भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो.अगोदर खेड्यांचा विकास झाला की,आपोआप राष्ट्र राज्याचा विकास घडवून येतो. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू मानला होता. ग्रामगीता या ग्रंथातील विचार सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सवलतीच्या दरात दहा रुपये किमतीत ग्रामगीता उपलब्ध करून दिलेली आहे.गावाच्या एकजुटीमध्ये सर्व विकास दडलेला असतो.जोपर्यंत गावातील लहान-थोर मंडळी चांगल्या कार्यासाठी एकत्रित येणार नाहीत, तो पर्यंत गाव विकासापासून वंचितच राहणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे कटू सत्य आहे.
गावाचा विकास करणारी व्यक्ती निरपेक्ष वृत्तीने काम करावे लागते. त्यांच्यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन असला पाहिजे.हे गाव माझे आहे. आणि मी या गावचा रहिवासी आहे. या जबाबदारीने गावात येणाऱ्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तेव्हा गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील काही गावे आदर्श का झाली ? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे त्या गावातील एकजूट असणारा समाज, व समाजातील परोपकारी व इतरांना सामावून घेणारी व्यक्ती होय. तुमच्यामध्ये जोपर्यंत एकजूट एकवाक्यता, एकता राहणार नाही. तो पर्यंत तुम्ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ,आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रगती गावात करू शकणार नाही. साखरेचा कण जसा दुधाशी एकरूप होतो. तसे सर्व व्यक्ती गावाशी एकरूप झाले पाहिजे. तेव्हाच सर्व सुख आपल्या पायाजवळ लोळणे घेतात. असे नाही झाले तर
सर्व योजनेपासून तुम्ही अनेक कोसो दूर राहणार ? प्रत्येक गावात बारा भानगडी असतात; हे जरी खरे असले तरी जुन्या काळात लोक अशिक्षित असून सुद्धा गुण्यागोविंदाने नांदत होते. आज सुशिक्षित असून सुद्धा वाद विवादाबरोबर प्रतिगामी जीवन जगत आहेत. कोर्टकचेरीत लोकांची संख्या वाढत आहे. आज छळ, दरोडे,
नक्षलवाद,अपहरण,व्यभिचार, अत्याचार,दुराचार, बलात्कार राजरोसपणे घडत आहेत.मी मोठा कार्यकर्ता, मी भावी…असे अनेक बिरुदावली लावून त्यामध्ये मागेपुढे समाज व्यवस्था बिघडून जात आहे. गावचा विकास करायचा असेल तर गावाला शाळेचा अभिमान असावा. वर्गणी द्वारे गावातील अनेक कामे करून घेता येतात. विद्यार्थ्यांना सर्व भौतिक, शैक्षणिक सुविधा देऊन उद्याचे सृजन नागरिक घडविता येतात.पाण्याची बचत करावी.पारावर गप्पा न करता वाचनालयात बसून वाचन संस्कृती जोपासावी. त्यासाठी विचाराची श्रीमंती प्रत्येक व्यक्ती जवळ असावी लागते. माझे शाळेत कोणी सध्या शिकत नाही, म्हणून कामात अडथळा आणू नये.आपल्या काळात काही झाले नाही म्हणून गैरसमज वाढवून गट तट करून कामाची वाट लावू नये. गावातील वातावरण नेहमी हलकेफुलके,स्वच्छ व पारदर्शक ठेवावे.सर्वांनी मिळून मिसळून सण साजरे करावेत. एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात.
अल्पसंख्याकांचा जरूर विचार करावा. जे का रंजले गांजले। त्याशी म्हणे जो आपुले।।या उक्तीप्रमाणे वागावे.दीन, दलित, दुबळे, पीडित, गरिबांना पुढे आणण्यासाठी गावातील थोर मंडळींनी पुढाकार घ्यावा. नेहमी सकारात्मक विचार मांडावेत. व्यसनापासून दूर राहावेत. गावात हातभट्टी, विषारी दारू,पत्ते मटका इतर वाईट कृत्ये होऊ नयेत.यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून अशा गोष्टी दूर कराव्यात.आज सुध्दा अनेक गावात भावकी भावकी मध्ये भांडणे आहेत.
तू माझ्यापेक्षा मोठा कसा? मी तुझ्या पेक्षा मोठा आहे. म्हणून येणाऱ्या शासकीय योजनेमध्ये सुद्धा अनेक अडथळे मुद्दाम निर्माण करतात. जिरवा जिरवीचे खेळ खेळतात. ग्रामीण भागात या खेळांना पहिले प्राधान्य दिले जाते. चहाडीला फार गोडी असते.भौतिक सुविधा बरोबर मानसिक सुख सुद्धा आज महत्त्वाचे आहे. हे तरुणांनी जाणून घ्यावे.गड्या आपला गाव बरा यानुसार वागावे.आणि म्हणावे. यारे यारे लहान थोर । याती नारी नर।। तेव्हा जगण्यास रंग येतो, म्हणून संत सोयरा बाई म्हणतात.अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग। मी तूंपण गेले वाया। पाहता पंढरीचा राया ।। यानुसार सर्वांनी मिळून मिसळून वागावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता प्रत्येकांनी वाचन करावी.
महाराष्ट्रातील आदर्श गावे प्रत्यक्ष पाहून घ्यावे.म्हणून त्यांनी ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली. त्यामुळे ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. आज आपण कोणत्याही शहरांमध्ये राहत असलो तरी,आपल्या गावाकडे आपले छोटेसे का होईना घर असावे. कोरोनाच्या काळामध्ये सर्वच लोकांना गावची आठवण आली. गड्या आपला गाव बरा म्हणून सर्व जण शहरे सोडून गावाकडे अहोरात्र चालत आले.
हे ही आठवण आपण ठेवावी.आदर्श गावाची प्रेरणा घेऊन आपले गाव सुधारावे ही अपेक्षा..
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* संस्थापक: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड