अमरनाथ गुहेतून भाग – ८ (लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)

 

सर्व अमरनाथ यात्रेकंरू गुलमर्गला जाण्यासाठी तयार होऊन ठीक ७ वाजता बसने रवाना झालो. सकाळी कमी थंडीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात काश्मीर मधील सुंदर दृश्य मनमोहून टाकत होते. काश्मीर मधील दरी खोऱ्यातील सुचीपर्णी ,चिनार वृक्षाची दाट झाडी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.थोडे फार ऊन असल्यामुळे १० नंतर थोडा उकाडा जाणवत होता. अमरनाथच्या तब्बल २३ यात्रा केल्या पण असा काश्मीर मधील प्रसंग क्वचितचं पहिल्यांदाच पहायला मिळाला.गाड्या AC असल्यामुळे तितका उकाडा जाणवला नाही.गूलमर्ग साठी सर्वजण मार्गस्थ झाले असता, रस्त्यात एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली.तेथील तजेलदार आलू पराठे याचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेकरूंची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना पोहे नाश्ता करावा लागला. गुलमर्गला हॉटेलचे दर जास्त असल्यामुळे सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार या तिघांकडून नाश्ता देण्यात आला.

पर्वत माथ्यावरील गुलमर्ग ला जाताना निसर्ग सौंदर्य पाहताना मन तृप्त होत होते.रस्त्याच्या दुतर्फा डोंगरावर छोट्या छोट्या फुलांची उधळण झाली होती. गुलमर्ग गाव हे जितके सुंदर आहे तितकेच इथले घोडेवाले आणि गाडीवाले खराब आहेत. त्यामुळे बसमध्ये आधीच सर्वांना हुशार करून ठेवले. छोटे छोटे ग्रुप करून घोडे अथवा जीप ठरवा असा सल्ला दिला. गुलमर्गला कोणीही ग्रुप लीडर झाला की त्याच्या मागे हे घोडेवाले असे लागतात की विचारू नका. बस मधून उतरल्यावर दिलेल्या सूचना प्रमाणे सर्वांनी घोडे /जीप ठरविले.

सर्वाना ” गंडोला “रोप- वे,केबल-कार राईडचं आकर्षक होतं.हा आशियातील सर्वोच्च केबल कार प्रकल्प आहे आणि जगातील सर्वात मोठा आणि दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. गंडोलाच्या एका कार मध्ये सहा लोकांना जाता येते. ताशी ६०० लोकांना घेऊन जाऊ शकतो.हा केबल कारचा प्रकल्प जम्मू आणि काश्मीर सरकार आणि फ्रेंच फर्म पोमागाल्स्की यांचा संयुक्त उपक्रम आहे.गुलमर्ग रिसार्ट ते काँगडोरी स्टेशन २६०० मीटर पहिला टप्पा व काँगडोरी स्टेशन ते काँगडोरी शिखर दुसरा टप्पा ३७४७ मीटरचा आहे. वेळेअभावी पहीला टप्पा राईडचा आनंद घ्यायच्या सूचना सर्वांना दिल्या. पूर्वी गंडोल्याची तिकिटे इथेच मिळायची. परंतु आता सर्व काही ऑनलाईन झाले आहे.रोटी या चित्रपटातील राजेश खन्ना व मुमताज या जोडीचे “जय जय शिवशंकर, काटा ना लगे कंकर” या प्रसिद्ध गीताचे ज्या ठिकाणी चित्रीकरण झाले होते. त्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले.हे मंदिर काश्मीर चे शेवटचे राजे हरीसिंग यांची राणी मोहिनीबाई सिसोदिया यांनी बांधून घेतले म्हणून याला महाराणीमंदिर असेही म्हणतात.हे मंदिर शिव आणि पार्वतीला समर्पित आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे.ज्यामध्ये भरपूर हिरवळ आहे. गुलमर्गच्या कानाकोपऱ्यातून हे मंदिर दिसते.स्कीइंगची आवड असणाऱ्यांसाठी गुलमर्गची गणना देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्कीइंग रिसॉर्ट्समध्ये केली जाते. डिसेंबरमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक स्कीइंगसाठी येतात. येथे स्किइंग करण्यास सक्षम होण्यासाठी उतारांवर स्कीइंग करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्यांनी नुकतेच स्कीइंग शिकायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठीही हे योग्य ठिकाण आहे. सर्व स्कीइंग सुविधा आणि चांगले प्रशिक्षक देखील येथे उपलब्ध आहेत.

यात्रेकरूनी एक तास अधिचं फेज १ व फेज २ चे ऑनलाइन रोपवेचे तिकीट काढले होते. निसर्गनिर्मित अमूल्य असा ठेवा असलेल्या अतीसुंदर नंदनवनाचा सर्वांनी आनंद लुटला. खरच आयुष्याचे समाधान वाटले हे सुंदर ठिकाण पाहून डोळ्याचे पारणे फिटले असल्याचे सर्वांनी आपले मत व्यक्त केली . घरातील एक माणूस प्रवासात सांभाळण मोठं मुश्किल जात, पण मी तब्बल ९० लोकांना घेऊन अमरनाथ यात्रा व इतर नियोजन करतो याला खरोखर दैवी चमत्कारचं म्हणावा लागेल असे मत यात्रेतील अनेकांनी व्यक्त केले. सर्वजण गंडोला ला गेले असता मी व संजय राठोड यांनी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. अचानक मला पुढे खालसा हॉटेल दिसले. काउंटर सरदारजी
बसलेले पाहून आनंद झाला. त्यांना सांगितले की, आम्ही सचखंड हुजूर साहेब इथून आलेलो आहोत. लगेच गाडीतून सिरोपाव व गुरुद्वारचा प्रसाद आणि ट्रॉफी देऊन सरदार भगतसिंग यांचा सत्कार केला. हॉटेल त्यांचे छोटेसेच होते पण ९० लोकांची जेवणाची व्यवस्था माफक दरात करण्याची तयारी भगतसिंग यांनी दर्शवली. आमच्यासोबत असणारे वंदना व सुरेश त्रिमुखे यांच्याकडून रुचकर जेवण देण्यात आले.

सरदार भगतसिंग यांच्यासोबत बऱ्याच गप्पा मारल्या. मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या कश्मीरमध्ये त्यांना काही त्रास होतो का याची चौकशी केली. मोदी सरकार येण्यापूर्वी रात्री बेरात्री अतिरेकी यायचे आणि त्यांना जेवण बनवायला लावायचे. भीतीमुळे जेवण बनवून द्यावेच लागायचे.पण दहा वर्षापासून कोणत्याही त्रास नाही. ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर आता मात्र कोणतीच भिती वाटत नाही.

तदनंतर ४ वाजता सर्व यात्रेकरू परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाले होते.श्रीनगर ला येईपर्यंत ८ वाजले होते.कालचे जेवण प्रत्येक हाऊस बोट मध्ये वाटप करण्यासाठी खुप वेळ लागल्यामुळे आज जेवणाचे पार्सल नांदेडचे जेष्ठ समाजसेवक गोरखनाथ सोनवणे यांच्या तर्फे शिकारा स्टँड ७ वरच प्रत्येकाच्या हातात दिले. काश्मीर मध्ये नॉर्थ इंडियन चविष्ट जेवण मिळाल्या मुळे सर्वजण तृप्त झाले.
(क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *