लातूर, दि. 21 (जिमाका) : वटपौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्यानिमित्ताने वृक्ष लागवडीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देवकरा ग्रामपंचायतीने पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला. त्यानुसार वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली असून शुक्रवारी टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनीही या वृक्ष लागवड मोहिमेला उपस्थिती लावून आपला सहभाग नोंदविला. गावातील अबालवृद्ध, महिला या वृक्ष लागवडीसाठी उपस्थित होत्या.
लातूर जिल्ह्यातील वृक्षांचे आच्छादन वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान हाती घेतले असून याअंतर्गत जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडासह इतर रोपांची लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अहमदपूर तालुक्यातील देवकरा ग्रामपंचायतीने पाच हजार झाडे लावण्याचा निश्चय केला आहे. टप्प्या-टप्प्याने वृक्ष लागवड करण्यात येत असून वटपौर्णिमेच्या दिवशी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनीही देवकरा येथे उपस्थित राहून या वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविला. विविध योजनांच्या अभिसरणातून देवकरा येथे उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार शिवाजी पाळेपाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, सरपंच वंदना बदणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी रस्त्याच्या दुतर्फा आणि स्मशानभूमी परिसरात वडाच्या रोपासह चिंच, शिसव, नारळ, पिंपळ, कडूनिंब आदी रोपांची लागवड करण्यात आली.
झाडांचे गाव अशी देवकरा गावाची ओळख बनवा : जिल्हाधिकारी
देवकरा ग्रामपंचायतीने पाच हजार वृक्ष लागवडीचा निश्चय करून तो पूर्णत्वास प्रत्यक्ष वृक्ष लागवडीस सुरुवात केली आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. शेताच्या बांधावरही वृक्ष लागवड व्हावी. झाडांनी हे गाव नटावे. वृक्ष लागवडीच्या मोहिमेत देवकरा येथील सर्वच नागरिकांनी सहभागी होवून झाडांचे गाव म्हणून देवकरा गावाची राज्यभर ओळख निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच गावातील महिलांचेही नाव घरावर, सातबारावर लावून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बांबू लागवडीसाठी पुढाकार घ्यावा : मुख्य कार्यकारी अधिकारी
बांबू लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हेक्टरी जवळपास 7 लाख रुपये अनुदान दिले जाते. इतर पिकांच्या तुलनेत बांबूपासून मिळणारे उत्पन्न अधिक असून पर्यावरणीयदृष्ट्या बांबू पीक फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. तसेच जिल्ह्यात गावपातळीवर महिलांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून देवकरा येथेही असे शिबीर आयोजित करण्यात येईल. अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या.
*****