नांदेड, दि. २६ फेब्रुवारी:
माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण व सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय संगीत शंकर दरबारची गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे.
या सोहळ्याच्या सांगतादिनी मराठी भाषा गौरव दिन असल्याचे औचित्य साधून यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ६ वाजता मराठी पहाट ‘मुग्धरंग’ हा सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन यांच्या मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मराठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध सूत्रसंचालक विघ्नेश जोशी करतील.
दिवसाच्या दुसर्या सत्रात सायंकाळी ५.३० वाजता धनंजय जोशी यांचे शास्त्रीय गायन, प्रवीण गोडखिंडी यांचे बासरी वादन व यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. यंदाच्या संगीत शंकर दरबारची सांगता ख्यातनाम गायिका देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.