( 01 मार्च रोजी विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर ता.मुखेडचे विद्यमान सहसचिव गोवर्धनजी पवार गुरुजींचा 77 वा वाढदिवस. त्या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.)
गोवर्धन या शब्दाला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे.गोवर्धन पर्वत उचलने म्हणजे अशक्य काम शक्य करने व ते ही एकट्यानेच नाही तर सोबतीला सवंगडी घेवुन.असे गुणधर्म ज्यांच्या ठिकाणी असतात ते खरे गोवर्धन.अस्याच पध्दतीने ज्यांनी अत्यंत कठीण काळात संस्थेचा गोवर्धन उचलण्याचा प्रामाणीक प्रयत्न संस्थेतील सहका-यांना घेवुन केला ते म्हणजे संस्थेचे सन्मानीय सहसचिव गोवर्धन पवार सर होत.
गुरूजींचा जन्म वर्ताळा तांडा ता. मुखेड जि.नांदेड येथे माता सोनाबाई व पिता श्यामा नाईक यांच्या पोटी झाला.घरात शिक्षणाची परंपरा नव्हतीच.उलट अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आजूबाजूला वातावरण होते.अज्ञान सर्वत्र बोकाळले होते.अस्या काळात शिक्षणाची म्हणावी तशी सोय नसल्यामुळे शिक्षणाचा श्रीगणेशा वर्ताळा येथे होनाजी पाटील जायभाये यांच्या वाड्यात कर्मवीर किशनराव राठोड यांच्या खाजगी शिकवणी वर्गात केला.त्यानंतर घरापासून दुर अंतरावर शेळकेवाडी येथे कर्मवीराची आजी सूरत्याबाई पाठीवर आवाळु असताना शाळेत नेवुन दाखल करत होती.नंतर घरापासून १०कि.मी.अंतरावर मोहिद्दीन खान पठाण यांच्या खाजगी शाळेत तिसरी पर्यंतचे शिक्षण घेतले.त्यानंतर केंद्रीय प्राथमिक शाळा मुखेड येथे पुन्हा तिस-या इयत्तेत प्रवेश घेतला सोबत दलितमित्र गोविंदराव राठोड यांना चौथ्या वर्गात याच शाळेत दाखल केले.त्यावेळी त्यांना तुकाराम पंत नाईक, गोविंदराव पंत यांनी शिक्षणाचे धडे दिले.
त्यांच्याप्रती कृतज्ञता आजही ते व्यक्त करतात.तदनंतर परिसरात कर्मवीर किशनराव राठोड यांना बंजारा समाजाचा पुनु जाधव हा माधुकरी मागत असताना दिसला.त्यांची ही अवस्था बघुन कर्मवीराने मुखेड येथे नेहरू वसतिगृह सुरु केले होते. त्याचा फायदा घेत तिसरी ते सहावी पर्यंतचे शिक्षण घेतले.त्यांच्या आयुष्यात कै.कर्मवीर किशनराव राठोड साहेब यांचे मोठे योगदान राहीले आहे.त्यांच्या सहकार्यातून पुढील शिक्षण पूर्ण केले.सन १९५६ ते १९५९ पर्यंत तेथेच शिक्षण घेतले. कर्मवीर किशनराव राठोड यांची आई कै.गंगाबाई मक्काजी नाईक ह्या सरांच्या आत्या होत्या तर कै.मक्काजी नाईक हे पवार गुरुजींचे मामा होते.१९६६ ला सेवादास माध्यमिक विद्यालयातून त्यांनी सातवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले.घरच्या गरिबीमुळे पदवीच्या बी.ए.द्वितीय वर्षा पर्यंतचे शिक्षण त्यांना घेता आले. त्यावरच नोकरी मिळाली तर त्यानंतर त्यांनी साहित्य सूधाकर ही परीक्षा उत्तीर्ण केली. ही परीक्षा पदवीला समकक्ष समजली जात असे म्हणून नोकरी प्राप्त झाली. सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक पदासाठी मुलाखत दिली.
पहिल्याच मुलाखतीत त्यांची निवड होवुन जिल्हा परिषद वाई (बाजार)ता.किनवट येथे शिक्षक म्हणून रुजू झाले परंतू नंतर कर्मवीर किशनराव राठोड व कै.आ. गोविंदराव राठोड साहेब यांच्या आग्रहावरून व काही मित्र मुख्या.ना.सो.चव्हाण, कै.वसंतराव चिलर्गे,कै.माधवराव डावकरे,शेषेराव डावकरे,म.का.कंधारे,कै.चंद्रकांत भारदे,कै.गंगाधर कारभारी यांनी आग्रह केल्यामुळे व संस्थेने वेळेत इथेच राहावे म्हणुन कागदपत्र न दिल्यामुळे वाई येथे सरकारी नोकरीवर रूजू होता आले नाही. विमुक्त जाती सेवा समिती संचलीत आश्रम शाळा वसंतनगर ता.मुखेड येथे मुख्याध्यापक म्हणुन ०१ डिसेंबर १९६६ रोजी रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९७३ पर्यंत म्हणजे सलग ०९ वर्षे हे पद सांभाळले.पोस्ट बेसिक आश्रम शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून ही दोन वर्षे काम केले. मुख्याध्यापक हे पद संस्था व शिक्षक, पालक, विद्यार्थी यातील दुवा आहे. विशेषत्वाने संस्थाचालक व शिक्षक यातील दुवा आहे. बरेच मुख्याध्यापक स्वतःचे पद टीकवीण्यासाठी वा अन्य स्वार्थासाठी सतत सहकाऱ्यांचे शोषण करतात पण पवार गुरुजींनी संस्था व शिक्षक यातील समन्वय ढळू दिला नाही. एवढेच नाही तर आधी शिक्षकाला प्राधान्य व नंतर संस्थेला प्राधान्य असे कार्य केले.
आज ही संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या सूख दुखात सतत सहभागी होतात.आमच्या महाविध्यालयातील कर्मचारी प्रमोशनसाठी असो की अन्य बाबी असो ते आवर्जून उपस्थित राहतात.वसंतनगर संकुलात आज जून्या पीढीतील ते एकमेव व्यक्तिमत्व आहेत ज्यांना येथील प्रत्येक बाबींची सांगोपांग माहिती आहे.पण याचा अर्थ त्यांनी संस्थेचे अहित होईल असे कधी वागल्याचे आठवत नाही.उलट ‘एकमेका साह्य करू l अवघे धरू सुपंथ ll या पद्धतीनेच कार्य करतात.ते १९७५ पासून पुढे सेवानिवृत्ती पर्यंत याच शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून व हिंदी या विषयाचे अभ्यासू अध्यापक म्हणून कार्य केले.मी २००७ ते २०१२ पर्यंत ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथे व त्या पुर्वी विद्यानिकेतन (पब्लिक स्कुल )कमळेवाडी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी मला खूप सहकार्य केले.कार्य करण्यासाठी बळ दिले.आज आम्हाला ते पुत्रवत प्रेम देतात.आमच्यासाठी त्यांचे प्रेमच मोठी संपत्ती आहे.
त्यांनी जसे एक कुशल प्रशासक म्हणून एक विद्यार्थी प्रिय अध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. तसाच नावलौकिक आश्रम शाळा संघटनेतील कार्यातून ही प्राप्त केला.त्यांनी स्वखर्चाने डी.एड.प्रशिक्षण घेतले होते.ते घेताना काय काय अडचणी येतात याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. आपल्यासारखेच अनेक कर्मचारी आर्थिक बाबतीत नडलेले असावेत म्हणून त्यांच्यासाठी दि.०१ जानेवारी १९७२ रोजी एक शिक्षक कृती समिती गठित केली. त्याचा कार्यभार श्री संग्राम मस्कले गुरुजींकडे होता.मस्कले गुरूजींनी पवार गूरुजींचे गुण हेरुन त्यांना संघटनेत स्थान दिले. त्यात गुरूजी ही सक्रीय राहीले. तेंव्हापासून ते सेवानिवृत्ती पर्यंत ते या संघटनेत कार्यरत राहिले. या माध्यमातून त्यांनी शासनाकडे अनेक अडचणी सादर केल्या.माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक साहेबांकडे ते मुखेडला आले असताना एक निवेदन देऊन आपल्या अडचणी सादर केल्या.त्याचे फळ म्हणून १९७७ ला महाराष्ट्र शासनाने पत्राद्वारे प्रशिक्षण योजना मंजूर केली.
त्यामुळे सर्व अप्रशिक्षित शिक्षकांचा प्रश्न सुटला.त्याबरोबरच गुरुजींनी संघटनेतर्फे शासनाकडे निवेदने पाठवून मागणी चालू ठेवली. त्याच बरोबर १९७९ मध्ये महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळा शिक्षकांना ०१ एप्रील १९७६ ऐवजी ०१ जून १९७९ पासून भोळे वेतनश्रेणी लागू केली. याविरुद्ध लढा देणे याकरिता दि ०७ डिसेंबर १९८० रोजी परळी येथे महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर संघ स्थापन करण्यात आला.त्यावेळी औरंगाबाद विभागाचे अध्यक्षपदी
गोवर्धन पवार गुरुजींची निवड एकमुखाने करण्यात आली.नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे जाऊन मागणी दिन, निषेध दिन, शाळा तपासणी असहकार दिन,काळ्या फिती लावून काम करणे, साखळी उपोषण इत्यादी कार्यक्रम संघटनेतर्फे राबविले गेले. दि.०२ नोव्हेंबर १९८१ रोजी संघटनेच्या वतीने नांदेड येथे भोळे वेतन श्रेणी ०१ एप्रिल १९७६ पासून लागू करण्यासाठी जे आमरण उपोषण केले त्यात गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. गुरूजी हे केवळ आदेश देणारे नव्हते तर ते ‘आधी केले मग सांगितले’ असे वागत आले.गुरुजींनी शिक्षकांना या बाबतीतला न्याय देण्यासाठी सतत ०७ दिवस उपोषण केले. उपोषणाने प्रकृती अत्यंत गंभीर बनली तरीही धीर न सोडता उपोषण चालूच ठेवले व न्याय मिळवून घेतला.
या कामी त्यांच्या सोबत उपोषणासाठी म.का.कंधारे व केशव कुंडगीर हे ही सहभागी होते.पुणे येथे ही त्यांनी वरील सहका-यांसोबत समाज कल्याण संचलनालया समोर न्याय हक्कासाठी उपोषण केले. संघटनेतील अंतर्गत व्यवस्थापन सांभाळण्याचे काम ते सतत करत राहिले.कधीकधी संघटनेचे काम करत आहेत म्हणून त्यांच्याविरुद्ध संस्थाचालकांकडे तक्रारवजा सांगावे पाठविले गेले, पण गुरुजींनी संघटनेच्या कामातून माघार घेतली नाही व संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड व तत्कालीन सचिव कै.आ.गोविंदराव राठोड यांनीही त्यांना संघटनेच्या कामातून माघार घ्यावी असे निर्देश दिले नाहीत. संस्थाचालकांचे उलट अशा न्याय मागण्यासाठी त्यांना बळच मिळत गेले. याबध्दल ते नेहमी सांगतात. मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या ५४ व्या वाढदिवसा दिवशी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून आश्रम शाळा कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करून घेतला व भोळे वेतनश्रेणी लागू केली. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केवळ शिक्षक मुख्याध्यापक संघटनेचे नेते म्हणून काम केले नाही तर विमुक्त जाती सेवा समिती वसंत नगर ता.मुखेड या शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणूनही आजतागायत उत्तम काम करताहेत. त्यांचे वर्तन पाहिले की कै.आ.गोविंदरावजी राठोड साहेबांची आठवण येते. ते ही कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात हिरीरीने सहभागी व्हायचे. तीच परंपरा सहसचिव साहेबांकडे दिसते.ते स्वतः संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड साहेबांचे ज्येष्ठ जावई आहेत.पण या मोठेपणाचा त्यांनी कधी गैरफायदा घेतल्याचे त्यांच्याकडून मागील २७ वर्षांच्या माझ्या सेवेत कधीच मी पाहिले नाही. स्वतः होवुन नमस्कार करणारा हा अत्यंत विनयशील माणुस आहे.हे आमचे भाग्यच आहे.शाळा महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमात किंवा जास्तीत जास्त चांगले करा व शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून संस्था व परिसरातील समाज मोठा बनविण्याचा प्रयत्न करा असा त्यांचा नेहमीच आम्हाला सल्ला असतो.त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडविले आहेत.
यात ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेडचे विद्यमान प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, हिंदी विभागाचे प्रा.डॉ.व्यंकट चव्हाण,तत्वज्ञान विभागप्रमुख प्रा.डॉ. सखाराम गोरे,यशवंत महाविद्यालय नांदेड येथील सेवानिवृत्त प्रा.डॉ.विभुते,प्राचार्य विश्वनाथ राठोड,उपशिक्षणाधिकारी मोतीराम राठोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव राठोड, मुख्या.गोविंद पवार, उल्हासनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी मंडके,पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील प्रा.डॉ.किशन बुध्देवाड,मुख्या.उल्हास पवार, सौ.ज्योती उल्हास पवार, डॉ.व्यंकट रामचंद्र राठोड,डॉ. दिनेश रामचंद्र राठोड अशी कितीतरी नावे सांगता येतील.शिक्षक पतसंस्थेची सुरुवातही त्यांनी केवळ १७ सभासदांवर केली होती. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. जिनिंग-प्रेसिंग कमळेवाडीचे ते सदस्य राहिले आहेत.
त्यांनी राजकारणातही योगदान दिले आहे. राठोड परिवाराच्या राजकारणात ते सक्रिय असतात. कोटग्याळ ग्रामपंचायतीचे मागील १० वर्षे ते सदस्य म्हणून कार्यरत होते. तसेच मागच्या ०५ वर्षात त्यांच्या सुविद्य पत्नी यशोदाबाई या सरपंच होत्या. त्यांनी तांडा विकास सुधारणेची अनेक कामे घेतली आहेत.वसंतनगर, लोभा नाईक तांडा, कोटग्याळ तांडा येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे.
राजकारणाबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.ते संवेदनशील मनाचे आहेत. त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक कविता प्रकाशनासाठी वाट पाहत आहेत.आशयपुर्ण कविता ते करतात.त्यांना वाचनाचा छंद असून ग्रामीण महाविद्यालयाच्या वाचनालयात मोकळा वेळ मिळाला की ते बसलेले दिसतात. त्यांच्या हातात सतत नवनवे ग्रंथ पाहावयास मिळतात.ते एक उत्तम श्रोते आहेत. त्यांनी आपल्या तांड्यावर गणेशोत्सवात विविध व्याख्याने घेतली आहेत ज्यात माझे स्वताचे ,माजी प्राचार्य डॉ. देविदास केंद्रे,प्रा.शंकर राठोड व अन्य मान्यवरांची व्याख्याने आणि प्रबोधनाचे कार्यक्रम वेळो वेळी घेतले आहेत.ज्ञानपिपासू असं हे व्यक्तिमत्त्व आहे.
यशस्वी पालक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.कारण त्यांनी सर्वच मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले आहे.त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रकाश पवार माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक होते आता उपमुख्याध्यापक आहेत,दुसरा मुलगा हरिदास प्राथमिक शिक्षक आहे,कन्या सुनीताताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड येथे प्राचार्य आहेत, बाळासाहेब नावाचा मुलगा वैद्यकीय अधिकारी आहे, दुसरी कन्या बबिता राठोड ही बारावी उत्तीर्ण आहे. अशाप्रकारे सर्वच मुलांना त्यांनी ज्ञानाचा तिसरा डोळा प्रदान केला आहे.ज्याद्वारे त्यांच्या पायावर ते उभे आहेत. या दृष्टीने देखील गोवर्धन पवार हे अत्यंत समाधानी आहेत.गुरुजी सेवानिवृत्तीनंतर जसी संस्थेची कामे पाहतात तसेच शेतीची कामे ही पाहतात. त्यांचे शेतीकडेही विशेष लक्ष आहे.उरलेला वेळ कुठेतरी फिरत बसण्यात न घालवता शेतीत घालवतात. त्यांना खेळाची आवड सुरुवातीपासूनच आहे. हॉलीबॉल या खेळातील त्यांनी अनेक पारितोषिकं त्या काळात मिळविली होती. आजही त्यांना खेळ आवडतात.
त्यांच्या या सर्व यशाच्या पाठीमागे खरे तर त्यांच्या सुविद्य पत्नी यशोदाबाईचे खूप मोठे योगदान आहे. संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड यांच्या त्या जेष्ठ सुकन्या आहेत पण त्यांच्याकडे मोठेपणाचा आव नाही.त्या अत्यंत विनयशील,सुसंस्कारित,कुशल गृहिणी आहेत.पवार गुरुजींच्या या सर्व पातळ्यांवरील कामाला त्यांची सततची प्रेरणा असते. त्यांची प्रेरणा नसती तर गुरुजी एवढे काम करू शकले नसते हे सत्य आहे.
दोन वर्षापुर्वी त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस संस्था व ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला गेला होता.या वेळी त्यांच्या कार्य कृतत्वावर वृत्तपत्र पुरवणी काढली होती.तसेच महाराष्ट्रातील नामवंत वक्ते,प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डाॅ.सोमनाथ रोडे सरांचे व्याख्यान आयोजित केले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड साहेब हे उपस्थित होते. त्यावेळी गुरूजींचा सपत्नीक सत्कार ही संपन्न करण्यात आला.आज 77 व्या वाढदिवसासाठी गुरुजींचे कौतुक करायला कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब नाहीत याची प्रकर्षाने उणिव जाणवते आहे.
आज ही वयाच्या 77 व्या वर्षात ते संस्थेचे वर्तमान सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड साहेब यांच्यासी सतत सल्ला मसलत करून संस्थेला पुढे घेवुन जाण्याचे काम ते प्रामाणीकपणे करत आहेत.संस्थेने जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती जबाबदारी कुठले ही आडे वेडे न घेता पार आज ही आम्ही पाहतो आहोत. या विभागाचे आमदार डाॅ.तुषार राठोड साहेबांवर ही त्यांचे नितांत प्रेम आहे. तसेच या दोन्ही ही बंधुचे गुरुजींवर प्रेम आहे.ते त्यांना भावजी या आदरार्थी नावाने संबोधतात व नेहमी सन्मान देतात.यातुन गुरुजींनी पुढच्या पिढीसी जपलेले नाते संबंध लक्षात येतात.
गोवर्धन पवार गुरुजींना या 77 व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना असेच उत्तरोत्तर कार्य करण्यासाठी दीर्घायुरारोग्य लाभो. अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून. मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.
प्रा.डॉ. रामकृष्ण बदने ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर,
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी – ९४२३४३७२१५