महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल अविश्वसनीय असा लागल्याने देशभरातील अनेक तज्ञ, पत्रकार, राजकीय अभ्यासक आणि इतर अनेक लोक आपापल्यापरीने या निकालाचे विश्लेषण करीत आहेत. महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव यावर मविआच्या नेत्यांचा अजूनही विश्वास बसेनासा झालेला आहे.
महायुतीच्या महायशामागे अनेक कारणे दडलेली आहेत. त्यात प्रामुख्याने पुढील कांही ढोबळ कारणं दिसून येतात.
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माइक्रो प्लानिंग*
एकीकडे मविआवाले लोकसभेच्या निकालामुळे हवेत तरंगत असतांना दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीतील चुका शोधून संघाने त्यावर माइक्रो प्लानिंग करुन कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष काम केले. मराठा आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून लहान लहान जातींसोबतच विमुक्त – भटक्या समाजाचा विश्वास संपादन करुन घेतले. आणि वाडी, तांडे, वस्त्यापर्यंत यंत्रणा पोहोंचवली. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या मतदार संघात खाचखळगे पडलेले होते ते योग्य पद्धतीने भरुन काढले.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे संघाने मृत हिंदू चेतना जागवली. त्याला कारणेही तशी होती. मविआचे तुष्टीकरणाचे राजकारण देशासाठी कसे घातक ठरत आहे, हे संघाने व्यवस्थितपणे हिंदू, जैन, शिख आदी धर्मांबरोबरच विविध पंथ संप्रदायांच्या मनावर खोलवर रुजवले. त्यामुळे हिंदू बरोबरच अन्य धर्माची मते एकवटली. याशिवाय जरांगेच्या आंदोलनामुळे महायुतीचे होणारे संभाव्य नुकसान ओबीसी समाज महायुतीकडे सहज वळल्यामुळे ते नुकसान होण्याची शक्यता मावळली. त्यामुळे महायुतीचा मार्ग अधिक सुकर झाला.
*फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात “बटेंगे कटेंगे” ची भाषा चालणार नाही.*
तुष्टीकरणाविरोधात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “बटेंगे तो कटेंगे” चे हत्यार उपसले. आणि विरोधकांकडून फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात ही भाषा चालणार नसल्याचा सुर आवळला गेला. दुसरीकडे मविआचे नेते मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन *पंधरा मिनीट, पाकिस्तान आणि बांगला देशातील मुस्लिमांना सोबत घेऊन भारतावर कब्जा करु. आमचे वागणे तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे निघुन जा. याचा अर्थ हिंदूनी देश सोडून जावे.* अशी वल्गला करणाऱ्या देशातील विघटनवादी कट्टरपंथी मुस्लिमांनाविरुद्ध ‘भ्र’ सुद्धा काढत नव्हते. याचा अर्थ हिंदूसह अन्य समविचारी धर्मीयांनी जो घ्यायचा तो घेतला आणि आपली ताकद ईव्हीएमव्दारे दाखवली. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. सरळ सरळ ही फक्त निवडणूक नव्हती तर एक प्रकारचे धर्मयुद्धच होते.
*महाविकास आघाडी बेसावध राहिली !*
लोकसभेच्या निकालाने मविआचे नेते एवढे हुरळून गेले होते की, विना प्रचाराने विधानसभेवर आपण सहज कब्जा करु या भ्रमात ते राहिले. दुसरे असे की महायुतीच्या नेत्यांमध्ये जी एकवाक्यता होती ती एकवाक्यता मविआत दिसली नाही. तीसरी प्रमुख गोष्ट म्हणजे मविआचे नेतृत्व कोण करणार ? हे गुलदस्त्यात ठेवून जनतेला गृहीत पकडले गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही सत्तेत आल्यावर कोणकोणत्या जनकल्याकारी योजना राबविणार आहोत ? त्या योजनांची माहिती प्रभावीपणे जनतेच्या गळी उतरविण्यात मविआ कमी पडली. मविआने विशेष करुन मराठा समाजाला गृहीत धरले. जरांगे यांची तासातासाला बदलणारी भूमिका मराठा समाजाला आवडत नव्हती. बोलायची मुभा नसल्यामुळे कोणीही बोलत नव्हते. शेवटच्या क्षणी जरांगेनी घेतलेली भूमिका मराठा समाजाच्या पचनी पडली नाही. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटले तसा निर्णय घेतल्याने मराठा समाजाची मते महायुतीकडे वळाल्याचे चित्र निकालावरुन दिसते.विशेषतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मागील अडीच वर्ष खोके, गद्दार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना शिवीगाळ करण्यात जेवढी शक्ती खर्च केली त्याच्या निम्मी शक्ती जरी सत्तेवर आम्ही आल्यावर जनतेच्या कोणकोणत्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करणार यासाठी किंवा कोणकोणत्या जनकल्याणकारी योजना आम्ही राबवणार आहोत याची माहिती देण्यावर खर्च केली असती तर कदाचित आजचे चित्र यापेक्षा वेगळे राहु शकले असते. पण मग्रुरी आणि मस्तवालपणाची भाषा अधिक वापरली गेली. त्यामुळे निकालानंतर ” ई क्या हो गया ? म्हणायची वेळ आली आहे. महाविकास आघाडीच्या पानीपताला संजय राऊत सारख्याचा अतिआत्मविश्वास आणि टोकाचा वाचाळपणासुद्धा कारणीभूत आहे. हेही नाकारुन चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत १५८ विधानसभा क्षेत्रात महायुती मागे होती. त्याची कारणं शोधून त्यावर उपाय करण्याची रणनीति संघ परिवार आणि भाजपाने आखली. आणि त्यावर नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. असे खळगे लाडकी बहिण योजनेसारख्या अन्य योजना घोषित करुन भरुन काढले. दुसरीकडे महाविकास आघडीवाले या १५८ जागा आपल्या खिशात आलेल्या आहेत असे समजून गाफिल राहिले. या गाफिलपणाची किंमत त्यांना चुकवावी लागलेली आहे. हे निकालावरुन दिसते. ईव्हीएमवर खापर फोडण्याऐवजी आपल्या चुका प्रामाणिकपणे स्विकारुन जनतेचा कौल त्यांनी मान्य केला पाहिजे.
*महायुतीने अपप्रचाराची तीव्रता कमी केली*
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या प्रकारचा खोडसाळ जो अपप्रचार केला गेला होता, तसा अपप्रचार यावेळी त्यांना करता आला नाही. फेक नरेटिव्हवर यावेळी विशेष करुन भाजपाने योग्य उतारा शोधून काढल्या कारणाने महाविकास आघाडीचे फेक नरेटिव्हचे हत्यार बोथट झाले. प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीकडून शिळ्या कढीलाच जास्त उत दिल्या कारणाने जनता जास्त प्रभावित होऊ शकली नाही.
महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे सुद्धा विजयश्री अवाक्यत आली. महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विविध जातीच्या संदर्भात घेतलेले निर्णयसुद्धा खुप फायद्याचे ठरले . उदाहरणार्थ – राज्यातील बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज बंजारा/लभाना तांडा सुधार योजना व इतर कांही निर्णय शासनाने घेतले. त्यामुळे बंजारा समाजाची मते मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या पारड्यात पडली. अशाच प्रकारे इतर लहान लहान जातींवर भाजपा व संघाने काम करुन त्यांची मते महायुतीकडे वळवली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व जातीच्या साधु संताना राष्ट्रीयता व हिंदुत्वाचा मुद्दा देऊन प्रचारात प्राण ओतण्याची जबाबदारी टाकली. आणि ती जबाबदारी सर्व साधु संतानी मोठ्या खुबीने पार पाडली. यात गैर असे कांहीही नाही.*”पाकिस्तान धार्जीणी लोक जर आमचे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही देश सोडून जा. असे ८०% हिंदूना कोणी म्हणत असतील तर हिंदू साधु संतांनी मंदिरात घंटा वाजवण्याचेच काम करायचे का ?”* निवडणुका येतात जातात. पण या घातक प्रवृती विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षाने कधी तरी तोंड उघडले पाहिजे. या देशात तुष्टीकरणाचे राजकारण चालणार नाही. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे.
*महायुतीने टार्गेट ठरवून प्रचार केला*
महायुतीच्या महायशाचे एक महत्वपूर्ण कारण असे ही आहे की, त्यांनी अधिक दोनशेचे टार्गेट ठरवून, या आकड्यापर्यंत पोहोंचण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन योग्य प्रकारे प्रचार यंत्रणा राबवून अपेक्षित निकाल पदरात पाडून घेतलेला आहे. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपा आणि संघाची पूर्ण ताकद मिळाल्याकारणाने हे दोन्ही पक्ष अधिक मजबुत झाले. हे वास्तवही नाकारुन चालणार नाही.
महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या मेहनतीने १६० जागा मिळाल्या असे गृहीत धरले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यात ७० जागांची निश्चितपणे भर घातलेली आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दोन्हीची गोळा बेरीज केली तर ती २३० होते. या आकड्यापलिकडे निकाल लागलेला आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटणे साहजिकच आहे.
याउलट महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालावर जास्त विसंबून राहिली. आपला विजय निश्चित आहे असे गृहीत धरले. त्यामुळे त्यांना ना जनतेच्या मनावर त्यांचा जाहीरनामा पेरता आला. ना प्रचारात आघाडी घेता आली. महायुतीची रणनीति त्यांना ओळखता आलीच नाही. त्यामुळे अविश्वसनीय, अकल्पित निकाल आलेला आहे. ही वस्तुस्थिती अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे निकालात घोटाळा आहे म्हणण्यात कांहीही अर्थ नाही.*शरद पवार आणि उद्धव ठाकरेचे पुढे काय ?*
या निवडणुकीत सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर उद्धव ठाकरेचे. नजीकच्या काळात हे नुकसान सहज भरुन निघण्याची शक्यता धुसर आहे. कारण शिवसेनेचा प्राण कट्टर हिंदुत्व आहे. हा प्राणच उद्धव ठाकरे यांनी काढून टाकल्या कारणाने या पक्षाची पुढील वाटचाल खुप अवघड आहे. त्यामुळे शिंदेची शिवसेना हिच बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे, यावर जनतेनी शिक्का मारलेला. उद्या सुप्रीम कोर्टाने जरी उद्धव ठाकरेच्या बाजूनी निकाल दिला तरीही हिंदू मत त्यांच्या बाजूने झुकेल असे दिसत नाही. सध्या उद्धव ठाकरे पुढे एक मोठे आव्हान आहे. ते म्हणजे जे आमदार निवडून आलेले आहेत ते त्यांनी पाच वर्ष आपल्या गोठात सांभाळून ठेवणे. हे त्यांनी साध्य केले तरीही त्यांनी खुप कांही साध्य केल्यासारखे होईल. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांना डोक्यावरुन खाली उतरवून पक्षाच्या जबाबदारीतून दीर्घकालीन सक्तीच्या रजेवर थंड हवेच्या ठिकाणी पाठविले तर पक्षाचे कांही प्रमाणात शुद्धिकरण होईल. आणि पक्षाला उभारी घेण्यास थोडीफार मदत होईल. महाराष्ट्रीयन जनता वाचाळपणा आणि शिवराळ भाषा जास्त दिवस सहन करीत नाही. हे या निकालावरुन सिद्ध झालेले आहे.
शरद पवार यांचे या निवडणुकीत कोणतेही नुकसान झालेले नाही. कारण दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पवार परिवाराकडेच असल्यामुळे निकालानंतर जास्त खदखद कुठेही दिसत नाही. नजीकच्या काळात सर्व पवार परिवार एकत्र बसून घरातल्या भांडणाला पूर्णविराम देऊन अजित दादाच्या हाती राष्ट्रवादी कॉंग्रेस दिली गेली तर ते नवलाचे वाटू नये. कारण शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला फारसे भविष्य नाही. हे शरद पवारही जाणून आहेत. शरद पवार यांनी राजकारणातून निवृती घेतली तर अजित दादांच्या तोडीचा नेता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. त्यामुळे शरद पवारनंतर त्यांच्या पक्षाला सुद्धा घरघरी लागू शकते. याकरीता पवार परिवार एकत्र येणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्राच्या हिताचे ठरु शकते.
काँग्रेसला मजबुत नेतृत्व नसल्यामुळे त्याचे भविष्य काय असेल हे सांगण्याची कोण्या ज्योतिषाची गरज नाही.
लोकशाही व्यवस्थेत मजबुत, सक्षम विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे. पण इंडिया आघाडीच्या नेत्यांकडे पाहिले तर सारे निष्प्रभ, मरगळलेले नेते आहेत.
तसे पाहिले तर राज्यात विशेष असे कांहीही घडलेले नाही. २०१४ आणि २०१९ च्या युतीची पुनरावृती यावेळीही झालेली आहे. २०२४ ला युतीची महायुती झाल्याकारणाने फक्त जागा जास्त वाढलेल्या आहेत. २०१९ मध्ये जनतेनी युतीला कौल दिला होता. पण उद्धव ठाकरेमुळे युती सत्तेवर येऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरेला त्यांची जागा दाखवून चक्रवाढ व्याज दराने जनतेनी त्याची भरपाई करुन दिली असेल तर त्यात जनतेचा किंवा ईव्हीएमचा काय दोष आहे ?
बाकी ईव्हीएम, पैसा, जातीवाद, धर्मवाद, आरएसएस यावर अनंत काळापर्यंत चर्चा चालूच राहणार आहे. जे समोर आहे ते मोठ्या मनाने सर्वांनी स्विकारुन नवीन सरकारचे स्वागत केले पाहिजे.*महायुतीने जमिनीवर रहावे*
ज्या प्रकारचे महायश महायुतीला मिळालेले आहे. ज्या प्रकारे महायुतीवर गरीब, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी वर्गाने आणि सर्वसामान्य जनतेनी जो विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला पात्र राहुन नव्या सरकारला काम करावे लागेल.
आज राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मालाला हंगामात योग्य भाव न मिळणे, महागाई, गरीबी, बेरोजगारी, जातीचे खोटे दाखले काढून दुर्बल घटकांच्या सवलती लाटणाऱ्यांचा सुळसुळाट, पेपर फुटी, शिक्षणाची दुरावस्था अशा अनेक ज्वलंत समस्या राज्यात आहेत. त्यावर नव्या सरकारला प्राधान्यक्रमाने काम करण्याची आवश्यकता आहे.
एखाद्या निवडणुकीत मिळणारे यश सदासर्वकाळ मिळत नसते. या निवडणुकीत ज्याप्रकारे मुळ विमुक्त भटक्या जाती जमातींसहित ज्या लहान लहान जाती जमातींनी, महायुतीच्या संकटकाळी मदत केली आहे. त्यांची कुठेही प्रतारणा होणार नाही. याचे भान ठेऊन येणारे नवीन सरकार काम करेल अशी आशा करु यात.*फुलसिंग जाधव*
( सामाजिक कार्यकर्ता )
छत्रपती संभाजीनगर
८९९९०९८३६५
———————————