सोयाबीन, कापुस अनुदान मिळणार कधी ? *लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खरं नाही– शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया*

*कंधार तालुक्यातील ८४९६८अनुदान लाभार्थ्याचे अर्ज प्राप्त.*

*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*

गत वर्षीच्या सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रूपये अर्थसाह्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. सदर अनुदान गेल्या १० ऑगष्ट पासून थेट लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केले होते. मात्र आजपर्यत १६ सप्टेंबर उजाडला असूनही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर झालीच नाही, उलट दिवसागणिक नव्याने जाचक अटी घालून अनुदानाचा मुहूर्त टाळला जात असल्याने सदर अनुदान मिळणार कधी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडूनही अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने ” लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खरं नाही ” असे अपरोधाने बोलल्या जात आहे.

सरकारने घोषणा केल्यानुसार कंधार तालुक्यात सुमारे ८४९६८ अनुदान लाभार्थी शेतकरी यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचा समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार मार्फत मिळाली आहे त्या अनुषंगाने शासनाकडून याद्या प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये लाभधारक शेतकऱ्यांचे अर्ज, नाव नोंदणी, आधार कार्ड, मोबाईल नंबर ,होल्डींग , शपथपत्र आणि सामायिक क्षेत्र खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्र भरून सबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केले आहेत. सदर माहिती कृषी सहाय्यक यांनी पोर्टलवर भरून दिली की अनुदानाची रक्कम थेट लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती. त्या अनुषंगाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत सर्व लाभधारक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार अशी चर्चा जोरात सुरू होती. मात्र अद्यापही संयुक्त तर नाहीच, पण वैयक्तिक खातेदाराच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. उलट सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना आता नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. कारण याआधी सामायिक खातेदार शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळाला आहे तेंव्हा कुठलीही तक्रार आली नाही. मग अनुदान मिळण्यासाठी प्रतिज्ञापत्र का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. परिणामी दिवसागणिक नव्याने अटी घालून सरकार अनुदान देण्यास आता टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी सोयाबीन, कापूस अनुदान म्हणजे ” लबाडाच आवतन जेवल्या शिवाय खरं नाही ” असे अपरोधपणे बोलत आहेत.

*चौकट*

कंधार तालुक्यातील ई पीक पाहणी करून ८४९६८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी तालुका कृषी सहाय्यकामार्फत ६८% अर्जाची छाननीचे काम पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार मार्फत उपलब्ध झाली असून तसेच शिल्लक लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड ,मोबाईल नंबर, बँकेचे पासबुक, होल्डींग व इतर कागदपत्रे आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन तालुका कृषी कार्यालय कंधार मार्फत करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *