जुन्या आठवणींना उजाळा देत नांदेड येथे स्नेहसंमेलन

 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या शासकीय विद्यानिकेतन, छत्रपती संभाजीनगर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध हे दोन दिवसाचे स्नेहसंमेलन नांदेड येथे उत्साहात संपन्न झाले असून वीस ते सत्तर वर्षापर्यंतच्या २०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये होत असलेल्या दैनंदिन कार्यक्रमाची पुन्हा एकदा उजळणी करून विविध खेळामध्ये सहभाग घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे स्नेहसंमेलन अतिशय संस्मरणीय झाले.

चौथीच्या परीक्षेत मराठवाड्यात गुणवत्ता यादीत आलेल्या ग्रामीण भागातील पहिल्या तीस विद्यार्थ्यांना शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगर या निवासी शाळेत प्रवेश दिला जातो. सहा वर्षात उत्तम संस्कारीत झालेल्यांमध्ये अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस आहेत.

विद्यानिकेतनचे विद्यार्थी प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, सामाजिक, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकारिता, कृषी क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. आठ व नऊ जून रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे ऋणानुबंध या स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन गुरुवर्य मानसिंगराव पाटील यांच्या हस्ते झाले,

स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सेल्स टॅक्स कमिशनर अशोक व्हटवर, गुरुवर्य
एच.आर. लहाने यांच्यासह संयोजन समितीचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर, सचिव प्रदीप लोखंडे, कोषाध्यक्ष प्रमोद हिबारे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथींसह उपस्थित सर्व शालेय बांधवांना शाल, सिरोपाव, स्वागत माळा, प्रत्येकाचे नाव लिहिलेले स्मृती चिन्ह, शालेय आठवणीची कादंबरी, आकर्षक ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ॲड. ठाकूर यांनी स्नेहसंमेलन घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. यावेळी मार्गदर्शन करताना पाटील सरांनी असे सांगितले की,लहान वयात मुलांवर झालेले संस्कार आयुष्यभर स्मरणात राहतात. मुलांच्या जडघडणीत शिक्षकांचा वाटा खूप मोठा असल्यामुळे शिक्षकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर डॉ. पुंडे यांनी आपल्या मनोगतात विद्यानिकेतन शाळेने व शिक्षकांनी कसे घडविले हे स्पष्ट केले. जे स्वतःसोबत समाजासाठी जगतात तेच खरे शिक्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अशोक व्हटकर यांनी माजी प्राचार्य वि . वि. चिपळूणकर सरांबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या. नवीन उद्योग उभारणी करताना आलेल्या अडचणी वर कशा प्रकारे मात करावी हे दुष्यंत आठवले यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. शाळेसाठी व माजी विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान देणाऱ्या नवनाथ वाठ, विवेक दहिफळे, कैलास बिलोणीकर, ब्रिजकिशोर झंवर,चंद्रकांत मरपल्लीकर, सखाराम पानझडे, अशोक काळे, डॉ. राजेंद्र परदेशी, दुष्यंत आठवले, मच्छिंद्र चाटे, केशव काळे, राहूल भोसले, भरत तांबोळकर, गजानन गोराडे, श्यामराव घोरपडे, अशोक शिरसे, रोशन पिंपळे, सुरेश चव्हाण, सुरेश देशपांडे व गोपीचंद चाटे यांचा विशेष गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या सत्राचे बहारदार सुत्र संचलन डॉ. बब्रुवान मोरे तर आभार प्रदर्शन डॉ.आनंद भगत यांनी केले.

शनिवारी रात्री नांदेड मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.रंगराव पांडे, बी.जी.जोशी, रामलाल पवार, हिरामण देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी घेण्यात आलेला झी हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे यांचा गोल्डन नाईट हा ऑर्केस्ट्रा खूपच रंगतदार झाला. नामवंत कलाकारांनी हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणी सादर केली. सिद्धार्थ खिल्लारे यांची कॉमेडी, मिमिक्री, रंगतदार किस्स्यांनी रसिकांचे हसून हसून पोट दुखले. यावेळी जयवंत पांडे , संजय जोशी, विकास कोवे,समीर आंबेकर, सुरेश चव्हाण, बालाजी उमरीवार यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी देखील एका पेक्षा एक सरस गाणी सादर करून सर्वांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सैराट च्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर वीस वर्षापासून ते सत्तरीपर्यंतच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी सुरेख डान्स करत सभागृह दणाणून सोडले.

स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन नांदेडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व विद्यानिकेतन चे माजी विद्यार्थी खंडेराव धरणे यांच्या हस्ते संपन्न झाले. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी न्यायमूर्ती शंकर शेटे यांनी भूषविले. माजी कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, साहित्यिक केशव काळे, कवी योगीराज माने, कॅप्टन निळकंठ केसरी, राजेंद्र गिल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
खंडेराव धरणे यांनी आपल्या भाषणातून शाळेने आपल्याला कसे घडवले याबद्दल सविस्तर विवेचन केले. शंकर शेट्टे यांनी उतार वयात कायदेशीर अडचणी येऊ नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन केले.

त्यानंतरच्या सत्रात कॅप्टन केसरी व डॉ. आनंद भगत यांनी शाळेत शिकत असताना घेण्यात येत असलेले दैनंदिन कार्यक्रम व्यासपीठावरून पुन्हा एकदा घेतले. त्यात शाळेची प्रार्थना, एकूण दिनचर्या, शाळेतील उपक्रम, शाळेत एकत्रीत पणे केलेली मस्ती, धमाल, अभ्यास व शिक्षकांनी दिलेली शिक्षा यावर मत व्यक्त करताना अनेकांनी दिलखुलासपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनेक आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे सर्वजण भारावून गेले. विद्यानिकेतनीय साहित्यिक व कवी यांचे आपल्या साहित्य कृती बद्दल अनुभव कथनाच्या सत्रात प्रसिद्ध साहित्यिक केशव काळे यांनी ” होय, हे असंच आहे ” या आपल्या आत्मचरित्रावर उत्कंठावर्धक सविस्तर माहिती दिली. नामवंत कवी योगीराज माने यांनी कविता लिहिताना ऊर्जा कशी मिळते हे सोदाहरण स्पष्ट केले. आजोबा व नातवाचे प्रेम सांगणाच्या कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

शाळेसाठी व माजी विदयार्थ्यांसाठी आपण काय योगदान देऊ शकतो या चर्चासत्रात चंद्रकात मरपल्लीकर, शरद सोडेगावकर यांनी आपल्या संकल्पना विशद केल्या. तसेच राजेंद्र गिल यांनी स्वतः विकसित केलेले माय जीपीएस या ॲप बद्दल माहिती सांगून ते माजी विद्यार्थ्यांसाठी किती उपयुक्त आहे हे पटवून दिले. स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या सत्रात दिलीप ठाकूर यांनी शाळेत खेळलेले विविध गेम प्रत्यक्ष व्यासपीठावरून घेतले. जिलेबी रेस, लगोरी, धप्पाकुट्टी यामध्ये खूप धमाल झाली. चुरशीच्या ठरलेल्या चमचा लिंबू शर्यतीत विश्वनाथ होळगे ने बाजी मारली. राष्ट्रीय प्रशिक्षक खो-खो प्रशिक्षक शेख रफीक यांनी पंचाची भूमिका निभावली. झटपट वस्तू आणण्याच्या नादात अनेकांनी वयाचे भान विसरून तत्परता दाखवून बक्षीसे मिळवली.

 

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप ठाकूर यांचा सिंहाचा वाटा उचलणाऱ्या दिलीप ठाकूर यांचा त्यांच्या मित्रांनी पुष्पहार देवून सन्मान केला. दिलीपभाऊंना प्रदीप लोखंडे व प्रमोद हिबारे यांनी मोलाची साथ दिली. नोंदणी विभाग व साहित्य वाटपाची जबाबदारी सुदर्शन मेहकरे व प्रमोद सुवर्णकार यांनी लिलया पार पाडली. व्यासपीठ विभाग देविदास जोंधळे, निलेश घोडाम, बालाजी आगलावे ,शाहरुख वरनाळे, कु. ईशानी चौहान व कु.इशिता चौहान यांनी सांभाळले. क्रीडा वसतिगृह, झुलेलाल भवन, आनंद हॉस्पिटल या ठिकाणी वातानुकूलित निवासाची व्यवस्था अत्यंत उत्तम होती. बालाजी खडके, शरद सोडेगावकर, हिरालाल रींदकवाले, डॉ. आबासाहेब निळकंठे, डॉ. आनंद भगत यांनी निवास व्यवस्थेमध्ये जातीने लक्ष घातले. दोन्ही दिवस पूर्णवेळ चहा, भरपेट नाश्ता, हापुस आंब्याची रसाळी, धपाटे, पिठले भाकर, वेगवेगळ्या मिठायांनी युक्त चविष्ट भोजन आणि मुबलक मिनरल वॉटर च्या बाटल्या यामुळे सर्वजण तृप्त झाले.भोजन व्यवस्था जगतसिंग ठाकूर, सुरेश शर्मा,अरुणकुमार काबरा, कैलास महाराज वैष्णव, सुरेश लोट यांनी यशस्वीपणे सांभाळली. अवागमनासाठी दोन स्कूल बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे संयोजन समितीचे आभार मानण्या साठी सय्यद मुजफ्फर यांनी तप्तरता दाखविली. प्रा. डॉ बब्रुवान मोरे व योगेश होनराव यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. शेवटी संयोजक समितीचे कोषाध्यक्ष प्रमोद हिबारे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी श्रावण रॅपनवाड, सुनिल मेश्राम , साईनाथ मोहोडकर, नीलेश घोडाम , राजू कुमरे, अनिल कदम, स्वामी कवडे, सुरेश वाघ, ज्ञानेश्वर गावंडे , लक्ष्मीकांत वाघमारे, बालाजी आगलावे, डॉ चंद्रकांत थोंटे, प्रा. यशवंत गुट्टे, हरिभाऊ चौरे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. अतिशय सुनयोजित पणे घेण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात २५ ते ५० वर्षापूर्वी घेतलेले शालेय जीवन पुन्हा अनुभवता आले याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

 

२५ ते ५० वर्षांपूर्वीच्या शालेय मित्रांची झालेली संस्मरणीय भेट

शालेय जीवनातील दिनचर्येची पुन्हा केली उजळणी

वयाचे भान विसरून सर्वांनी अनुभवला बालपणाच्या खेळाचा थरार

झिंगाट च्या गाण्यावर थिरकले सर्वच वयोगटातील माजी विद्यार्थी

प्रमुख अतिथीसह उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा व्यासपीठावर बोलावून करण्यात आला सन्मान

जेवणाची, राहण्याची, वाहतुकीची करण्यात आली होती उत्तम सोय

अतिशय सुनियोजित कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *