◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*कवी – केशवकुमार (प्र.के.अत्रे)**कविता – आजीचे घड्याळ*
प्रल्हाद केशव अत्रे (उर्फ आचार्य अत्रे).टोपण नाव – केशवकुमार.
जन्म – १३/०८/१८९८ (सासवड).
मृत्यू – १३/०६/१९६९ (मुंबई).
लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी, वक्ते, अध्यापक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व.
आचार्य अत्रे हे महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी उभ्या राहिलेल्या चळवळीचे ते एक प्रमूख नेते होते. कथा, कादबरी, कविता, नाटक, चरीत्रलेखन, वृत्तपत्र लेखन असे अष्टपैलू झंझावती व्यक्तीमत्व होते.
परखड फर्डे वक्ते, भाषणात हजरजबाबीपणा, मार्मिक व विनोदी शैली यामुळे त्यांचे विचार भाषणे ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होत असत.
अत्रे यांच्या परखरड स्वभावामुळे बऱ्याचवेळा त्यावेळच्या काही साहित्यिकांसोबत, नेत्यांसोबत त्यांचे अगदी टोकाचे मतभेद वादविवाद झाल्याचे दिसून येते. असं जरी असलं तरी अत्रे यांचा सर्वच क्षेत्रात विलक्षण दबदबा होता.
जनमानसावर प्रचंड पगडा होता. पुणे आणि लंडन येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते.नवयुग वाचनमाले द्वारे त्यांनी लिहिलेले शालेय क्रमिक पुस्तक हे अत्रे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील मोठे योगदान आहे.
“केशवकुमार” या टोपण नावाने त्यांनी विडंबन काव्ये लिहिली. रवीकिरण मंडळ आणि केशवसूतादी जुन्या कवींच्या काव्यांची रंगतदार विड़बने त्यांनी लिहिली आहेत. “झेंडुची फुले” हा त्यांच्या विड़बन काव्यांचा कवितासंग्रह १९२५ मध्ये प्रकाशित झाला.
या विडंबन काव्यांचा स्वतंत्र काव्यप्रकार म्हणून मराठीच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश आढळतो. १९३५ मध्ये “गीतगंगा” हा त्यांचा दुसरा कविता संग्रह प्रकाशित झाला. या व्यतिरीक्त “कऱ्हेचे पाणी” हे त्यांचे आत्मचरीत्र (खंड एक ते पाच) प्रकाशित झाले.
तो मी नव्हेच, प्रीतीसंगम, बुवा तेथे बाया, मोरूची मावशी, साष्टांग नमस्कार अशी एका पेक्षा एक २२ गाजलेली नाटके अत्रे यांनी लिहिली. १३/०६/१९६९ ला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अनेक अप्रकाशित कलाकृती प्रकाशनाच्या मार्गावर होत्या.
१९४२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५५ मध्ये बेळगाव येथे झालेल्या ३८ व्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.दहावे मराठी पत्रकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते.बडोदे, ग्वाल्हेर, इंदौर अशा प्रादेशिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते.
अत्रे हे एकाचवेळी विविध क्षेत्रात तोलामोलाची कामगिरी करून आपला वेगळा ठसा उमटवणारं अजरामर व्यक्तिमत्व होते.आज आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ अनेक ठिकाणी साहित्यिक संस्था साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. हीच अत्रे यांच्या जनमानसातील प्रसिद्धीची पोचपावती आहे.
आम्ही कोण म्हणून काय पुसता, आजीचे घड्याळ, प्रेमाचा गूलकंद अशा केशवकुमार यांच्या अनेक कविता गाजलेल्या आहेत. त्यातलीच “आजीचे घड्याळ” या कवितेचा आनंद आपण घेणार आहोत.-
————————-
-“आजीचे घड्याळ” ही केशवकुमार यांची शार्दूलविक्रीडीत या वृत्तातील कविता आहे. आजी सकाळी उठण्या उठवण्यापासून दिवसभरातील सर्व व्यवहार ते रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टी कशा वेळेत करते, याचे कवीला आश्चर्य वाटते.
आणि हे आजीचे टिक टिक न करणारे, चावी द्यावी न लागणारे, पण अचूक वेळ सांगणारे घड्याळ आजी कुठे दडवून ठेवते याबद्दल कवीला उत्सुकता आहे. आजी दिवसभरातील साऱ्या कामांच्या वेळा कशा अचूक साधते यावर मार्मिकपणे भाष्य करणारी ही कविता आहे. ही कविता शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात होती…
आजीचे घड्याळ
———————
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते
“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,
“जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !”
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
“आली ओटिवरी उन्हे बघ!” म्हणे आजी, “दहा वाजले
जा जा लौकर !” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.
खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, “खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !”
आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, “गोष्टी पुरे ! जा पडा !
‘लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा
सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !
◆◆◆◆◆
केशवकुमार
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.■■■