पोलीस व होमगार्ड यांची उल्लेखनीय संयुक्त कारवाई
नांदेड- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मंगळसुत्र शिताफीने लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज पोलीस व होमगार्ड यांनी रंगेहाथ पकडले.
श्री. खंडोबारायाच्या दर्शनासाठी माळेगांव यात्रेत देशभरातील लाखो भाविक दरवर्षी सहभागी होतात. यात्रेत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्ट्रायकिंग क्रमांक सात मधील कर्मचारी आज गस्त घालत असताना त्यांना दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.त्यांनी त्यांना हटकून अधिक चौकशी करून त्यांची झडती घेतली असता तीन मंगळसूत्र त्यांच्याकडे आढळून आले.सदरील महिला मंगळसूत्र चोरीसाठी यात्रेत आले असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना लगेच ताब्यात घेतले.
स्ट्रायकिंग क्रमांक सातचे पोलीस जमादार बालाजी तुकाराम तोरणे, होमगार्ड रामेश्वर अवातिरक,साईनाथ गोंदगे, व्यंकटी देवकत्ते, विनायक गोंदगे, अमोल राठोड,महिला होमगार्ड आकांक्षा बैकरे, काजल वारे – इंगोले यांनी ही कारवाई केली.