मुखेड: आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्याचा शासन आदेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे यांनी दिली.
महाराष्ट्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित वि.जा.भ.ज.निवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मा.मंत्री महोदय अतुल सावे साहेब, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांच्या सोबत दि.१०जुलै २०२४रोजी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदनातील मागण्यांवर चर्चा होऊन इतिवृत्तांत देण्यात आला.
मात्र ४ महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दि.३०/०९/२०२४ पासून महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ व राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. दोन महिन्यांत सदरील मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे म्हणून राज्यातील त्रस्त व अन्यायाग्रस्त कर्मचाऱ्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे व सरचिटणीस किशन पुंड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.