प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कंधार पोलीस ठाण्यावर मोर्चा

 

 

प्रतिनिधी, कंधार
——————–
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज, लोहा-कंधारच्या वतीने शुक्रवारी, ८ नोव्हेंबर रोजी कंधार पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
ओबीसी बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, बहुजन रिपब्लिक सोशाॅलिस्ट पार्टी, लोकराज्य पार्टी, जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲड.चंद्रसेन पाटील सुरनर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कौठा ता.कंधार येथे जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे संबोधित करणार होते. या सभेसाठी अॅड.चंद्रसेन पाटील, प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, माधव मुसळे, उत्तम चव्हाण व इतर कार्यकर्त्यांसह दोन वाहनांच्या ताफ्यासह बाचोटी मार्गे कौठा येथे जात असताना गुरुवारी, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास बाचोटी ता.कंधार येथे पूर्वनियोजितपणे प्रचारापासून रोखण्याच्या उद्देशाने व जीवे मारण्याच्या उद्देशाने. जवळपास १५० लोक सर्व रा.बाचोटी ता.कंधार यांनी वाहनाचा ताफा व रस्ता अडवून थांबवला. तसेच गाडीच्या बोनेटवर व फुटरेस्टवर चडून काचावर, गाडीवर बुक्या, दगड व हातातील काठीने मारहाण केली. त्यामुळे वाहन क्रमांक एम एच-५० एल ३४५ या वाहनाचा मागचा काच फोडून नुकसान केले. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील याचा विजय असो, प्रा.लक्ष्मण हाके यांचा निषेध असो, अशा घोषणा देत अंगावर मारहाण करण्यासाठी धावून आले.

 

या घटनेच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज, लोहा-कंधारच्या वतीने शुक्रवारी, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कंधार पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक, भीमगड, कंधार येथून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. एकच पर्व ओबीसी सर्व, आशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या मोर्चाला प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे व अॅड.चंद्रसेन पाटील यांनी संबंधित केले. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले.

या मोर्चात ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके, ओबीसी आरक्षणाचे आंदोलक नवनाथ वाघमारे, ओबीसी बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड.चंद्रसेन पाटील, नांदेड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश भोसीकर, गोल्ला गोलेवार समाजाचे नामदेव आयलवाड, माजी पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, आंबुलग्याचे सरपंच प्रतिनिधी माधव मुसळे, प्रदिप सोनटक्के, बबन जोंधळे, कृष्णा केंद्रे यांच्यासह ओबीसी समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.

ओबीसी उमेदवारांना संरक्षण द्या- प्रा.लक्ष्मण हाके

या मोर्चाला संबोधित करताना ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले, माझ्यावर पहिल्यांदा पुण्यात हल्ला झाला होता. त्यानंतर बाचोटी ता.कंधार येथे माझ्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित होता. शरद पवार, मनोज जरांगे, संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्याला सरकार व पोलीस प्रशासन जबाबदार आहे. या घटनेची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. आम्ही आमच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बोललो तर तुम्ही हल्ला करणार का? तुम्ही निजामाची औलाद आहे का? महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागीरी नाही. विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे. विधानसभा निवडणुकीतील ओबीसी उमेदवारांना संरक्षण दिले पाहिजे. ओबीसींचे मते ओबीसी उमेदवारालाच मिळाली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *