मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्त्रीयांचे सहाय्य

देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी संस्थानिकांच्या अखत्यारातील भूभाग अजूनही त्यांच्या पारतंत्र्यांतच होता. सुमारे सहाशे छोट्या-मोठ्या संस्थानांचा प्रदेश इंग्रजांच्या कूटनीतीमुळे भारतीय संघराज्यात विलीन झालेला नव्हता. हैद्राबाद संस्थान हे त्यापैकीच एक होते. हैद्राबाद मुक्ती संग्राम हा प्रतिगामी आणि पुरोगामी शक्ती, तसेच अनियंत्रीत राजसत्ता आणि लोकशाही यांच्यातील एक तीव्र संघर्ष होता. प्रतिगामी शक्तींच्या जोडीला राजसत्तेने पोसलेली अत्यंत धर्मांध अशी रझाकार संघटना होती.

              निजामी राजवटीत मुस्लीम जातीयता पुरेपूर भरलेली होती. १९२१ व १९२९ साली निजामाने केलेल्या गरती निशाण ५२ व ५३ या कायद्यानुसार सर्व तर्‌हेच्या नागरिक स्वातंत्र्यावर बंधने होती. सभा, संमेलने, भाषणे, सार्वजनिक समारंभ, मुद्रण यांवर अतिशय कडक बंधने लादण्यात आली होती. शासकीय नोकर्‌यांत ८० ते ९० टक्के मुसलमानांचा भरणा होता. परंतु लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण यापेक्षा कितीतरी कमी होते. हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी रझाकार सरसकट शस्त्रे बाळगीत असत. जे काही तुटपुंजे शिक्षण मिळत होते हेही उर्दू माध्यमातून अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली शेवटचा हैद्राबाद मुक्ती संग्राम लढला गेला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान नष्ट होऊन ते स्वतंत्र भारतात विलीन झाले. हा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग होता. ‘मराठवाडा’ हा प्रांत संस्थानाच्या अखत्यारीत असल्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस आता मराठवाड्यात ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ म्हणून साजरा केला जातो.

                 या स्वातंत्र्य संग्रामात महिलांचा सहभाग किती होता? हा प्रश्‍न अतिशय महत्त्वाचा आहे. पुरुषी संस्कृतीच्या इतिहासाने स्त्रीयांचा इतिहासही दुय्यम ठरविला आणि अप्रकाशित ठेवला. अतिशय तुरळक लेखकांनी घेतलेल्या दखलीशिवाय तो ऐतिहासिक साहित्याच्या कोंदणात विरला गेला. तो आजच्या दिनानिमित्त जाणीवपूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण या प्रश्‍नाबरोबरच या संग्रामात महिलांचे योगदान किती? हा विषय संशोधनात्मकदृष्ट्‌या अभ्यासाचा आहे. या मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात विविध पातळीवरील प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांतील स्त्रियांनी जे आपले अमूल्य असे धैर्यशाली योगदान दिले अशा काही महिलांच्या कार्याची प्रामाणिकपणे आठवण करणे आम्ही आजच्या दिवशी इष्ट मानतो.

              हैद्राबाद संस्थानाविरुद्ध लढताना विशेषतः मराठवाड्यातील महिला आघाडीवर होत्या. निजामी संस्थानातील महाराष्ट्रात सहा परिषदा झाल्या. त्याचवेळी मराठवाड्यात लातूर, औरंगाबाद, सेलू येथे स्वतंत्र महिला परिषदा व अधिवेशने पार पडली. त्यात काशीबाई किर्लोस्कर, सुशिलाबाई किर्लोस्कर, सुशिलाबाई दिवाण, गौरी किर्लोस्कर, कमलाबाई किर्लोस्कर, पानकुंवर कोटेचा, सरस्वती बोधनकर, शांताबाई पेडगांवकर, संगीताबाई चारठाणकर, पानकुंवर फिरोदीया या प्रमुख स्त्रिया आघाडीवर होत्या. महिलांचा समस्या सोडविण्याबरोबरच त्यांचा स्टेट कॉंग्रेसच्या लढ्यात सिंहाचा वाटा होता. त्याबरोबरच निजामी अत्याचाराला कंटाळून शेकडो अशिक्षित ग्रामीण स्त्रिया या लढ्यात सहभागी झाल्या होत्या. राजधानी हैद्राबादेतील महिलांचे योगदान हे महत्त्वपूर्ण होते. त्यात सर्वभाषिक महिलांचा समावेश होता.

            आ.कृ. वाघमारे या स्वातंत्र्य सैनिकाच्या धर्मपत्नी आशाताई वाघमारे यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा भिडवून सहकार्य केले. त्यांचे पती टोपणनावाने वृत्तपत्रीय लिखाण करु लागले तर आशाताई शाळेतील, कॉलेजातील तरुण विद्यार्थीनींच्या मनात तसेच घरोघर फिरुन लोकांच्याही अंतःकरणात चळवळीची बिजं रुजवू लागल्या. रझाकारांचे हल्ले कसे परतवायचे, त्यांच्यावरच उलट हल्ला कसा करायचा, लढ्यासाठी पैसा कुठून आणि कसा उभा करायचा, हत्यारे कोठून आणायची, ती कशी हाताळायची याचे सक्रीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देऊळगाव राजा, पालमटाकळी, कायगावटेका, मनमाड या गावी केंद्रे उघडण्यात आली. या केंद्रातील जेवणाखावण्याची व इतर खर्च व्यवस्था महिला पाहत होत्या. तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या घरच्या माणसांची नांदगाव, नाशिक, लासलगाव अशा गावी व्यवस्था करणे, त्यांना राशनकार्ड मिळवून देणे, त्यांच्यासाठी पैसा गोळा करणे इ. कामातही महिला सहभागी झाल्या होत्या.

किराणा चावडीजवळ एका सत्याग्रहीला डी.एस.पी. फारुकीने उभे-आडवे बेदम चोपले आणि त्याला ते पोलीस चौकीवर फरफटत नेऊ लागले. आशाताईंना ते बघवेना. त्या मध्ये पडल्या आणि त्या सत्याग्रहीला त्यांनी वाचविले. या स्वातंत्र्य संग्रामात शस्त्रास्त्रांची ने-आण आशाताई करीत. खंडू नावाचा अत्यंत विश्‍वासातला टांगेवाला आशाताईंना या कामी मदत करीत असे. त्यांच्या हाताखाली बरेच स्वयंसेवक तयार झाले होते. वेष पालटून निरोप, चिठ्‌ठ्या पोहोचविणे, जोखमीच्या सामानाची ने-आण करणे या कामात ही मुले तयार झाली होती. चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आशाताईंना अटक झाली आणि चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. आणि नंतर सुटका करुन घ्यावी म्हणून प्रलोभने दाखविण्यात आली पण आशाताई कसलेल्या सत्याग्रही होत्या. त्या भूलथापांना बळी पडल्या नाहीत.

                 आशाताई एके ठिकाणी म्हणतात, ‘मी सत्याग्रही तयार केले. चळवळीत उडी घेणार्‌या काही तरुणांना त्यांच्या आईवडिलांनी घराबाहेर काढले, त्यांच्याशी स्वतःचे संबंध तोडले. या अशा सर्व पोरांची मी आई झाले, ताई झाले.’ एकदा आशाताईंनी सहा पिस्तुले आणली. पोलीसांना कशी बातमी समजली कुणास ठाऊक. दिवस उजाडल्याबरोबर घराची झडती घ्यायला शिपाई आला. आशाताई मनाच्या खंबीर. त्यांनी पिस्तुले जागोजागी लपविली. एक पिस्तुल तर त्यांनी संडासात लपविले. पोलीस आल्या पावली हात हालवित परत गेला. एकदा तर त्यांनी भिकारणीचा वेश धारण केला होता. पोलिसांना चकमा देण्यात त्या माहीर होत्या.

          सूर्यपेठेत झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ विवेकवर्धिनी कन्या शाळेतील पन्नास मुलींनी एक प्रचंड मोर्चा काढला. त्यात शेकडो महिला सामील झाल्या होत्या. त्यांचे नेतृत्व विमलबाई मेलकोटे, सीताबाई नांदापूरकर, उषा पांगरेकर आदी महिलांनी केले होते. मेलकोटेबाईच्या बाळाला त्याचे केस धरुन अत्यंत निर्दयीपणे पोलीसांनी उचलले तरी ती माऊली शांत राहिली. तुंगाबाई बेळूर्गीकर तुरुंगात गुप्तपत्रके वाटीत होत्या तर राजकुंवर काबरा जीव धोक्यात घालून स्वातंत्र्य सैनिकांना मदत करीत. नांदेडच्या ताराबाई परांजपे यांनी भांडेवालीचा वेश धारण करुन सायक्लोस्टाईल मशीन शिताफीने पळविले होते. प्रमिलाताई महेंद्र यांनी महिला मंडळाद्वारे स्त्री संघटन केले. कांडलीच्या दीड हजार ग्रामीण महिलांनी जंगल सत्याग्रह केला. येळवट व किरगुळ गावच्या स्त्रियांनी निजामाच्या अन्यायी व जुलमी राजवटीचा निकराने प्रतिकार केला.

            कॉम्रेड करुणाताई चौधरी यांचे शौर्य अत्यंत वाखाणण्याजोगे होते. औरंगाबादेत त्यांनी काढलेला मोर्चा पोलीसांनी अडविला होता. पोलीस झेंडा हिसकावून घेत असताना अत्यंत बुद्धिचातुर्याने प्रसंगावधान राखत झेंडा अंथरुन त्यावर आपल्या मुलीला झोपविले आणि स्फुल्लींग चेतविणारे भाषण केले. गीताबाई चारठाणकर ह्या पण अशाच धाडसी क्रांतिकारक होत्या. वाशीम कँपच्या स्वातंत्र्य सैनिकांना त्या बंदुका, पिस्तुले, रिव्हॉल्वर, काडतुसे, हातबॉंब पुरविण्याचे काम त्या करीत. निजामी पोलिसांनी इज्जतीला हात घातला तर शेवटचा एक जालीम उपाय म्हणून त्या नेहमी स्वतःजवळ एक विषाची पुडी ठेवत असत. परभणी जिल्ह्यातील शैलजा गोगटे, सरस्वती बोरीकर, शांताबाई पेडगांवकर, उस्मानाबाद व बीडच्या विद्यावती माताजी, सुंदरा निंबाळकर, सुशीला दिवाण, शांताबाई कोटेचा, सरस्वती येळंबकर महिलांनीही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. दगडबाई शेळके तर मुक्तीसंग्रामतल्या महिला योद्धा म्हणून ओळखल्या जातात. त्या टाकळी कँपच्या प्रमुख होत्या. घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक टाकून त्या मुस्लीम निर्भयपणे पहारा देत असत. अनेक चळवळी आणि सत्याग्रहात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्यासोबतच नांदेडच्या इंद्रायणी बोधनकर, सुलोचना, लताबाई बोधनकर, शकुंतला साले, कृष्णाबाई रत्नाळीकर, रमाबाई गांजवे, सरस्वती सरदेशपांडे, तान्याबाई पाटील, चंद्रभागा पाटील, गंगूताई देव अशा अनेक महिलांनी या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिलेले होते.


              हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारकांनी लढविल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याच्या इतिहासातील महिलांचा सहभाग म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपानच होय. मराठवाड्यातील कर्तबगार स्त्रियांनी परिषदा, सभा-संमेलने, संघटना स्थापन करणे, स्त्री शिक्षणाच्या प्रसार प्रचाराचे कार्य हाती घेणे, स्त्री सुधारणा चळवळी चालविणे याबरोबरच स्वातंत्र्य सैनिकांना गुप्तपणे वृत्तपत्रे, पत्रके, बातम्या तथा शस्त्रास्त्र पुरविणे, त्यांच्या जेवणाची सोय करणे, जमेल त्या पद्धतीने काम करणे, वेळ आल्यास रझाकाराशी झुंज देणे अशी अनेक कामे स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी केलेली आहेत. मुक्तीसंग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही लढत होत्या. अशा ज्ञात-अज्ञात स्त्रियांना मानाचा मुजरा!जयहिंद!


गंगाधर ढवळे ,नांदेड 

संपादकीय

१७.०९.२०२०

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *