सोलापूर ; प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर मनपा यांच्या सहकार्याने व राज्य शिक्षक महासंघाच्या सौजन्याने गीतापरिवार – सर्व कल्याण योग – स्काय आणि हेमा फाऊंडेशन मुंबई यांचे वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत शहरातील सर्व माध्यमांच्या इच्छुक शिक्षकांसाठी योगसोपान-१ ही १६ आसनांची क्रमबद्ध श्रृंखला तसेच लघुपटांसहित नैतिक मूल्य संवर्धन या संदर्भात शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा एन के ऑर्किड स्कूल येथे संपन्न झाली. याचे उद्घाटन मनपा उपायुक्त, प्रशासन अधिकारी गिरीश पंडीत व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उप शिक्षण अधिकारी स्वाती हवेले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. दर शनिवारी योगाभ्यास व जीवनमूल्यांचे संस्कार आवर्जून विद्यार्थ्यांमधे शाळेच्या माध्यमातून रुजावेत, यासाठी ही प्रशिक्षण कार्यशाळा असून आपापल्या विद्यार्थ्यांमधे सद्गुणांचे सिंचन अवश्य करण्याचे आवाहन दोन्ही अधिका-यांनी केले.
या कार्यशाळेत शहरातील मराठी, इंग्लिश, कन्नड, तेलुगु व ऊर्दू माध्यमांच्या १०० शाळांच्या शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिक्षकांकडून इयत्ता तिसरी ते सातवीच्या नोंदणीकृत २६५१७ विद्यार्थ्यांना सदर प्रशिक्षण यापुढे दर शनिवारी देण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेमधे गीतापरिवार स्काय च्या राष्ट्रीय समन्वयक संगीता व तांत्रिक सहयोगी मिहिर सुरेश जाधव यांनी योगसोपान आसन श्रृंखलेचे प्रशिक्षण डाॅ. संजय मालपाणी रचित क्रमबद्ध व्हिडीओ क्लिप दाखवून प्रत्यक्ष शिक्षकांकडून करवून घेतले. नैतिक मूल्य संवर्धन या सत्रामधे नमुना म्हणून महेंद्र काबरा निर्मित दगडू हा आत्मविश्वास या जीवनमूल्यावर केंद्रित लघुपट दाखवून प्रश्नोत्तरातून व संबंधित प्रेरक आदर्श व्यक्तिमत्वाची कथा सांगून मूल्य निर्मिती कशी करायची याचे प्रशिक्षण हेमा फाऊंडेशन चे राष्ट्रीय सचिव धीरज सोनार यांनी दिले.
राज्य शिक्षक संघटनेचे सचिव कृष्णा हिरेमठ यांनी या कार्यशाळेचे समन्वयन केले. गीता परिवार सोलापूर शाखेचे अध्यक्ष ओम भैय्या दरक यांनी समर्पक सूत्र संचालन तर सचिव शिवशरण वाणीपरीट यांनी आभार प्रदर्शन केले. आकाश झळकेनवरु, आर्या यादव, ऋतुराज साठे,ओवी शिंदे तसेच गीता मिठ्ठा, गीतांजली पावसकर,गीता गंजूल यांनी कार्यशाळेचे अचूक संयोजन केले.
समारोपात ऑर्कीडचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी नूमविच्या नवगिरे, शरदचंद्र प्रशालेचे अमोल मते, विवेकानंद पब्लिक स्कूलचे विठ्ठल वाकचौरे,राजवर्धन प्रशालेच्या सपताळे यांनी रंजक पद्धतीने अभिप्राय व्यक्त करीत सर्वांची मने जिंकली.
गीतापरिवारचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शहात्तराव्या जन्मदिवशी उपस्थित शहात्तर शिक्षकांकडून योग व संस्कार विद्यार्थ्यांमधे रुजवण्याचा शुभसंकल्प करण्यात आला.