चिमुकल्यांनी आपल्या आईवडिलांना धाडले पत्र  : मतदान करण्यासाठी पत्राद्वारे केले आवाहन 

नांदेड – केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड लोकसभा मतदारसंघातर्गत जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात आली. यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना मतदान करण्यासाठी आवाहन करणारे पत्र लिहिले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष चांदू झिंझाडे, हैदर शेख, मनिषा गच्चे, पांडुरंग गच्चे, कविता गोडबोले, इंदिरा पांचाळ, हरिदास पांचाळ, मारोती चक्रधर, आनंदा गोडबोले आदींची उपस्थिती होती.
             जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती सुरू आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावखेड्यासह शहरातील 
भाजीपाला मार्केट, शाळा महाविद्यालये,
 वृत्तपत्र विक्रेते, डाॅक्टर, बसस्थानक, मंजूर वर्ग, रेल्वेस्थानक, दवाखाने आदी ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. शालेय मतदान जागृती मंचाच्या वतीने तीन टप्प्यांत पत्रलेखन कार्यक्रम घेण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात किरण कदम, मयुरी गोडबोले, सोनल गोडबोले, सुप्रिया गच्चे, तेजल शिखरे, गितांजली गोडबोले, शाहेद शेख, अनन्या टिमके, राजवर्धन गवारे यांनी सहभाग घेतला. हे पत्र मिळताच आईवडिलांनी मतदान करायचेच आहे परंतु आपल्या नातेवाईकांनाही आवाहन करायचे आहे असे या उपक्रमाचे स्वरूप असल्याचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी सांगितले.
            काय लिहिले आहे पत्रात?
          आपणास ठाऊक आहेच की, आपल्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीद्वारे आपल्याला पुढील पाच वर्षांसाठी आपल्या मनातले सरकार निवडण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. भारतीय लोकशाहीने १८ वर्षे वयोगटावरील प्रत्येक नागरिकाला कायद्याने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आईबाबा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आपला हा मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. कारण सर्व नागरिकांनी आपले मतदान कर्तव्य पार पाडले तरच संविधानाला अभिप्रेत लोकशाही खऱ्या अर्थाने स्थापित होऊ शकेल. त्यामुळे तुम्ही निवडणूकीच्या दिवशी आपली इतर कामे बाजूला ठेवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावावे व नागरिक म्हणून आपला संवैधानिक हक्क बजावावा हा माझा तुम्हाला आग्रह आहे. माझे आईबाबा एक सजग नागरिक आहेत, ते नक्कीच आपला मतदानाचा हक्क बजावतील यांची मला खात्री आहे.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *