नांदेड, दि. ८ ऑगस्ट २०२४:
राज्यातील महायुती सरकारने मंजूर केलेल्या महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणामुळे महाराष्ट्राचा व्यापार- व्यवसाय व अर्थकारण अधिक गतीमान होणार असून, नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रादेशिक लॉजिस्टिक हब स्थापन करण्याच्या निर्णयामुळे देगलूर-बिलोली भागासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण-२०२४ ला मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयाचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी स्वागत केले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, या धोरणामुळे महाराष्ट्राला पाच वर्षात ३० हजार ५३७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, एकूण ५ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याच्या लॉजिस्टिक धोरणांतर्गत देगलूर येथे प्रादेशिक लॉजिस्टिक हब स्थापन करण्याचा निर्णय देगलूर-बिलोली भागासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगारच्या मोठ्या प्रमाणात नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकरी, व्यावसायिकांसह समाजातील अनेक घटक या निर्णयामुळे लाभान्वीत होणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. देगलूर येथे प्रादेशिक लॉजिस्टिक हब स्थापन होत असल्याबद्दल त्यांनी स्थानिक आमदार जितेश अंतापूरकर यांचे अभिनंदन केले आहे.