१०८ कुंडी विष्णूयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास उपमुख्यमंत्र्यांची भेट

 

*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याला सहजासहजी काही भेटले नाही.तरीही मराठवाड्याने संघर्ष सोडला नाही.सहनशक्ती आणि संघर्षशीलता मराठवाड्याच्या संतांनी दिलेली शिकवण आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमरज येथे केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड व परभणी जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते.नांदेड वरून हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील धाकटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे श्री.क्षेत्र उमरज येथील प्राचीन श्री. संत नामदेव महाराज संस्थान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त 108 कुंडी विष्णूयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता. अडीचशे वर्षाची परंपरा आणि सात मठाधिपतीनी आत्तापर्यंत या ठिकाणी आध्यात्मिक कार्य केले आहे. यासाठी या परिसरातील हजारो भाविक उपस्थित झाले होते.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भाविकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.

यावेळी मंचावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा प्रवक्ते देवकीनंदन जी ठाकूर महाराज,संत नामदेव महाराज संस्थान उमरजचे मठाधिपती श्री.संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगमनानंतर येथील नामदेव महाराज समाधीचे व विठ्ठल रखुमाई मंदिराचे दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने त्यांचे आगमनाप्रती स्वागत करताना खोबऱ्याच्या भव्य हाराने परंपरेनुसार स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील संत परंपरेचा गौरव केला. मराठवाड्याची भूमी संतांची ,कलावंतांची, शूरांची व विरांची असून मराठवाड्याला संघर्षाशिवाय सहजासहजी काही मिळाले नाही. मात्र संतांच्या शिकवणीतून संघर्षशीलता व संयम हे गुण या ठिकाणच्या मातीमध्ये आले आहे. संतांच्या शिकवणीतून सर्वधर्मसमभावाचा मंत्र बुलंद व्हावा. या ठिकाणचा आध्यात्मिक सोहळा सामाजिक एकोप्याची नांदी ठरावी, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. नामदेव महाराज संस्थानच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यात येईल ,अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

संस्थांच्या ट्रस्टीने त्यांना काही निवेदन यावेळेस सादर केले. तत्पूर्वी त्यांनी मंदिर परिसरात भेट देऊन समाधी दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही संबोधित केले.उमरज येथील १०८ कुंडी विष्णूयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास मोठ्या संख्येने सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *