फक्त वयानुसार त्यांची व्यक्त होण्याची पध्दत बदलली आहे इतकच.. माझे बाबा आईला म्हणतात , कुंकु लहान लाव.. लावु नको म्हणत नाहीत किवा टिकली लाव असही म्हणत नाहीत आणि ती माउली आजही कपाळभर कुंकु लावते कारण तिची त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करायची ती पध्दत आहे.. गळ्यातुन कधीही मंगळसुत्र न काढणं असेल किवा हिरव्या बांगड्या कायम हातात असणं असेल .. जोडवी असतील हे अलंकार तिने लग्नात घातले ते आज पन्नास वर्षात कधीही काढले नाहीत हीच तर इंटीमसी आहे .. हेच तर प्रेम आहे.. नाहीतर वेस्टर्न कपड्यावर मंगळसुत्र सुट होत नाही म्हणुन आम्ही ते कपाटात ठेवतो आणि टिकल्या आरशाला असतात आणि अपेक्षा करतो त्याने love you म्हणावं… विचार केला आणि मन सुन्न झालं..
पतीपत्नीतील एकनिष्टता काय असते किवा असावी हे त्या इंटीमसी मधे दिसते आणि आम्ही प्रेम शोधतो on line..
बरचसं आभासी . बरचसं खोटं तरीही बाबु शोन्यावालं..बाबु शोन्याला अहोची धार नाही आणि इंटीमसीची किनारही नाही.. माझी आजी एकदा मला म्हणाली होती ,सचिन काय म्हणतेस ??.. तो काय गडी आहे का तुझा ?? .. आजही तिचे ते शब्द मला आठवतात पण आम्ही समवयस्क असल्याने एकमेकांना नावाने हाक मारतो हे तिला सांगितल्यावर ती शांतही झाली..
कधीतरी इंटीमसी जपत अहो म्हणुन पहायला हरकत नसावी ना…
सोनल गोडबोले