लातूर, : येथील लातूर कृषि महाविद्यालयाच्या 4 एकर जागेवर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने मियावाकी स्वरुपाचे जंगल साकारले जाणार आहे. पर्यावरण दिनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या उपक्रमास प्रारंभ झाला.
कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिव्याख्याता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.
कृषि महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषि महाविद्यालयाने संयुक्त उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत 4 एकर जागेवर सुमारे 48 हजार झाडे लावली जाणार आहेत. मियावाकी पद्धतीने साकारण्यात येणाऱ्या या जंगलात प्रति चौरस मीटरमध्ये 3 वृक्ष लावले जातील. यामध्ये विविध 500 प्रजातींच्या वृक्षांचा समावेश राहील. या कामाला पर्यावरण दिनापासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 1 एकर परिसरात वृक्षारोपणाची पूर्वतयारी करण्यात आली आहे. याठिकाणी सुमारे 12 हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषि महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी मुलींचे वसतिगृह परिसरातही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कृषि महाविद्यालयाने वृक्ष लागवडीचा अभिनव पॅटर्न निर्माण करावा : जिल्हाधिकारी
कृषि महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे नाते थेट निसर्गाशी जोडलेले असते. शेतीशी निगडीत असणारा अभ्यास हा निसर्गाशी निगडीत असतो. कोणत्या वृक्षाची वाढ कशी होईल, कोणत्या जमिनीवर कोणते झाड जगेल, याबाबत कृषि विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक चांगली माहिती असते. त्यामुळे कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनव संकल्पना वापरून, अभ्यासाचा उपयोग करून महाविद्यालय परिसरातील, वसतिगृह परिसरातील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी. यामाध्यमातून वृक्ष लागवडीचा अभिनव पॅटर्न निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विद्यार्थ्यांसाठी संवाद साधताना केले.
एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम राबवावा : मुख्य कार्यकारी अधिकारी
लातूर कृषि महाविद्यालयात शिकणाऱ्या विशेषतः येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीमध्ये पुढाकार घ्यावा. महाविद्यालयाने एक विद्यार्थी-एक वृक्ष मोहीम राबवून वृक्ष लागवडीला प्रोत्साहन द्यावे. वृक्ष संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करावे. वसतिगृह परिसरातील वृक्ष लागवडीची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेवून आपल्या शिक्षणाच्या काळात या वृक्षाची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
*****
Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department