कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद’ विचारधन

समर्थ रामदास स्वामी म्हणतात. “कष्टविना फळ नाही,कष्टविना राज्य नाही” प्रत्येक माणसांनी कष्ट करावे आणि आपले जीवनचरित्रार्थ चालवावे. अनेक जणांना कष्ट करण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे त्यांच्या मनाला आनंद वाटत नाही. गोरगरिबांच्या छाताडावर पाय ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे आणि मलिदा खाणे हे अनेक जणांना आवडते. आपण ज्या देशांमध्ये राहतो त्या देशाच्या लोकांना त्रास देऊन आपल्या नावावर गडगंज संपत्ती तयार करून अनेक जण कष्ट न करता इतरांना लुबाडून मोठे होत आहेत. आणि देश सोडून पळून जात आहेत. हे वास्तविक कटू सत्य आहे, दुसऱ्याचं ताट रिकामं असेल तर त्या ताटात अन्न टाकावे,ही आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु दुसऱ्याच्या ताटातलं अन्न काढून घेणे ही विकृती आहे. हे अनेक जणांना कळत नाही. आज अनेक तरुण बेरोजगार म्हणून हिंडत फिरत आहेत.त्यांना कष्ट करावे वाटत नाही. छोटे छोटे काम करण्यास ते लाजतात त्यांच्या मनामध्ये न्यूनगंडवृत्ती, तयार होते.आणि इतरांनी कष्टाने कमावलेल्या गोष्टीकडे पाहून ते मनोमन जळतात. आणि इतरांना त्रास देतात. त्यामुळे त्यांना आनंद मिळत नाही. *सद्गुरु वामनराव पै म्हणतात” तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस*” कारण तुम्ही कष्ट करा .तुम्ही स्वतः श्रम करा. त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता, जर तुम्ही कष्टच केले नाहीत, तर आळशी बनाल. दे रे हरी पलंगावरी,असे म्हणून जमणार नाही,

 

समाजाच्या प्रवाहात राहणार नाही,कधीही कोणीही एकमेकाला भेटले की विचारतात. ‘तुमची’मुलं काय करीत आहेत’?मुलं जर असे वाईट वागायला लागले, कष्ट न करायला लागले, तर त्या कुटुंबाची वाताहत होते, त्यामुळे खरा आनंद कोणालाही मिळत नाही. त्यामुळे इतरांची सेवा करा. राष्ट्रपिता महात्मा गांधींजीनी आयुष्यभर या समाजासाठी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, अस्पृश्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण केले आणि इंग्रजांना चले जाव म्हणून पाठवून दिले. त्यांचे हे कष्ट भारतीय कधीही विसरणार नाहीत. डॉ बाबासाहेब आंबेडकर अहोरात्र अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. म्हणून मित्रांनो कष्टाबरोबर सेवा करा.यात भरपूर आनंद आहे. जर तुम्ही सेवेला कमी पडलात तर तुम्ही मागे रहाल. रामायणामध्ये श्री हनुमान यांनी श्रीरामाची अहोरात्र सेवा केली. आयुष्यभर ते त्यांच्यासोबत राहिले. आज त्यांच्या सेवेचे चीज झाले. गावोगावी हनुमानाचे मंदिर तुम्हाला दिसतात. सेवा हा एक धर्म आहे. म्हणून सेवेकरी व्हा. सेवा करण्याची संधी द्या. असे बरेच जण म्हणतात.

 

दुसऱ्यांनी जेवण केलेल्या पत्रावळी काढणे ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. समाजामध्ये सर्वांबरोबर चांगलं राहणे ही सुद्धा सेवा आहे.चांगले पुस्तके वाचन करावे. चांगले दृश्य पहावे. चांगल्याच पद्धतीने वागावे. कष्ट करून दोन घास खाल्ले की गाढ झोप लागते. चोऱ्या करणे, वाईट प्रवृत्तीने वागणे, व्यसन करणे,दरोडे घालणे,हे समाजाला मान्य नाही, यात कसला आला आनंद, ज्यावेळेस वाल्याकोळी दरोडे टाकून इतरांना त्रास देत असे, त्याच्या हातून कोणतीही सेवा घडली नाही, परंतु नारदमुनी त्यांना भेटल्यानंतर जीवनाचा अर्थ सांगितला, “अरे तुझे कोणीच नाही ? तू कोणासाठी दरोडा घालतोस? तु घरी जाऊन तुझ्या आई वडिलांना विचारून ये? त्यावेळेस तुला कळेल, तेव्हापासून त्यांनी मनातून समाजाला दिलेला त्रास काढून टाकला आणि वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले. आणि त्यांनी रामायणासारखा महाकाव्य ग्रंथ लिहिला.

आज तो ग्रंथ जगातील लोकांना उपदेश करतो.त्यानुसार नीती, धर्म,आचार विचार ,सदाचार यानुसार माणसे वागतात, म्हणून सज्जनहो, कष्ट करा. इतरांची सेवा करा. समाजसेवक बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली. आज त्यांची जगात कीर्ती पसरत आहे. त्यांनी केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही. समाजसेविका मदर तेरेसा यांनी दीन,दुबळे, पीडित
,अनाथ, गरीब, रोगी यांची सेवा केल्याने आज देवाच्या देव्हार्‍यात त्यांना बसवलं जाते.माणूस कर्माने मोठा होतो. जन्माने नाही असे अनेक विचारवंतांनी सांगितले आहेत. कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी अहोरात्र कष्ट केले. समाजाची सेवा केली आणि त्यांच्या सेवेचा फळ म्हणून आज अनेक शासकीय कार्यालयात त्यांचे फोटो अभिमानाने झळकत आहेत.याच पती-पत्नीवर अनेक धर्ममार्तंडानी, समाजकंटकांनी शेण, चिखल फेकले होते. तर आज सुगंधाच्या अगरबत्ती लावून वाकून मुजरा करत आहेत.याचे दुसरे नाव कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. येशू ख्रिस्ताने समाजा साठी अविरतपणे कार्य केले.

 

 

काही लोकांनी त्यांना त्रास दिला तरी ते म्हणाले” प्रभू यांना क्षमा करा” त्यामुळे आज ते महान झाले. समाजाची सेवा त्यांनी केली म्हणून समाजामध्ये मोठे होण्यासाठी तुम्ही नम्रपणाने वागा. दुसऱ्यासाठी झटणाऱ्यांना खरा आनंद अनुभवता येतो. गाईला चारा टाका, पीडित लोकांना घरकुल मंजूर करून द्या. गरीब विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरा.शेतकऱ्यांना बी बियाणे द्या
.अनाथमुला -मुलींच्या विवाहाला मदत करा. रक्तदान, अन्नदान समय दान अशा कितीतरी पध्दतीने सेवा आपल्याला करता येतात, म्हणून सेवा करा. त्याचे निश्चितच फळ तुम्हाला मिळेल. संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर खराटा हातात घेऊन गावातील घाण दूर केली. लोकांना कीर्तनातून उपदेश केला त्यामुळे आज प्रत्येक माणसाच्या मनात गाडगे महाराजाविषयी आपुलकी आणि प्रेम आहे. म्हणून तुम्हीही कष्ट करा .कष्टा बरोबर सेवा करा, याचाच तुम्हाला खरा आनंद मिळेल.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहून लोकांना उपदेश केला, त्यांची *या झोपडीत माझ्या* म्हणून लोकांच्या मनावर ते आजही अधिराज्य गाजवून आनंद देतात. आनंद मिळण्यासाठी बरेच लोक प्राणीमात्रावर दया करतात. त्यामुळे त्यातून त्यांना खरा आनंद मिळतो. आपली विचारधारा चांगली असावी. दुसऱ्याचे उणे -दुणे करून आपण मोठे होत नाही. स्वतः मोठे होण्यासाठी सर्वांना समतेचे तत्व सांगावे. भेदाभेद करू नये. आपले विचार खूप वरच्या दर्जाचे असावेत. *जनसेवा हीच ईश्वर सेवा* आहे असे म्हणतात म्हणून तुम्ही दीन, दुबळे पीडित,अनाथ ,रोगी यांची सेवा करा. त्यामुळे तुम्ही सुद्धा उच्च पदाला पोहोचाल. तुम्हाला सुद्धा आपण समाजाची सेवा केली म्हणून खरा आनंद लुटता येईल. क्रांतीकारक भगतसिंग ,राजगुरू,सुखदेव, उमाजी नाईक, मंगल पांडे, कल्पना दत्त ,अनंत कान्हेरे,शिरीष कुमार मेहता यांनी देशासाठी आपले प्राण बलिदान केले. त्यात त्यांना आनंद मिळाला. याचं कारण असं की आपला देश आपला समाज पारतंत्र्यात आहे. आपल्या रयतेला त्रास दिला जातो म्हणून लोकांचं भलं व्हावे. आपले हक्क आपल्याला मिळावेत.यासाठी त्यांनी हसत हसत फासावर गेले. *जे देशासाठी लढले। ते अमर हुतात्मे झाले* म्हणून या जगात चांगले होण्यासाठी चांगले कार्य करण्यासाठी जिद्द लागते. आपले संस्कार चांगले लागतात. गरीब घरचा व्यक्ती मनानं निर्मळ राहून सुद्धा सेवा करू शकतो. परंतु धनधाडगे व्यक्ती कधीच कोणाला फुटकी कवडी सुद्धा देऊ शकत नाहीत
.त्याचे कर्माचे फळ त्याला नंतर मिळतात. म्हणून कष्ट करा. त्यातच सेवेतून तुम्हाला खरा आनंद मिळतो. म्हणून सेवेकरी व्हा, मुलांनी आई-वडिलांची सेवा करावी. सुनेनी घरातील सर्वांना समजून घेऊन आपले कार्य करावे.वृध्दांचा उपहास करू नये. सेवा करावी,शिक्षकानी आपल्या विद्यार्थ्यांना निष्ठेने शिकवावे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील गावांचा विकास करावा. संपादकांनी सत्य ते बाहेर आणून छापावे.

 

 

कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. छोट्यांनी मोठ्यांची सेवा व आदर करावा. त्यामुळे त्यांची कीर्ती आपोआप वाऱ्यासंगे जाते. म्हणून चंदनासारखे झिजावे.आणि समाजाशी एकरूप व्हावे, जसे दुधात साखर एकरूप होते,नेहमी समाजाला घेऊन चालताना आपल्या घरात एकमत, शेतात खत,गावात पत,आणि पत्नीच्या नाकात नथ असावी, तरच लोक आपले म्हणणे ऐकून घेतात,असे पूर्वज म्हणतात. म्हणून सेवाभावी पद्धतीने तुम्ही वागल्यास तुम्ही लोकांच्या गळ्यातील कंठमणी होणार. यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे आज देश चांगल्या वागलेल्या लोकांमुळे मोठा होत आहे. भारतरत्न डॉ. ए,पी,जे अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर देश सेवा केली. ज्येष्ठ समाज सुधारक अण्णा हजारे आयुष्यभर अविवाहित राहून देश सेवा करत आहेत,त्यांनी समाजाला माहितीचा अधिकार दिला. अनेक साहित्यिकांनी समाज प्रबोधन पर लेख, साहित्य लिहून समाजाची सेवा केली. ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी कापणे, घासणे, गरम करून शेवटी ठोकणे तसेच व्यक्तीची चाचणी त्यांनी केलेली त्यागवृत्ती,नम्रता, सद्गुण, आणि कर्तृत्वाने पूर्ण होते. त्यालाच पुरुषार्थ म्हणतात.अशा प्रकारे तुम्ही कष्ट करा व त्यातून तुम्हाला परमोच्च आनंद मिळेल. म्हणून नशीब वादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी बना.

 

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* *अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरका वाडी ता.मुखेड जि. नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *