@बेंदूर

 

बैल पोळा किंवा बेंदूर हा सण शेतकऱ्याच्या लाडक्या बैलाच्या सन्मानाचा उत्सव आहे. जो महाराष्ट्रात नव्हे तर सर्वत्र भारतभर
साजरा केला जातो. बैल पोळा हा सण साधारणपणे श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी येतो. हा सण साजरा करण्यामागचे कारण असे की,
आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हे शेतीवर अवलंबून असल्याने बैल हा शेतकरी राज्याचा मित्र आहे.
बैल शेतीच्या कामात खूप राबतात. काही शेतकरी आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरत असले तरी अजून सुद्धा लोक बैलांचा वापर करतात. अजून सुद्धा शेतीची अवजड कामे जसे कि नांगरणी, पेरणी, मळणी, पिकाची वाहतूक हि बैलांच्या साह्यायानेच केली जाते. ज्यावेळी वाहने नव्हती त्यावेळी सर्व लोक या गावाहून, त्या गावाला जायला बैलगाडीचा वापर करत असत. बैलाचे शेतकऱ्याच्या आयुष्याशी खूप जवळचे नाते म्हणजे मित्रत्वाचे राहते. त्यात बैलांची सेवा व त्यांच्यावर लावलेला जीव शेतकऱ्याला नेहमीच आठवणीत राहतो. त्यात बैलाच्या मृत्यू ही मनाला चटका लावणारी घटना ठरते. आपल्या या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी राजा दरवर्षी बैल पोळा सण साजरा करतो.

बैल पोळा हा सण पावसाळ्यातील पेरणी संपल्यानंतर ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरूवातीच्या दिवसात बैल पोळा सण येतो. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते, माझे वडील तर बैलांना या दिवशी गरम पाणी वापरूनच अंघोळ घालतात. बैलांची शिंगे कोरली जातात, बैलांना रंगवण्यासाठी आम्ही रंग, फुले, माळा, घुंगरू, इत्यादी वस्तू घेऊन पूर्णपणे त्यांना सजवले जाते. गळ्यात सुंदर घंटा बांधली जाते, पायात छमछम वाजणारे घुंगरू बांधले जातात, शिंगाना रंगबिरंगी फुले किंवा माळा लावल्या जातात. बैलांची शिंगे सुद्धा वेगवेगळे रंग वापरून रंगवली जातात. काही ठिकाणी तर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांच्या साजवटीच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या बैल जोडीला बक्षिसे सुद्धा असतात म्हणून शेतकरी आपले बैल खूप मेहनत करून सजवतात. बैलाच्या पाठीवर एक सुंदर मऊ शाल टाकली जाते, शक्यतो ती गुलाबी किंवा लाल रंगाची असते.

काही जण आपली कलात्मकता वापरून बैलाच्या अंगावर विविध रंगाचे आणि आकाराचे ठिपके सुद्धा काढतात. ह्या सर्व कलाकृती डोळ्यांना वेगळाच आनंद देणारे असते.
सजावट पूर्ण झाल्यावर गावातील सगळे शेतकरी आपआपल्या बैलांना घेऊन एका सार्वजनिक ठिकाणी जमतात जसे कि गावचा पार, गावचे मंदिर, चौकाचे ठिकाण, इत्यादी. सगळे लोक एकत्र जमल्यानंतर तिथे बैलांची पूजा केली जाते, सर्व लोक त्यांच्या पाया पडतात, त्यांच्या शेतकऱ्यांना करत असलेल्या मदतीला प्रणाम करतात आणि त्यांना पोळ्यासाठी बनवलेल्या विशिष्ट गोड नेवैद्य दिला जातो.
प्रत्येक गावात सर्व बैल जोडींची मिरवणूक काढली जाते. वाजत गाजत त्यांची मिरवणूक गावच्या वेशीपर्यंत जाते आणि तिथून परत येते. वयस्कर लोक या दिवशी लेझीम सुद्धा खेळतात. यांनतर सर्व शेतकरी आपली बैल जोडी घेऊन घरी जातात. घरी गेल्यावर बैलांना गोड नेवैद्य दिला जातो.

आजकाल शेतीसाठी अत्याधूनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत, आता लोक ट्रॅक्टर घेत आहेत आणि त्याच्या मदतीने शेतीची कामे करत आहेत. शेतीमध्ये बैलाचा वापर आजकाल फक्त गरीब शेतकरी करतात.
वाढत्या तांत्रिक उपकरणांमुळे हळूहळू शेतीच्या कामांमध्ये बैलांचा वापर कमी होऊ लागला आहे, पूर्वी आमच्या गावी प्रत्येक घरी बैलजोडी होती आणि आता फक्त मोजक्या लोकांकडे बैलजोडी राहिली आहे. काही दिवसांनी बैलपोळा साजरा करणे एक परंपरा फक्त नावापुरती राहू शकते.

बैल पोळा हा खुप महत्वाचा सण आहे आपण सर्वांनी तो सण मोठ्या उत्साहात साजरा केले पाहिजेत. आपल्या देशात ही आपली संस्कृती आहे आणि असे छोटे छोटे सण आपली संस्कृती जपून ठेवतात. मग ते बैल पोळा असो, गुढी पाडवा असो किंवा होळी असो. नवीन गोष्टी अवगत करत असताना आपण आपली संस्कृती सुद्धा जपली पाहिजे.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *