लाखो भाविकांचे श्रध्दास्थान : उमरज येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान

 

 

चला उमरजाशी जावु ।
नामदेव डोळा पाहु ।।
होतील गुरुबंधुंच्या भेटी ।
सरतील संसाराच्या कटकटी ।।
नाम घेवु नाम देवु ।
नाम नामदेवा वाहु ।।
हरेल भवाचे बंधन ।
नामदेवा जाता शरण ।।

कंधारपासून १२ किलोमीटर अंतरावर उमरज हे छोटेसे गाव आहे. मन्याड नदीच्या तीरावर व एका उंच टेकडीवर हे गाव वसलेले आहे. चारही बाजूने ते डोंगराने वेढलेले आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ ९६१ हेक्टर आहे. या गावात श्री संत नामदेव महाराज संस्थान आहे. उमरजची भूमी श्री संत नामदेव महाराजाच्या जन्माने पुनीत झालेली आहे. हे संस्थान धाकटे पंढरपूर म्हणून आज ओळखले जाते. दळणवळणाची साधने नाहीत, अशा परिस्थितीत अत्यंत सुंदर, रेखीव असे नयन मनोहरी आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले श्री संत नामदेव महाराज संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र नाही तर इतर राज्यातून सर्व जाती, धर्माचे भाविक येत असतात. उमरज संस्थानाला २५२ वर्षांची परंपरा आहे. या संस्थानला तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा मिळाला आहे.

सटवाजी व जानकाबाई यांच्या पोटी कंधार तालुक्यातील उमरज येथे श्री संत नामदेव महाराज यांचा जन्म शिंपी कुटुंबांमध्ये झाला. जानकाबाई यांचे ते आठवे पुत्र होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री १२ वाजता त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव कृष्ण असे ठेवण्यात आले होते.‌ परंतु पंढरपूरातील पांडुरंगाने प्रत्यक्ष ‘नामदेव’ असे नामकरण केले, असे सांगितले जाते. बालपणापासून त्यांच्यावर देव आणि धर्माचे संस्कार होते. उमरजचे श्री संत नामदेव महाराज हे श्री संत श्रेष्ठ नामदेव महाराजाचे अवतार मानले जातात. त्यामुळे त्यांचे केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते. या दोघांच्या चरित्रात अनेक साम्ये आढळतात, असे सांगितले जाते. श्री संत नामदेव महाराज हे ब्रम्हचारी होते. श्री संत नामदेव महाराज हे बनवस गावच्या जैवतदेवाचे शिष्य होते. त्यांनी जैवतदेवाना आपले गुरू मानले होते. त्यांच्यावर पंढरपूरच्या पांडुरंगाची कृपा होती. श्री संत नामदेव महाराज यांनी आपल्या भक्तांना साधा सरळ भक्तिमार्ग सांगितला आहे. मोक्षाचा मार्ग दाखवला. तसेच परस्परातील भेदभाव, जाती-धर्माची जळमटे दूर सारुन प्रेमाची शिकवण दिली.

श्री संत नामदेव महाराज हे चमत्कारी पुरुष होते. त्यांच्या श्री गुरु नामदेव चरित्र ग्रंथात अनेक चमत्कारांचा उल्लेख आढळतो. त्यांनी आपल्या भक्तांना अनेक चमत्कार दाखविले आहेत. काही ठिकाणी असाध्य रोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना आपल्या प्रेमळ स्पर्शाने बरे केले. पंढरपूरी श्री विठ्ठलास नामदेवांनी जेवू घातले हे सर्वश्रुत आहे. तसेच या अवतारी नामदेवांनी श्री मारुतीरायाच्या पाषाण मूर्तीला सर्व भक्तांच्या समोर पनीर घाऊ घातले. आपल्या भक्तांना प्रत्यक्ष मारोतीचे दर्शन घडविले. मृत झालेल्या एका बाईला व एका मुलास जीवंत केले, असे अनेक चमत्कार घडविले आहेत. या प्रसंगावरुन यांची प्रत्यक्ष अनुभुती येते. त्यांचा श्री गुरु नामदेव चरित्र ग्रंथ आहे. जो ओवीबद्ध आहे. या ग्रंथामध्ये श्री संत नामदेव महाराजांच्या जीवन कार्याचे दर्शन घडते. आजकाल चमत्कारावर विश्वास ठेवला जात नाही. त्याकाळी चमत्कार दाखवणे गरजेचे होते. परंतु अशा त्यागमूर्ती तथा निष्काम कर्मयोगी संतांच्या आयुष्यातील चमत्कार काढून टाकला तर त्यामागे विज्ञान असल्याचेच निष्पन्न होते. त्याकाळी माझे आजोबा झोटींगा कांबळे हे नावाजलेले सुतार होते. त्यांना अनेक गावची सुतारकी होती. माझे आजोबा झोटींगा कांबळे आणि श्री संत नामदेव महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. आमच्या घरी श्री संत नामदेव महाराज येत-जात होते. या मठ संस्थान बांधकामासाठी लागणारे लाकडी साहित्य त्यांनी तयार करून दिले होते. श्री गुरु नामदेव चरित्र ग्रंथात सुतार कारागीरचा उल्लेख आढळतो.

श्री संत नामदेव महाराज यांनी इ.स.१७७२ मध्ये उमरज या गावात श्री संत नामदेव महाराज संस्थानची स्थापना केली. यामुळे या संस्थानला विशेष महत्त्व आहे. या संस्थानचा विस्तार जवळपास २५ एकर परिसरात आहे. या संस्थानामध्ये त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर स्थापन केले. या संस्थानात वयाच्या ९८ व्या वर्षी श्री संत नामदेव महाराज ((इ.स.१७७२ ते १८७०) यांनी ‘संजीवन’ समाधी घेतली. तसेच या संस्थानामध्ये दुसरे मठाधिपती लक्ष्मण महाराज (१८७० ते १९०७), तिसरे मठाधिपती तुकाराम महाराज (१९०७ ते १९१०), चौथे मठाधिपती नागनाथ महाराज (१९१० ते १९१६), पाचवे मठाधिपती एकनाथ महाराज (१०१६ ते १९७४), सहावे मठाधिपती उध्दव महाराज (१९७४ ते २००६) यांच्या देखील समाध्या असून त्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. हे संस्थान आध्यात्मिकता आणि संस्कृतीचे दर्शन घडवते. याठिकाणी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांतील हजारो भाविक वर्षभर येत असतात. संस्थानात जाऊन श्री संत नामदेव महाराजाचे दर्शन घेतात. या ठिकाणाबाबत त्यांच्यामध्ये भक्ती आणि भाव असतो. या संस्थानाचा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर व रमणीय आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीला जाऊ शकले नाहीत, ते भाविक उमरजच्या श्री संत नामदेव महाराजांचे भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद मिळतो. म्हणून उमरज हे धाकटे पंढरपूर म्हणून आज ओळखल्या जाते. या संस्थानास भाविकांकडून दान मोठ्या प्रमाणात दिले जाते.

श्री संत नामदेव महाराज संस्थानच्या क्षितीजावर नवा सुर्योदय झाला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात म्हणजे दि.२७ जुलै २००७ सोमवार या शुभदिनी श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती म्हणून श्री एकनाथ महाराजांचा ब्राह्मणांच्या मंत्रघोषात सर्व विधियुक्त कार्यक्रम संपन्न झाला. श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती श्री एकनाथ महाराज यांची सातवे मठाधिपती म्हणून विधिवत गादी स्थापना झाली. आणि संस्थानच्या विस्तार कार्यास एका नव्या उमेदीने भरभराट होण्यास सुरुवात झाली. शिष्य समुदाय असो, वा स्थावर मालमत्ता असो. तसेच धार्मिक कार्य, श्री नामदेव महाराज संस्थानचे संस्थापक, मठाधिपती यांचा जन्मोत्सव जवळपास दोनशे वर्ष्यांच्या कालावधी नंतर साजरा करण्याची अत्यंत महत्वपुर्ण सुरुवात करण्याचे भाग्य यांच्याच हातुन घडले. या गादीचे पाचवे मठाधिपती श्रीगुरु एकनाथ महाराज यांनी श्री संत नामदेव संस्थानच्या विस्ताराचे काम हाती घेतले. त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मीणी मंदिराच्या मागे पुर्वी डोंगर होता. तो पुर्ण डोंगर भूईसपाट करुन दोन मजली दगडी बांधकाम करुन घेतले होते. संस्थानच्या वतीने ‘यज्ञ’ करण्याची प्रथा याच श्रीगुरुंनी सुरु केली होती. त्यांनी तीन यज्ञे केली. याच काळात खऱ्या अर्थाने श्री संत नामदेव महाराज संस्थानची भरभराटीची सुरुवात झाली. आंध्र प्रदेशातील फार मोठा शिष्यवर्ग त्याच्याच काळात निर्माण झाला. कोल्हारी, मंन्नुर, मुत्नुर आदी गावातील भाविक मंडळी फार मोठ्या संख्येने शिष्यवर्ग निर्माण झाला. आणि याच काळात राजकीय मंडळीही या संस्थानकडे आकर्शित होऊ लागली. मंत्री, आमदार, खासदारांचा ओढा भक्तीभावाने येवु लागला. यानंतर सहावे मठाधिपती श्रीगुरु उध्दव महाराज यांनीही पुर्वीची परंपरा सांभाळत त्यांनीही एक यज्ञ केला होता. संस्थानची तिच परंपरा या सातव्या मठाधिपतीनींही सांभाळत २०११ साली श्री शंभुकडा महादेव मंदिर, घागरदरा येथे विष्णुयाग यज्ञ पार पडला होता.


‘आपण तरुनी शिष्यांना तारीती तेच श्रीगुरु म्हणवीती’ या उक्तीनुसार संस्थानचे सातवे मठाधिपती श्रीगुरु एकनाथ महाराज यांनी श्रीक्षेत्र काशी, श्रीक्षेत्र रामेश्वर, श्रीक्षेत्र बद्रिनाथ, केदारनाथ, श्रीक्षेत्र द्वारका व श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी या पवित्र तिर्थक्षेत्री श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करुन आपल्या सर्व शिष्य मंडळींना, हिन्दु धर्मात सांगितलेल्या मुख्य चार धामांचे दर्शन घडवून मुक्तीचा मार्ग सुकर केला. महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र श्री पंढरपूर येथे जमीन घेऊन मठ स्थापन केले. तसेच वृंदावन येथेही मठ स्थापना केले. उमरज संस्थानच्या भक्तांना या दोन्ही पवित्र ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. आपल्या भक्तांना तिर्थक्षेत्र पाहतायावे तेथील दर्शनाचा लाभ व्हावा म्हणुन वंदनीय महाराज अविरत प्रयत्न करित असतात. वृंदावन, काशी, अयोध्या, रामेश्वर, हरिद्वार इत्यादी तिर्थक्षेत्रांना स्वत: सोबत राहुन आपल्या सर्व भक्तांना या तिर्थक्षेत्राचे स्वर्गसुख घेण्याचा लाभ मिळवून देतात. हे सर्व करीत असताना त्यांच आंतरमन त्यांना स्वस्थ बसु देत नव्हतं येथे आठवण होते. ती या संस्थानचे मुळ संस्थापक श्रीगुरु नामदेव महाराज यांची. ते याचसाठी की ‘श्री गुरु नामदेव चरित्र’ ग्रंथामध्ये असा उल्लेख सापडतो की, नांदुरच्या देशमुखांनी महाराजांना असे म्हटले की, आपण सुंदर विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधा, सर्व पैसे मी देतो असे म्हणुन एक भली मोठी रक्कम महाराजाना देऊ लागले. पण देशमुखाची ती रक्कम महाराजांनी स्विकारली नाही. मी तुझ्या पैशाने मंदिर बांधल्यास तुझे एकट्याचे पुण्य होईल. गोरगरिबांचाही त्यात सहभाग असला पाहिजे म्हणून महाराजांनी ते पैसे न स्विकारता देशमुखास परत केले. सर्व शिष्यगणांच्या सहभागातून वंदणीय महाराजांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे बांधकाम केले होते. आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची त्या मंदिरात विधिवत स्थापना केली होती.
श्रीगुरु एकनाथ महाराजामुळे हे संस्थान नावारुपाला आले आहे. त्यांनी संस्थानची धुरा समर्थपणे व समर्पितपणे सांभाळली. त्यांच्यामुळे भक्तांची संख्या वाढली आहे. त्यांनी घागरदरा ता.कंधार येथे जनावरांसाठी गोशाळा सुरू केली. या गोशाळेमध्ये २१० पशुधनांचे संगोपन केले जाते. उमरज ता.कंधार येथे ४८ विद्यार्थ्यांना मोफत वारकरी शिक्षण दिले जाते. दरवर्षी उमरज येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या सप्ताहात नामांकित कीर्तनकार‌ समाजप्रबोधन करतात. तसेच दरवर्षी आषाढी, कार्तिकी, बारशीला मोठी यात्रा भरते. विविध साहित्य विक्रीची दुकाने लावली जातात. दररोज भाविकांना अन्नदान करण्यात येते. श्री कृष्ण जन्मोत्सव व श्री संत नामदेव महाराजाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुरू पौर्णिमा आणि दसरा महोत्सव देखील साजरा केला जातो. तसेच या संस्थाना मार्फत आरोग्य शिबीर, मोफत औषध वाटप, नेत्रचिकित्सा शिबीर, रक्तदान शिबीर, महिला मार्गदर्शन शिबीर, वयोवृद्ध महिलांचा सांभाळ, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती शिबीर आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात.‌ दरवर्षी श्री संत नामदेव महाराज संस्थानच्या वतीने श्री गुरु नामदेव महाराज दिनदर्शिका काढून दिनदर्शिकेच्या माध्यमातून संस्थान, मठाधिपती, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाची माहिती भाविकांना दिली जाते.

उमरज ता.कंधार जि.नांदेड येथे मूळ श्री संत नामदेव महाराज संस्थान आहे. तसेच या संस्थानच्या घागरदरा ता.कंधार जि नांदेड, जांभुळबेट ता.गंगाखेड जि.परभणी, नांदुर ता.अहमदपुर जि.लातूर, आडमाळवाडी ता.मुखेड जि.नांदेड, खडकी ता.भोकर जि.नांदेड, रामदरा (उमरी) ता.बोथ जि.अदिलाबाद (तेलंगणा), कंधार जि.नांदेड, वृंदावनधाम, मथुरा, उत्तर प्रदेश येथे शाखा आहेत. या शाखा, या संस्थानाची फलश्रुती आहे. धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत नामदेव महाराज संस्थानचे ५ जणांचे विश्वस्त मंडळ आहे. या संस्थानचे अध्यक्ष म्हणून मठाधिपती श्रीगुरु एकनाथ महाराज, तर सदस्य म्हणून गुरुनाथराव कुरुडे, अप्पाराव देशमुख, लक्ष्मण गबाळे, बालाजी पोटपेलवार आदींचा विश्वस्त मंडळात समावेश आहे.
सध्याचे मठाधिपती श्रीगुरु एकनाथ महाराज हे सुधारणावादी संत आहेत. त्यांनी उमरज संस्थानचा कायापालट व जिर्णोद्धार केला. श्री संत सदगुरू नामदेव महाराज व विठ्ठल-रुक्मिणीचे भव्यदिव्य मंदिर संगमरवरी दगडात बांधले. या मंदिराचे बांधकाम चार वर्षात पूर्ण केले. येणाऱ्या भक्तांसाठी निवासाची उत्तम व्यवस्था केली. या ठिकाणी या मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. या निमित्ताने १०८ कुंडी विष्णूयाग महायज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात २ लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या विशेष कार्यक्रमाचे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते देवकीनंदन ठाकूरजी महाराज, श्री शारदापीठ, व्दारकाधाम, गुजरातचे जगतगुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज व शांतीब्रम्ह मारोती बाबा कुऱ्हेकर हे मुख्य आकर्षक असणार आहेत.

 

राजेश्‍वर कांबळे, कंधार
मो.9975119832

(लेखक कंधारचे ख्यातनाम पत्रकार आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *