एमसीएमसी समितीची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील माध्‍यम कक्षात

 

नांदेड दि. 2 – जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली काम करणा-या माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण (एमसीएमसी ) समितीची बैठक सोमवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील माध्‍यम कक्षात पार पडली. उमेदवारी निश्चित झाल्‍यानंतर प्रमाणिकरण व संनियंत्रण कार्यामध्‍ये गती देण्‍यात यावी, असे निर्देश यावेळी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिले.

 

यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाये, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्‍वास वाघमारे, वरिष्‍ठ पत्रकार राजेश निस्‍ताने, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे, सायबर सेलचे प्रतिनिधी तसेच मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्‍यांची उपस्थिती यावेळी होती.

 

सारखा मजकूर, एकाच सभेचे सारखे वृत्‍तांकन, उमेदवारांच्‍या विजयी निश्चितीचे दावे, जनतेचे पाठबळ मिळत असल्‍याचे दावे तशा पध्‍दतीचे वाक्‍य वापरुन पेरण्‍यात येणा-या वृत्‍तांची दखल घेण्‍यात यावी. तसेच जाहिरातीच्‍या दरानुसार उमेदवारांच्‍या खर्चामध्‍ये त्‍यांची नोंद करण्‍यात यावी तशी माहिती खर्च विभागाला देण्‍यात यावी. तसेच रेडीओवर येणा-या जाहिरातीचीही नोंद घेण्‍याचे यावेळी समितीने निश्चित केले.

 

माध्‍यमांना तसेच राजकीय पक्षांना याबाबतची माहिती देण्‍यात आली आहे. तथापि, वारंवार याबाबत माध्‍यमांना अवगत करण्‍यात यावे, असेही यावेळी समिती सदस्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सोशल माध्‍यमांच्‍या रोजच्‍या शंभरावर खात्‍याची तपासणी होत असल्‍याची माहिती यावेळी सायबर सेलमार्फत देण्‍यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *