खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विजयानंतर रडगाणे ऐकायला नको यासाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी विरोधकांनी यावेळी ईव्हीएम हॅक झाले की नाही हे आधीच स्पष्ट करावे असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
ज्या ज्या वेळी भाजपाचा विजय होतो त्या त्यावेळी विरोधक ईव्हीएम हॅक झाले म्हणून ओरड करत असतात. पण जेव्हा भाजपचा पराभव होतो त्यावेळी मात्र ईव्हीएम बद्दल कोणीही शंका घेत नाही. हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे दिलीप ठाकूर यांनी जनतेच्या वतीने विरोधकांना प्रश्न केलेले आहेत.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिलीप ठाकूर यांनी असे पुढे असे म्हटले आहे की,१९८५ पासून ते स्वतः निवडणूक यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी स्वतःची नोकरी धोक्यात घालून ईव्हीएम मध्ये बदल करण्यासाठी संमती देणे शक्य नाही. जर तसे असते तर कोणतेही सत्ताधारी सरकार पडलेच नसते.
निवडणूक आयोगाने वेळोवेळी ईव्हीएम हॅक होत असेल तर राजकीय पक्षांनी पुरावे द्यावे असे सुचित केले होते. पण आतापर्यंत एकही पक्षाने पुरावा दिलेला नाही. निकालानंतर ईव्हीएम हॅक झाले असे म्हणणे म्हणजे ” नाचता येईना अंगण वाकडे “असे होते. या निवडणुकीत देखील नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी होणार आहेत यात कोणती शंका नाही.
त्यामुळे निकाला आधीच विरोधकांनी यावेळी ईव्हीएम हॅक झाले की नाही ते स्पष्ट करावे. निकालानंतर भाष्य केल्यास ते हास्यास्पद होईल असे दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.