′ आजच्या विज्ञान युगात ग्रंथ वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यासाठी गावोगावी वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज आहे. प्रत्येक गावाच्या वाचनालयातून व ग्रंथालयातून हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. तो घराघरात पोहोचला पाहिजे. दररोज किमान एक तास तरी वाचन करणे आपल्या हिताचे आहे. वाढदिवस, हळदकुंकू, सेवानिवृत्ती, या कार्यक्रमात ग्रंथाचे देव- घेव योग्य ठरेल, इतर वस्तू देण्यापेक्षा ग्रंथाचे वाटप करणे स्तुत्य आहे.म्हणून वाचन संस्कृतीकडे वळण्यासाठी असे उपक्रम करणे गरजेचे आहे.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे.समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा,अंधश्रद्धा,अज्ञान काढून टाकण्यासाठी वाचनाची व्यक्तीला नितांत गरज आहे.
नवसमाज निर्मितीला आवश्यक अशी मूल्ये विचारात घ्यायचे असेल तर वाचन संस्कृती गरजेची आहे.
वाचन केल्याशिवाय तुम्ही जगातील ज्ञान घेऊ शकत नाही, म्हणून वाचन हे ज्ञानवृद्धी वाढवते. वाचनामुळे बौद्धिक उंची वाढते .घरातील आई-बाबा,काका,काकू एखादे पुस्तक वाचताना दिसले तर मुले मुली पुस्तक वाचतील? कारण ते अनुकरण प्रिय असतात. वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीने वाचन केलं की मुले आपोआप पुस्तक घेऊन बसतात. परंतु सध्या असे होताना दिसत नाही. ब-याच मुलांच्या हातात आई- वडील मोबाईल देत आहेत. आणि
मुले अभ्यास करत नाहीत. मुलांना पुस्तक देऊन वाचन करायला सांगावं लागते.अशी ओरड करताना दिसतात.
म्हणूनच म्हणतात. ‘वाचाल तर वाचाल’ वाचत असताना लिहिलेले डोळ्याने पाहून ओळखणे एवढेच आपल्याला अभिप्रेत नसते. वाचन केलेला मजकूर समजने महत्त्वाचे असते. प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचावीत. यशस्वी व्यक्तीची आत्मचरित्रे, आत्मकथन वाचन करावे पुस्तकाशी मैत्री करावे.
माणसे एकमेकांना सध्या कमी बोलत आहेत.याची प्रचिती सर्वत्र येत आहे. पुस्तकामुळे मनाची मशागत होते. म्हणून बालवयापासूनच वाचनाची योग्य गोडी लागली तर पुढील काळात त्याचा फायदाच होणार आहे. वाचनात अक्षर ज्ञान महत्त्वाचे आहे. वाचन ही व्यक्तिमत्व विकासाची एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. विचारांची क्षितिजे विस्तारीत होतात. आणि व्यक्तीमध्ये सृजनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा,कादंबऱ्या,आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवनवीन माहिती प्राप्त करतो. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारते आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते.वाचन केल्याने तणाव कमी होतो. वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या, राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती म्हणजे उच्चतम जीवन मूल्यांची प्रतिष्ठापना होय. ज्ञानदीप लावू जगी या जाणिवेतून वाचन संस्कृती उगवत्या पिढीत रुजली पाहिजे. कारण जिथे पुस्तक तिथे भारी मस्तक असते. त्यासाठी ग्रंथ ही जीवनसांगती बनावे. वाचेल तोच टिकेल.
पुस्तक प्रेमी मनुष्य खरा श्रीमंत असतो. पुस्तकाचं मूल्य हिरे-रत्ना पेक्षाही महान असते.
लेखक जगाला ज्ञानप्रकाश देतात.
त्या ज्ञानप्रकाशातच अंत:करण न्हाऊन निघने म्हणजेच वाचन संस्कृती होय.भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तके ठेवण्यासाठी घर बांधले होते.
म्हणून वाचन संस्कृती मुळे ज्ञानवृद्धी होते. काहीजण वेळ मिळत नाही अशी सबब सांगून वाचनापासून अनेक कोस दूर जातात. आणि स्वतःचे नुकसान करून घेतात.
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत* संस्थापक: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड