मुखेड:( दादाराव आगलावे)
परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने, चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक अंतर्गत श्री स्वामी समर्थ विजयरथाचे रविवारी सकाळी दहा वाजता मुखेड येथील नागेंद्र मंदिर येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात आगमन झाले. सकाळी साडेदहाच्या नैवेद्य आरतीनंतर पादुका पूजनाची सुरुवात झाली.
सायंकाळी पाच वाजता धान्य पूजन संपन्न झाले. यावेळी दिंडोरी येथील बालाजी पौळ-शास्त्री यांनी पादुका पूजनाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, पादुका पूजनाने कुलदैवताचा कोप नाहीसा होतो, पित्र दोष नाहीसे होतात. घरात सुख शांती लाभते. पती-पत्नी मधील वाद नाहीसे होऊन संसार सुखी होतात. पूजनानंतर पादुका डोक्यावर ठेवल्याने सर्व व्याधीचे निवारण होते. शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकली जाऊन शरीरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
वेदांत, पुराणात, स्वामी चरित्रात, गुरुचरित्रात या पादुका पूजनांचे महत्त्व वर्णन केले असल्याचेही त्यांनी सांगितले. धान्य पूजनाचे फायदे सांगताना बालाजी शास्त्री म्हणाले की, नव धान्य अभिषेकाने नवगृह आणि 27 नक्षत्राची शांती होऊन त्यांची कृपादृष्टी लाभते. कुंडली मधील दोष नाहीसे होतात. कालसर्प, शांती, मंगळदोष नाहीसे होऊन अडलेली कामे मार्गी लागतात. विवाह कार्य, आर्थिक स्थिती व व्यसनमुक्ती इत्यादीसाठी धान्य पूजन अत्यंत फायदेशीर असल्याचेही शास्त्री यांनी यावेळी सेवेक-यां प्रबोधन करताना सांगितले.
यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) मुखेड केंद्र प्रतिनिधी शंकर पांचाळ, भास्करराव पोतदार, प्रवीण चव्हाण, मुकेश तमशेट्टे, चंद्रकांत एकलारे यांच्यासह असंख्य सेवेकरी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायंकाळच्या सहाच्या आरतीनंतर पादुका विजय रथाचे प्रयाण नांदेड कडे झाले. तब्बल बारा वर्षानंतर विजयरथ मुखेड मध्ये आल्याने असंख्य भक्तांनी पादुका पूजन व धान्य पूजन केले. अनेक भक्तांनी पादुका दर्शन घेतले.