मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून (दि. २७) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राजभवन येथे मराठी अभिवाचन, काव्यवाचन व गायनाचा ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची #मराठी हा अस्सल हिरा असून या हिऱ्याचे जतन केले तर संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले. आपण राज्यपाल पदावर असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपले भाग्य आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
डॉ. अरुणा ढेरे यांची संकल्पना व संहिता असलेल्या या कार्यक्रमात डॉ. गिरीश ओक व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिवाचनाने तर कलांगणच्या संस्थापिका गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या सुरेल काव्यवाचनाने राज्यपालांसह उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांच्यापासून अनेक नव्या जुन्या लेखक कवींच्या ‘आई व मूल’ नात्यांसंबंधी उताऱ्यांचे व कवितांचे भाववाचन करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.