नांदेड, दि. ४ जानेवारी २०२५:
भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी रविवारपासून आपल्या मतदारसंघात विशेष जनसंपर्क मोहीम राबवणार आहेत.
सध्या देशभरात भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी सुरु आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी ५ ते ११ जानेवारी दरम्यान विशेष जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी ५ जानेवारीला भोकर, अर्धापूर, मुदखेड, मालेगाव, भोकर फाटा व बारड, ६ जानेवारीला कोंढा, ७ जानेवारीला भोसी, ८ जानेवारीला कामठा बु., ९ जानेवारीला भोकर व मालेगाव, १० जानेवारीला अर्धापूर तर ११ जानेवारीला लहान, पाळज, बारड येथे विशेष कक्ष उभारून भाजपची सदस्य नोंदणी केली जाणार आहे.
७ ते १० जानेवारी दरम्यान आ.श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात बैठकी व नोंदणीचे कार्यक्रम होणार आहे. या मोहिमेत भाजपच्या विविध प्रकोष्ठमार्फतही सदस्य नोंदणी अभियान राबवले जाईल. नागरिकांनी मोठया संख्येने ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला आपले समर्थन द्यावे, असे आवाहन आ. श्रीजया चव्हाण यांनी केले आहे.