अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन असे पार पडले

 

 

एक श्रोता म्हणून मी लेखक व पत्रकार मंडळीसोबत हैदराबाद येथे आयोजित साहित्य संमेलनास गेलो होतो. मला साहित्य संमेलन कसे असते हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती. तेथे येणारे कवी, लेखक, विचारवंत यांचे विचार ऐकायचे होते ; पण तिथं सगळं कासव गतीने चालू होतं. नियोजनाचा पत्ता नव्हता. मी एका लेखकाकडून कार्यक्रम पत्रिका घेवून ती वाचली त्यात सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीची आयोजन होते व पुन्हा वेगवेगळे कार्यक्रम संध्याकाळी सहापर्यंत चालणार होते. ती दिंडी मला पहावयाची होती. नऊ वाजले, दहा वाजले, आकरा वाजले दिंडी काही निघाली नाही. ग्रंथपूजन झाले नाही. वेळ आपल्या गतीने सरकत होतं. आयोजक व संयोजक त्यांच्या गतीने चालत होते. वेळेचा व कार्यक्रमाच्या नियोजनात ढिसाळपणा दिसून येत होता. सभागृहात सत्तर ते ऐंशी माणसांची आसन व्यवस्था केलेली होती. वेळेवर तेथे कोणीही येवून बसले नव्हते. नंतर हळूहळू त्या आसनावर लेखक मंडळी विराजमान झाली होती. तेवढयात तेथे राजकारणी मंडळी उपस्थित झाली. बळीराम नायक खासदार व तिलावत साहेब माजी मंत्री तेलगांना आले. संमेलनाचे अध्यक्ष आले. रमेश आर्या आले. थोडं उशीरा प्राचार्य ग. ह. राठोड आले. कास्टट्रायीब केंद्रीय मंडळाचे हुसेनसाहेब आले. मुख्यमंचावर कोणाला बसवावे याचे नियोजन केलेले नव्हते. शिष्टाचारचाही स्पष्ट अभाव दिसून येत होता. संयोजकाच्या का ? आयोजकाच्या ? मनावर तेथे मंचावर मान्यवराला आमंत्रित केले जात होते ? हा घोळ मला समजला नाही. पण खासदार साहेब मंचाखाली बसले होते. त्याना रितीरीवाजाप्रमाणे वर बोलविले नाही. तेही थोडं रागतच म्हणाले मला विजयवाडा [का इतर कोणत्या तरी गावचं नाव सांगून ] मला जायचे म्हणाले. त्याबरोबर तिलावत साहेब मंचावर उभे राहून वेळ मारून नेण्यासाठी म्हणाले साहेबांना पूरग्रस्ताना भेट देण्यासाठी जावयाचे आहे म्हणून त्यांनी चार शब्द बोलून जावे. येथूनच सावळा गोंधळ सुरु झाला .

गंमत अशी आहे की संमेलनाचे उदघाटन झालं नव्हतं. फित कापली गेली नव्हती. मंचावर ठेवलेल्या महापुरुषांना हार घातले नव्हते. प्रतिमेचं पूजन केलेलं नव्हतं. त्यापूर्वीच खासदार साहेबाचं व त्यांच्यासोबतच्या मंडळीचं सत्कार केले. चार शब्द बोलून ते निघून गेल्यानंतर प्रतिमेच पूजन, मग बाकीच्या मंडळीचे सत्कार आटोपले.

चव्हाण बंधूनी स्वागत गीत बंजारा भाषेत गावून त्यात तिलावत साहेबाचं गुणगाण केले. तेथील निवेदक त्यांना पितामह भिष्म असे संबोधत होते. यानंतरचा पुढील सर्व कार्यक्रम तिलावत साहेबांभोवती फिरत होता. प्रत्येक बोलणारा व्यक्ती त्यांचे गुणगाण महती सांगत होता. यावरून मला एवढं कळालं की तिलावत साहेब हे बंजारा समाजातील मोठी महान व्यक्ती आहेत? त्यांनी संबोधनही चांगलं केलं त्यांनी कोणावरही टिका केली नाही. माझ्यासाठी माझं समाज महत्वाचं आहे. समाजासाठी कार्य करत राहणार असं त्यांनी सांगितलं. बऱ्याच कवीने कवितेतूनही त्यांच्यासाठी सुस्तीपर कविता म्हणल्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे बंजारा साहित्य संमेलन एकाच व्यक्तीभोवती पिंगा घालत होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. ऊशीरा कार्यक्रम सुरू केले. नऊचं वेळ,कार्यक्रम बाराला सुरवात झालं. त्यामुळे सुरवातीपासूनच कार्यक्रमाचे बारा वाजत राहिले .

वेळेच्या अभावी संमेलनाच्या अध्यक्षासह कोणत्याही लेखक कवी, कथाकार यांना पाच मिनिटापेक्षा जादा वेळ दिला गेला नाही. त्या पाच मिनिटाच्या दरम्यानही तेथे उपस्थिती असलेल्या लेखक, कवी यांचे बाहेर जाणं येणं चालू होतं. जवळ बसलेल्यांशी गप्पा मारणं चालू होतं. सूत्रसंचालक त्यांच्या मनानुसार तोंडाकडे पाहून सभागृहात आलेल्याचा सत्कार करत होते. सत्कारातही कसं ना माणसं पाहून हारांचा आकार. बुकेचा आकार, स्मरण चिन्हाचा आकार पाहून देण्यात येत होते.
पत्रिकेवर नाव असलेले बरेच वरिष्ठ लेखक, कवी मंडळी आलेली नव्हती. उपमंचाचे म्हणजे कविता वाचन मंच असो की कथाकथन मंच असो की चर्चासत्र, तेथे ठरलेले अध्यक्ष आले होते का ? मला संशय आहे ते आले नव्हते. अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन होतं. आयोजकांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व यजमान राज्यातील साहित्यिक मंडळी हजर होती. कर्नाटक मधील एक व गोव्याचे दोन प्रतिनिधीशी मी चर्चाही केली.

महाराष्ट्रातील बरीच वरिष्ठ लेखक मंडळी मी ज्यांची नावं ऐकलेली आहेत जसे की, प्राचार्य ग ह राठोड, भिमणीपुत्र मोहन नाईक, याडीकार पंजाबराव चव्हाण, दिनेश राठोड, शंकर राठोड नांदेड , विनायक पवार प्रा.अशोकराव पवार, प्रा सुनिताताई अशोकराव पवार , प्रा फुलसिंगजी जाधव , डॉ वसंत राठोड मांडवी आलेले नव्हते. विरा राठोडची न येण्याची आडचण आपण समजू शकतो. तर ग ह राठोड आले होते .यादी पुढे वाढत जाईल.हे केवळ उदाहरणादाखल आहेत.ते कार्यक्रमाला का आले नव्हते? हा प्रश्न माझ्यासाठी प्रश्नच आहे. मला वाटते ज्याच्यावर निमंत्रनाची जबाबदारी होती त्यांनी टाळलं असेल ?

मंच एकच कार्यक्रम वेगवेगळे होते. श्रोते तेच होते. वेळे अभावी कार्यक्रम आटोपते घेत होते. कवी संमलेन सुरू झालं. कवी संमेलनाचे अध्यक्ष बहुधा आले नव्हते.साहित्य संमेलनात एकमेव महिला हजर होती.ती रणरागिनी औरंगाबादहून आली होती.तिचं नाव जयश्री राठोड/पवार. एक शिक्षिका. बंजारा संस्कृतीच जपणूक करण्यासाठी तसा संदेश देण्यासाठी बंजारा पारंपारिक वेशभुषा करून आली होती . पण सुरवातीला तिला कोणीच सन्मानाने पुढं बोलविले नाही.मला ते खटकत होतं.बंजारा लोकांची महती गाणारे आयोजक संयोजक तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. स्त्री पुरुष समानता हे एक घोषवाक्य त्याच्या पत्रिकेत होतं. ते त्या सुत्राच पालन करताना दिसत नव्हतं. हे माझ्या लक्षात आलं. माझ्या मनाला ते खटकत होतं.म्हणून माझ्याशेजारी बसलेल्या लेखकास मी विनंती केली एक आणि एकमेव महिला कवियत्री हजर आहे. तिला सन्माने पुढं बोलवा. तेव्हा तिला पुढं बोलावण्यात आले. पुढं म्हणजे मंचावर नव्हे बरं. खरं तर कवियत्रीचं सुरवातीस कौतूक व्हायला पाहिजे होता. मंचावर बसलेल्या सभागृहात बसलेल्या निवडक लोकाचं पुन्हा पुन्हा सत्कार होत होते.एकाच व्यक्तीचं तिन तिनदा सत्कार करत होते.शेवटी जयश्रीला कवी मंचावर अध्यक्ष म्हणून मान मिळाला. पण वेळ झालेली होती. तिला निघायची घाई होती. ही कवियत्री सालस, निर्मळ भावनिक हळव्या मनाची आहे. तिने श्रावण महिना व बाप या दोन कविता सादर केल्या.सभागृहातील सर्वांनी तिचं कौतूक केलं. कविता वाचन संपण्यापूर्वी ती पाच मिनटे आगोदर गावकडे जाण्यासाठी सभागृह सोडलं. त्या कार्यक्रमाचं आभार मानणारे मात्र तिचं आभार न मानता आदरणीय कवी एन.डी . राठोड याचं अध्यक्ष असा उल्लेख करुन त्यांचे आभार माणले. याला काय म्हणावं?
आयोजकांच्या सांगण्यावरून मला एवढं कळालं की आदरणीय गोपाल चव्हाण व एनडी दादा हे त्यांच्या कार्यकरणीत आहेत; पण सुरुवातीस यांच्या नावाचं साधा उल्लेख केला नाही व त्यांचा सत्कारही सुरवातीस करण्यात आला नाही. तसेच सभागृहात नांदेडचे सुपत्र, देशभर समाज जागृती करणारे चौऱ्यांशी वर्षाचे तरुण आदरणीय भाटेगावकर महाराज यांची दखल ही शेवटी शेवटी घेण्यात आली.

दुपारी दोन अडीच वाजात जेवण देण्यात आलं. जेवणाचं सुद्धा नियोजन केलेलं नव्हतं. तेथील काही अतिहुशार लोक आपआपल्या जवळच्याना मुक सूचना, इशारा देवून जेवणास बोलावून घेतले. त्याचं जेवण झाल्यानंतर जे सभागृहात कार्यक्रम दर्दी होते त्यांना सांगण्यात आले. त्यांना जे उरलं सुरलं होतं ते खावे लागले. प्रथम जेवण घेतलेले आम्हाला सांगितले जेवणात दही, वरणभात, पोळी, गोड शिरा, मिरची भज्जे, चटणी व पनीर आहे. म्हणून जेवणारे विचारत होते भज्जे, दही, चटणी, पनीर वाढा पण तेथे शिल्लक नव्हतं. वरील पदार्थ होते म्हणं असं बोलत जे आहे ते खाऊन मंडळी गप्प बसली.
संम्मेलनाचे अध्यक्ष अटोपशीर चांगलं बोलले. पण *एक विचारवंत लेखक नाव माहीत नाही त्यांनी तर मंचावर बोलताना कहरच केला. ते महाराष्ट्रातील तांडा सुधार समितीवर बोलत होते. ते म्हणाले,”तांडा सुधार या शब्दांमुळे बंजाराचा अपमान होत आहे. आपण प्राचीन काळापासून प्रगत आहोत. आजही प्रगत आहोत मग सुधार शब्द का ? आता आपणाला कोणत्या सुधारणेची गरज आहे ? आता तांडा सुधारणार म्हणजे काय करणार. ? हा आपला अपमान आहे.”* आता या विचारवंतला काय म्हणावं. साहेब तांडा सुधार म्हणजे तांडयाला अधुनिक जगाबरोबर आणण्यासाठी आवश्यक त्या भौतिक,आर्थिक सुधारणा पोहचावयाच्या आहेत. त्यांडयांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. आपली बौद्धीक सुधारणा झाली असेल ?
या संमेलनात एक सुंदर व अतिशय दर्जेदार कार्यक्रम घेण्यात आला.हा कार्यक्रम सगळ्यांनाच भावला असेल असे माझे मत आहे. तो कार्यक्रम म्हणजे आदरणीय तिलावत साहेब माजी मंत्री तेलंगांना यांची खुली/ प्रगट मुलाखत.प्रा पवार एकनाथ नावाच्या तरुण तडफदार व्यक्तीने ही मुलाखत घेतली.आगदी दर्जेदार, तोलन ढळू देता चालू घडामोडीविषयी मुलाखत झाली. ही तिलावत साहेबांना घाम फोडणारी होती हे निश्चित.
अखिल भारतीय साहित्य संमेलन हे मला साहित्यापेक्षा राजकीय संमेलनच वाटले कारण दिलेल्या ओळखपत्रावर व बॅनरवर राजकीय नेत्याची छायाचित्र, स्मरणीकेवर व मंचावर बोलणाऱ्याच्या प्रत्येकांच्या तोंडात राजकीय व्यक्तीचे नाव येत होते. थोडक्यात काय तर एकाच व्यक्तीच्या नावाच्या भोवती फिरणारं पिंगा घालणारं संमेलन दिसले.साहित्यापेक्षा राजकीय संमेलन होतं का ?

काहीही असो एक दिवसाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे ग्रामपंचायतने घेतलेल्या संमेलनासारखं स्वरूप होवू नये. इतर भाषिक साहित्य संमेलनासारखं संमेलन आपणास घेता येणार नाही का? हे मान्य करुन अशा भव्यदिव्य होणाऱ्या संमेलनास सामान्य समाज बांधवाची उपस्थिती असणे महत्वाचे आहे.या परिस्थितीस अनेक कारणं असू शकतात.
संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्य परिषदेच्या मानाणीय अध्यक्ष किंवा अखिल भारतीय साहित्य परिषदेकडे किती लेखकांची नावे आहेत? कार्यकरणीत कोण कोण आहेत ?जुन्याबरोबर नवीन म्हणजे बंजारा लेखकांची यादी तुमच्याकडे आहे का?अध्यक्षाची विनड लोकशाही पध्दतीने होते का?अध्यक्षाची निवड कशी होते?अध्यक्ष निवडणूकीत भाग घेण्यासाठी व मतदान करण्यासाठी काय नियम अटी आहेत? साहित्य संमेलन घेण्यासाठी लेखकांचे आपआपसात मतभेद आहेत का?मतदान घेत असाल तर त्यासाठी पात्र कोण आहेत?यादीत नाव असलेल्या लेखक विचारवंतापर्यत आयोजक किंवा संयजोक पोहचतात का?असे कितीतरी प्रश्न समोर उभे राहतात.केवळ प्रसिद्धीसाठी आपआपल्या बगलबच्यांनासोबत घेवून असे कार्यक्रम होणार असतील तर येथे असेच भविष्यात घडत राहणार. कोणतही गोष्ट यशस्वी करावयाची असेल तर समाजाची साथ पाहिजे. त्यासाठी समाज चळवळ उभी करावी लागेल. आर्थिक पाठबळ निर्माण करावं लागेल .समाजात आपल्या विषयी विश्वास निर्माण करावं लागेल.
संयोजक किंवा आयोजकच मीच कार्यक्रम यशस्वी करतो म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्यानुसार हे भव्य कार्यक्रम भविष्यात कधीच यशस्वी होणार नाहीत.झगमगाटात असलेले लेखक पुढे पुढे करणारे साहित्यिक व अंधारात चाचपडत असलेले पण झगमाटात असलेल्या पेक्षाही ते श्रेष्ठ असू शकतात, त्यांना उजेडात आणा. त्या सर्वांनासोबत घेवून पुढील भविष्यात लेखक,कवी,कथाकार यांना भव्य स्टेज मिळवून द्याल ही अपेक्षा.
_____________________________________
एक दिवशीय अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे घेतलेल्या संमेलनाचं सूप वाजलं. काही गोड काही कडू आठवणी घेवून स्थळ सोडलोत.श्रावन घाई करत होता.काका चला दिवस मावळतीला जाण्यापूर्वी शहरच्या बाहेर पडूत.गाडीत बसलो. श्रावन श्रावन महिन्यासारखं प्रसन्न मनाने गाडी दामटीत होता.गाडी अजीबात कां कू न करता जवळपास ताशी एकशे वीसच्या वेगाने पळत होती.रात्री नऊ वाजता एका ढाब्यावर मधूर जेवनाचं आनंद घेतलो.गप्पागोष्टी रंगल्या.गोपाळ चव्हाण साहेबांनी “मला रुपय पस्ताळीसच पाहिजे ” ही सुंदर गोष्ट सांगितली तर एनडीदादानी कविता म्हणली.आनंद जाधव यांनीही चहा वर कविता वाचली.
आनंद जाधवला बसवकल्यानला सोडून आम्ही निघालो.गाडी कधी तेलंगांनातून कर्नाटकात प्रवेश केली तेथून महाराष्ट्रात प्रवेशीत झाली हे कळालेच नाही.परतीचा मार्ग तेच होतं ;पण गाडीला घरची ओढ लागलेली होती. संध्याकळचे सात वाजले होते हैदराबाद शहर पार करताना.तर आहदपूरला पोहचायता पहाटेचे पावने एक वाजले होते.आमचा निरोप घेवून व देवून श्रावन राठोड व चव्हाण साहेब लातूरच्या दिसेने भन्नाट वेगाने निघून गेले .
मी व अवी रात्रीचा मुक्काम एनडीदादाच्या घरी करून पहाटे पाच वाजता तीन किमीची पायपीट करत व नांदेड हैदराबाद प्रवास सुखाचा आनंदाचा करत सहाच्या एसटी बसने नांदेड गाठलो.

 

राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड – ६.
९९२२६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *