(अंबाजोगाई) :
दि 31 डिसेंबर 23 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ प्रमोद येवले नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाईच्या वतीने हृद्यसत्कार मंगळवारी दि 26 डिसेंबर 23 रोजी करण्यात आला.
या हद्य सत्काराच्या निमित्ताने ‘आद्यकवी मुकुंदराज मराठी अध्यासन केंद्रा’चा रितसर उद्घाटना नमतरचा हा पहिलाच उपक्रम. हे या केंद्राच्या वतीने पहिले वहिले ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ आयोजित करण्यात आले होते.या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विडंबनकार प्रभाकर साळेगावकर होते आणि सुत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक राजेसाहेब कदम यांनी केले. हे कविसंमेलन सामाजिक बांधिलकी जपणारे आणि आपुलकीचा सल्ला देणारे होते.
▪
कविसंमेलनाच्या सुरुवातीला अध्यक्ष श्री प्रभाकर साळेगावकर यांनी ‘आंधळा’ ही रचना सादर करत संवेदनशील मनाची अभिव्यक्ती सादर केली. दु:ख तर सर्वत्र आहेच.पण त्या दुख:चाही मेळ हवा. अशी भावना त्यांनी या रचनेतून व्यक्त केली.
▪
” माय मराठी गोड मधाचे मोहोळ आहे.
खडकावरती खळखळणारे ओव्होळ आहे.
वरवरच्या या रंगावरती नकोस जावू
आत गुलाबी रसरसलेली जांभळ आहे.
नवरा म्हणजे नसतो काही भलतासलता,
शिडकाव्याने विरघळणारा ढेकळ आहे. “
या सुंदर शब्दात माय मराठीचे मंगलस्तोत्र गझलकार प्रा डॉ मुकुंद राजपंखे यांनी श्रोत्यांना ऐकवले. माय मराठी भाषा प्रेमाचा एक नवाच पदर गझलकार राजपंखे सरांनी श्रोत्यांच्या हातात दिला.केवळ काही दिवसांनी असणाऱ्या ‘मराठी भाषा पंधरवाडा’ आणि महिनाभरात येऊ घातलेल्या ‘मराठी भाषा दिना’ची भावना मनात आली. याच गझलेमधून नंतर त्यांनी नवऱ्याची कोमलता पण उलगडून दाखवून दिली.दुस-या सत्रात त्यांनी “मया पातळ करु नकोस गावाकडं येत जा !” ही भावपूर्ण कविता ऐकवून उपस्थितांची मनं हेलावून टाकली.
▪ संभाजीनगरहून आलेले नवतरुण कवी ‘गणेश घुले’ यांनी बालकांना खिळवून ठेवणारी बालकविता सादर केली. मुले नाजूक आणि अनुकरणप्रीय असतात. हे त्यांनी आपल्या रचनेतून सांगितले. शिवाय आपले जगणे आणि वागणे निदान मुलांच्या बाबतीत, मुलांच्या पुढे तरी चांगले असावे. त्यांच्याशी आपला अधुनमधून तरी संवाद साधला जावा.नाही तर ती मुले मग कवितेतून असा प्रश्न उपस्थित करतात.असा एक संदेश त्यांनी आपल्या बालकवितेतून दिला.
ती कविता अशी होती…
“माणसं टाळतात एकमेकांच्या सावलीला..
तर त्याच घरात मुलगी बोलताहे बाहुलीला.
बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का,
अन् खेळण्यात एक बस जाळू का ?
टी व्हि बघून शिकलोय दगड कसा मारायचा,
हे ही शिकलोय झेंडा कसा धरायचा.
खोटी खोटी बंदुक आणि खोटे खोटे रक्त,
सत्तेलाच मारायची का आम्ही गोळी फक्त.”
▪
‘भाग्यश्री केसकर’ यांनी आपल्या रचनेतून शब्दांचे महात्म्य सांगितले.ती रचना अशी होती. शब्दात नसतात गाठी, शब्दात असतात भेटी.हे सांगत त्यांनी माहेरचेही महात्म्य वर्णन केले. ती रचना अशी होती.
“येता सासरची वाट
येतो भरून उरं
माय वाटंवर उभी
तिचे भरलेले घर…”
अंबाजोगाईचे जेष्ठ कवी ‘दिनकर जोशी’ यांनी पहिल्या फेरीत एक जुनी पण आशयगर्भ रचना सादर केली. ती नव्याने गायली.
ती म्हणजे…
” सोनियाचा पिंपळ झडू लागला. ज्ञानदेव समाधीत रडू लागला.”
दुसऱ्या फेरीत त्यांनी रामजन्मभूमीवर आधारित रचना सादर केली.
ती अशी होती…
“राख फासून माणसाची
संत तलवार घेऊन आले.
तुझे भक्त सैतान झाले
तुझ्या जन्माच्या जागेसाठी
माझे आयुष्य गहाण झाले.”
▪
परळी वैजनाथ येथील मसापचे सक्रिय सदस्य कवी ‘अरुण पवार’ यांनी आपल्या रचनेतून शासन आणि प्रशासनाला एक प्रश्न विचारला. प्रश्न उपस्थित करणारी ती रचना अशी होती…
“आजोबा गेला
पंजोबा गेला.
ती जखम लय भळभळते रं
तुम्ही लावता कुठे मलम ?
काटेरी वनात, काटेरी बनात
तुम्ही करता कुठे कलम”
■
राजेसाहेब कदम यांनी सुत्रसंचालनाचे महत्त्वाचे काम करीत आपल्या रचनेत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच केलेली एक रचना सादर केली. यात त्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण या महात्म्यास विसरत चाललोय काय ? असा प्रश्न आपल्या कवितेच्या माध्यमातून उपस्थित केला.महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे मनोगत व्यक्त करतांना राजेसाहेब कदम म्हणाले की ‘माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये. क्रपा करून पुन्हा मला त्या ठिकाणी नेऊन उभा करू नये.’
■
गुंजन पाटील यांनी आपल्या रचनेत हल्लीची नवतरुणाई गुंफली. सध्या मोबाईलचे वेड खूप वाढले आहे. त्यावर प्रकाश टाकणारी रचना त्यांनी सादर केली. म्हणून तरूणांनी त्यांच्या कवितांना दाद देतांनाच वन्स मोअरची मागणी केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
■
शब्दांकन
प्रा भगवान आमलापुरे
द्वारे कै शं गु ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी ता परळी वै
मो ९६८९०३१३२८