इंदू मिलचा लढा : लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा

                 इंदू मिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी करण्यात येणारी पायाभरणी मानापमान आणि राजकारण होत असल्याने राज्य सरकारने पुढे ढकलली आहे. इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते, मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे नमूद केले आहे.
             २०१६ मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या स्मारकात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असून या पुतळ्याचा पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना आमंत्रण दिले गेले नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यावरून मंत्रिमंडळात नाराजीचा सूर होता. या सर्वाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आजचा कार्यक्रम पुढे ढकलून मोठा वाद टाळला आहे.

                 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या बांधकामाची पायाभरणी होत आहे. 6 डिसेंबर 1956 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं निधन नवी दिल्लीत झालं. 7 डिसेंबर 1956 या दिवशी मुंबईत दादर चौपाटीवर असलेल्या चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चैत्यभूमी ही आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्वाची जागा आहे. त्यासमोर असलेल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं मोठं स्मारक व्हावं, हा महाराष्ट्राच्या राजकारणातला आता एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने  २००४ आणि  २००९ या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्या जाहीरनाम्यात या स्मारकाचा उल्लेख केला.
                इंदू मिलच्या जमिनीच्या जागेवर हे स्मारक उभारलं जावं, ही मागणी  २००३ पासूनच जोर धरत होती. पण प्रत्यक्ष ही जमीन स्मारकासाठी घोषित होण्यासाठी २०१२ साल उजाडावं लागलं. विविध विभागांच्या आणि खासकरून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या परवानग्या  २०१५ मध्ये मिळाल्या. २०१८ पासून काम सुरू झालं आणि त्यासाठी सुरुवातीला दोन वर्षांची कालमर्यादा आखून दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२० पर्यंत या स्मारकाचं लोकार्पण होईल, असं विधान केलं‌ होतं. पण ते शक्य झालं नाही. 

               चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी जमणाऱ्या लाखोंच्या जनसमुदायासाठी जागा उपलब्ध व्हावी, ही मागणी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना २००३ मध्ये पुढे आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करायला चैत्यभूमीवर दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात. दोन-तीन दिवस मुंबईत येणारा हा जनसमुदाय शिवाजी पार्क, दादर चौपाटी आणि चैत्यभूमी या परिसरात उघड्यावर राहतो. या लोकांना किमान निवारा मिळावा, हा विचार  १९८६ मध्येही पुढे आला होता. त्या वेळी राजा ढाले, नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली होती. पर्यावरणासंदर्भातील प्रश्नांमुळे ती मागणी मागे पडली. पण २००३ मध्ये हा विचार पुन्हा पुढे आला आणि त्याने एक राजकीय रूप धारण केलं.


            सन २००३ च्या डिसेंबर महिन्यात ही मागणी व्हायला लागली आणि  २००४ मध्ये विधानसभा निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा उल्लेख झाला. हे स्मारक कुठे व्हावं, याची चर्चा सुरू झाली तेव्हा दादरमधल्या चैत्यभूमीच्या समोरच असलेल्या इंदू मिलचं नाव पुढे आलं.‌ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात इंदू मिलचा विषय आला खरा, पण २००४  ते २००९ पर्यंत त्याबाबत फारशी काहीच प्रगती झाली नाही. २००९ मध्येही पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानेच इंदू मिलचा विषय ऐरणीवर आला होता. पण त्यानंतरही काहीच प्रक्रिया झालेली नाही.

                    तेव्हा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०११ मध्ये आझाद मैदानात एक सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी सरकारला इशारा दिला. इंदू मिल प्रकरणी  ६ डिसेंबर २०११ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर महापरिनिर्वाण दिनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल, असा त्यांनी इशारा दिला होता.‌ ठरल्याप्रमाणे आंदोलनही झालं आणि तब्बल २६ दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. तिथे पोलीस बंदोबस्त चोख होता. पण  तयारीही जोरदार करण्यात आली होती. इंदू मिलवर आमचा झेंडा रोवण्यासाठी आम्ही गनिमी काव्याने मिलवर आंबेडकरी कार्यकर्ते कब्जा करणार होते. हा एक ऐतिहासिक दिवस होता. 

                     त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार यांच्या दरम्यान इंदू मिलची जागा मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू झाला. सन २०१२ मध्ये  रिपब्लिकन पक्षानेही या प्रश्नी आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन मग ५ डिसेंबर २०१२  रोजी आनंद शर्मा यांनी लोकसभेत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देत असल्याचं जाहीर केलं, असा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दावा आहे.‌ इंदू मिलच्या जागी बाबासाहेबांचं स्मारक करण्याचा निर्णय जाहीर केला म्हणून ६ डिसेंबर २०१२ या दिवशी चैत्यभूमीवर आनंद साजरा करण्यात आला. पण स्मारकासाठी इंदू मिलची जागा प्रस्तावित होणं आणि प्रत्यक्ष स्मारकाचं काम सुरू होणं, यात अनेक गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक होतं.


                   इंदू मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात होती. तसंच हे औद्योगिक क्षेत्र होतं. या जागेला औद्योगिक क्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरू केली. त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग महामंडळाला या जागेच्या किमतीची भरपाई देण्याची प्रक्रिया देखील सन २०१४ च्या आधीच सुरू झाली होती.२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपप्रणीत सरकार निवडून आलं. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देत असल्याचं पत्र २०१५ मध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांना दिलं. इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण झाली.

 इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला अजून तीन वर्षे लागणार असून, २०२० पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. स्मारकासाठीची संपूर्ण साडेबारा एकर जागा सरकारला हस्तांतरित करण्यात आली असून, बांधकामालासुद्धा सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या निर्माणकार्यात होत असलेल्या विलंबाबाबत आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. प्रॉपर्टी कार्डावरसुद्धा सरकारचे नाव नोंदविण्यात आले आहे. सर्व नकाशे मंजूर झाले असून जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सीआरझेड क्षेत्राबाहेरील जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी एमएमआरडीएने १५० कोटी रुपये दिले आहेत. या प्रकल्पासाठी पैशांची कमतरता भासणार नाही.


                   राज्य सरकारने या स्मारकाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे म्हणजेच एमएमआरडीए दिली आहे. १९ मार्च २०१३ मध्ये राज्य सरकारने एका पत्राद्वारे स्पष्ट केलं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या प्रस्तावित स्मारकाच्या नियोजनासाठी एमएमआरडीए ची नेमणूक केली आहे. मग  एमएमआरडीएने २०१५ मध्ये स्थापत्यविशारद शशी प्रभू यांची नेमणूक करत त्यांच्याकडून स्मारकाचा आराखडा मागवला.

                   या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य  पुतळा हे या स्मारकाचं मुख्य आकर्षण आहे. या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची  १०६ मीटर एवढी असेल. त्यात ३० मीटरचा चौथरा आणि त्यावर  ७६.६८ मीटरचा म्हणजेच  २५० फुटांचा पुतळा असेल.‌ स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतले घुमट आणि स्तूप, संग्रहालय, तसंच प्रदर्शनं भरवण्यासाठी दालन असेल. पुतळ्याभोवती सहा मीटर लांबीचा चक्राकार मार्ग असेल. तसंच चौथऱ्यावर पोहोचण्यासाठी लिफ्टची सोय असेल. सांस्कृतिक कार्यक्रम तसंच सार्वजनिक सभा घेण्यासाठी एक हजार लोकांची आसनक्षमता असलेलं अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल. विपश्यनेसाठी येणाऱ्या लोकांसाठी ध्यानधारणा केंद्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एक ग्रंथालय असेल. त्यात बाबासाहेबांबद्दलची माहिती पुस्तके, त्यांचं साहित्य, जीवनचरित्र, माहितीपट, लेख, तसंच त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानावर संशोधन करण्याची सोय असेल.या केंद्रात व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्यासाठी ४०० लोकांची क्षमता असलेलं सभागृह असेल. असा वैशिष्ट्यपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. 

            तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून  २०१९ मध्ये एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं की, हे स्मारक २०२९ मध्ये लोकांसाठी खुलं केलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे ६ डिसेंबर २०२० या दिवशी इंदू मिलच्या जागेवर तयार होणारं हे ऐतिहासिक स्मारक पूर्ण होईल‌ या दृष्टीने राज्य सरकारने पाऊल टाकले होते. आराखड्याप्रमाणे काम सुरुही झालं होतं. इंदू मिल ही गिरणीची जागा होती. तिथे अनेक यंत्रं होती. पहिल्यांदा ती यंत्रं काढून, गिरणीची इमारत उद्ध्वस्त करून जमीन सपाट करावी लागणार आहे. या कामांना वेळ लागतो. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर २०२० ची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्याच्या पेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हे सत्य आहे. आनंदराज आंबेडकर यांनी डिसेंबर २०११ मध्ये आंदोलन केलं होतं. आता येत्या डिसेंबरला ९ वर्षं उलटतील, पण इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम जराही सुरू झालेलं नाही. हे लक्षात येते. 

                 याचे कारण असे की, विविध प्रकारच्या परवानग्या घेण्यात बराच वेळ गेला. पण आता जमिनीखालची कामं सुरू आहेत. ती झाली की, प्रत्यक्ष जमिनीवरचं काम लोकांना दिसू लागेल. कामं प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाहीत, म्हणजे ती होत नाहीत असं नसतं. त्यामुळे डिसेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. दुसरे कारण एमएमआरडीएमधील काही अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार हे काम वेळेतच सुरू होतं. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्याचा नवा प्रस्ताव समोर आला होता.  पुतळ्याची उंची वाढल्याने त्या अनुषंगाने पायाची रचना बदलावी लागते. त्याचे तीन आराखडे सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण करणं शक्य होणार नसल्याचंही स्पष्टपणे दिसून येते.


                   सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत ५९१.२२ कोटी रुपये एवढी होती. पण या प्रकल्पातील पुतळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोलादाच्या गुणवत्तेत सुधारणा सुचवल्याने या प्रकल्पाची किंमत  ६२२.४० कोटी झाली. आता  एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे प्रकल्पाची एकूण किंमत  ७६३.०५ कोटी रुपये एवढी असून सरकारने त्याला मान्यता दिली आहे. आता पुतळ्याची उंची वाढल्यानंतर हा खर्च वाढू शकतो.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी आता स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. त्यामुळे पूर्वी ७०० कोटी रुपये होणारा खर्च आता १००० कोटी रुपयांवर जाणार आहे.

                   कुणी काही म्हणो प्रत्यक्षात या ठिकाणी काम सुरू आहे. इंदू मिलचा संपूर्ण परिसर पत्रे लावून बंद केला आहे. समुद्राच्या बाजूने येण्या-जाण्यासाठी दरवाजा असून तिथूनही फक्त परवानगी असलेल्या माणसांनाच आत सोडलं जातं. स्मारक तयार होईल, तेव्हाही याच दरवाज्याच्या ठिकाणी प्रवेशद्वार असेल. इंदू मिलमध्ये असलेल्या विश्रामगृहाच्या जागीच आता शापुरजी पालोनजी या कंत्राटदार कंपनीने आपलं तात्पुरतं कार्यालय थाटलं आहे. मिलमधील बांधकाम पाडून त्या ठिकाणी खोदकाम पूर्ण झालं आहे. स्मारक झाल्यानंतर जमिनीखाली ४०० वाहनांसाठी वाहनतळ असेल. त्याचं काम होत आलं आहे. त्याचप्रमाणे स्मारकासाठीचा पाया आणि सभागृह, वाचनालय, संशोधन केंद्र आदी इमारतींचा पाया बांधण्याचं कामही होत आलं आहे. सद्यस्थितीवरून डिसेंबर २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणं आता शक्य नाही. पुतळ्यासाठीचा पाया आणि स्मारकाची मुख्य इमारत यांचं काम अजूनही सुरू व्हायचं आहे. त्याचाच पायाभरणी कार्यक्रम होणार होता. 

                         दादर येथील इंदू मिलमध्ये प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शविला आहे. स्मारकाच्या ठिकाणी पुतळा उभारण्याऐवजी तो निधी लोकोपयोगी कामासाठी खर्च करण्याच्या मागणीचाही त्यांनी यावेळी पुनरूच्चार केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा अचानक ठरलेला कार्यक्रम राज्य सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपला पुतळ्याला विरोध असल्याचे म्हटले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांच्या नावाने धोरणात्मक अभ्यास, संशोधन करणारे केंद्र उभारावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा दिली होती. यासंदर्भात पंतप्रधान म्हणून त्यांनी टिपणही काढले होते. एका पंतप्रधानांनी काढलेले टिपण सहसा अन्य पंतप्रधान बदलत नाहीत. वाजपेयींचे ते टिपण अजूनही मंत्रालयात आहे. त्यामुळे पुतळा वगैरे उभारण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळी पडू नये. 

           बाबासाहेबांना पुतळ्यात अडकवण्याचा हा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. वाजपेयींच्या संकल्पनेप्रमाणे या ठिकाणी परराष्ट्र, आर्थिक बाबींचा धोरणात्मक अभ्यासाचे केंद्र झाले असते तर आज भारत-चीन संघर्षात आपली भूमिका जगभर ठसविण्यासाठी भारताला रशियाचा वापर करावा लागला नसता, असा दावाही त्यांनी केला. यापूवीर्ही प्रकाश आंबेडकर यांनी पुतळ्याला विरोध केला होता. .त्या ऐवजी वाडिया रूग्णालयाला हा निधी देण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. दरम्यान, आरपीआय नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेला विरोध केला होता. पुतळा ही समाजाची मागणी आहे, राजकीय नव्हे. या ठिकाणी पुतळ्यासोबत अन्य अनेक उपक्रमही असणार असल्याचे सांगत आरपीआयची भूमिका पुतळ्याच्या बाजूने असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाला मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला जात होता. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.

            इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते, मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश  दिले आहेत. 

                २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या स्मारकात बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा राहणार असून या पुतळ्याचा पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना आमंत्रण दिले गेले नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यावरून मंत्रिमंडळात नाराजीचा सूर होता. 


               बाबासाहेबांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे पाच वर्षांपासून रखडलेले काम प्राधान्याने येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. शिवाय स्मारकाची उंची वाढविण्यात आली असून, स्मारक ४५० फुटांचे, तर बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत होणे अपेक्षित आहे. यासाठी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले असून सर्व संरचनात्मक आराखड्यांचे १०० टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तत्काळ घेण्यात याव्यात, असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले. या कामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

           बांधकाम क्षेत्रातील परप्रांतीय श्रमिक करोनाच्या भीतीमुळे आपापल्या मूळगावी परतल्याने दादरच्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम रखडण्याची शक्यता आहे. कामगारांची वानवा असल्यामुळे स्मारक पूर्ण होण्यास तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. दादरच्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाचा केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेतला. तसेच इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि त्या पुतळ्याचा चबुतरा चीनमध्ये बनविण्याचा निर्णय रद्द करून भारतातच हा पुतळा बनविण्यात यावा. हा पुतळा निर्माण करण्याची शिल्पकार राम सुतार यांची तयारी आहे. चीनमध्ये करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून, अशा परिस्थितीत चीनमधून पुतळा बनवून घेणे योग्य होणार नाही, असे रामदास आठवले यांचे म्हणणे आहे.
                             इंदू मिल आणि चैत्यभूमीच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर रस्ता बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी सीआरझेडची पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा व पुतळ्याच्या फाउंडेशनचे काम बाकी असून, स्मारक कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात स्मारकातील नियोजित विविध हॉलच्या कामांपैकी ७० टक्के काम झाले आहे. स्मारकाच्या कामाचे फाउंडेशनचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. बेसमेंटचे काम ७२ टक्के झाल्याची माहिती शापुरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक उमेश साळुंखे यांनी दिली. व्हिडीओ कॉन्फरन्स आढावा बैठकीला आर्किटेक्ट शशी प्रभू, एमएमआरडीएचे अधिकारी भांगरे, महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी सहभागी झाले होते. आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला. स्मारकाचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन नव्हे तर तीन वर्षेच लागतील. कारण लॉकडाउनमुळे दोन महिने स्मारकाचे काम बंद होते. परप्रांतीय श्रमिक गावी गेल्याने कामगारांची वानवा निर्माण झाली होती. आता कामगार परतले आहेत. युद्धपातळीवर स्मारकाचे काम सुरू करण्याची हमी अधिकाऱ्यांनी दिली आहे.  दरवर्षी पावसात चैत्यभूमीच्या स्तुपाला हानी पोहोचत असते. त्यामुळे चैत्यभूमीचा स्तूप दीक्षा भूमीसारखा उभारावा अशी सूचनाही ना. आठवले यांनी केली आहे. 

              बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता. आता सुधारित खर्च एक हजार ८९ कोटी ९५ लाख अपेक्षित असून, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचे काम शापूरजी पालनजी कंपनीमार्फत होणार आहे; तसेच या स्मारकासाठी राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध विभागांच्या परवानग्या येत्या आठ दिवसांत देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत. 


                     पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. कित्येक वर्षांचे बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण होत असून, ते स्मारक भव्य, देखणे, दिमाखदार आणि सर्वांना अभिमान वाटावे असेच होणार आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तक यांच्यातील नाते मोठे होते. त्यामुळे अद्ययावत ग्रंथालय आणि संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांच्याविषयी माहितीचा अनमोल ठेवा असलेली जगभरातील पुस्तके या ठिकाणी असतील. शिवाय महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती या ठिकाणी असणार आहे. स्मारकाचे आर्किटेक्ट म्हणून शशी प्रभू हेच यापुढेही काम पाहतील.

        ‘राज्य सरकारतर्फे दादरच्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक हे जगाला अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल’, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त केला. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे असून, बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या, न्यायाच्या आणि बंधुत्वाच्या विचाराच्या दिशेने वाटचाल करील’, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना मुख्यमंत्र्यांनी संदेश जारी केला आहे. ‘डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला. त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी संदेशात व्यक्त केला आहे. ‘हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य व्हावे. त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील. या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारे इंदू मिल येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल’, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

        स्मारकावरुन जनतेत अनेक मते मतांतरे आहेत. स्मारकाची गरज सध्यातरी नाही आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्या स्मारकापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकर यांची देखील मागणी तीच होती की अगोदर रुग्णालय कडे लक्ष द्या सगळं काही पूर्वीसारखं सुरळीत होउदे त्यावेळी पायाभरणी करावे. पुतळा उभा करून काय साध्य होणार आहे. ज्या महापुरुषांची सर्व सामान्यांच्या मनात सन्मान आहे , ती पुतळा बांधल्याने अजून उंचावेल अस वाटत का? त्यापेक्षा त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काई होता ते समजून आणि त्यांच्या कार्याला साजेश अस स्मारक केलं तर ते त्यांना पण आवडेल. एखादी वाचनालय कीव समजुपोयोगी गोष्ट त्यानावे चालू केली तर सर्वांना त्याचा अभिमान वाटेल. सो थोडंसं logically आणि practically विचार करुन  ठरवा. उगा भावनेच्या भरात जाऊन काही ही सध्या होत नाही.


         राजकारण्यांचा खेळच आहे तो. मंदिर पुतळे यावरून लोकांच्या भवणाशी खेळायचा. आणि आपली शोकांतिका एवढीच आहे की आपण पण त्यांचा ह्या भूलथापांना बळी पडतो. मुख्यमंत्री साहेब या निर्णयाला विरोध होणारच नाही  डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर हे तर महामानव आहेत त्यांचे विचार त्यांच कर्तृत्व हे शब्दांत मांडण चुकीच ठरेल इतके मोठे आहेत. पण  बाबासाहेंबाच स्मारक जरुर करा पण बाबासांहेबांच्या  विचारांच स्मारक होण खुप गरजेच आहे  भारत  जगात महासत्ता तेव्हाच बनेल जेव्हा संपूर्ण लोकांच्या विचारांचा विकास होईल  बाबासांहेबांचे विचार public  stop brt station रेल्वे स्टेशन  या ठिकाणी posters द्वारे लावा रोज लोक वाचतील काही तरी नक्कीच छान घडेल. 


 पुतळा उभा करा पण सरदार पटेल सारखा मोठा अजिबात नको.. एवढा खर्च करणे भीम विचारांना तरी शोभत नाही.‌ एक साधारण पुतळा उभा करा जो 50 फुटापर्यंत असेल. आणि प्रामुख्याने ग्रंथालय, बौद्ध केंद्र, बौद्धिक केंद्र हे आंतरराष्ट्रीय भव्य दिव्य उभे करा. खर्च या गोष्टीवर करा पुतळ्यावर नको. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारताय, हरकत नाही, पण आपण अरबी समुद्रामध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचे” भव्य आणि दिव्य स्मारक उभारणार होते त्याच काय? केवळ सत्ता टिकवण्यासाठी जी भूमिका घेतलीये ती योग्य आहे का, असे असेल तर याच महाराष्ट्रात तुम्हाला मराठी माणूस पुन्हा मत देईल का?

                  आम्ही आंदोलक “इंदू मिल” स्मारकाचे शिल्पकार! इंदू मिलची १२.५ एकर जमीनीच्या मागणीसाठी  २०१२ ला तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची औरंगाबाद येथील सभा उधळून लावण्याचं काम आम्ही केलं. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी भवन औरंगाबाद येते ताफा अडवला होता. आम्ही आंदोलक इंदू मिलच्या स्मारकासाठी लढलो, गुन्हे दाखल करून घेतले व्यवस्थेला सळो की पळो केलं आणि स्मारकाचं आंदोलन जिंकलं. आज आंदोलकांना निमंत्रण नसतंय, त्याकाली लढलेल्या आंदोलकांची नोंद सुद्धा कुणी केलेली नाही. कधी देशाचे पंतप्रधान भूमिपूजन करतात तर आज पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पायाभरणी करत आहेत. इंदू मिलच्या शिल्पकाराना निमंत्रण सुद्धा दिलेले नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांना समग्र आंबेडकरी जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून साधं निमंत्रण दिलेले नाही हा आंबेडकरी जनतेचा अवमान आहे. इतर महापुरुषांचे वंशज सगळीकडे लागतात पण महामानवाच्या वंशज का चालत नाहीत? 

                महाविकास आघाडी सरकारच्या स्वार्थी धोरणाचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करत आहे.भूमिपूजन कुणीही करा, पायाभरणी कुणीही करा, आम्ही प्रसिद्धीचे मानापानाचे भुकेलेलो नाहीत आम्ही इंदू मिल स्मारक आंदोलनातून जिंकलो हाच आमचा विजय आहे. या स्मारकाचं सत्ताधारी राजकारण करत असतील तर आम्हि  खपवुन घेणार नाहीत. खुशाल भूमिपूजन करा, रोज जाऊन कुदळी मारत बसा पण स्मारकाचे काम लवकरात लवकर करा, नुसत्या कुदळी मारून स्मारकाचे भिजत घोंगडे ठेऊ नका. कुणीही आंदोलन न करता, कुणीही मागणी न करता इंदू मिलच आंदोलन जून असताना, थोड्या दिवसात भव्य अस पटेलच गुजरातला स्मारक निर्माण होतं. मग महामानवाच्या स्मारकाचे फक्त राजकारण का? आता आंबेडकरी जनतेच्या प्रतिनिधीत्वाला नाकारून पुढाकार घेतलाय तर स्मारक तात्काळ करा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही फिरू देणार नाहीत, महामानवाचा अवमान खपवून घेणार नाहीत हा ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा आहे. 

            स्मारक उभारायला अजून ३,४ वर्षे लागतील काही घाई नाही आम्हाला परंतु तिकडे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आणि बाबांचा पुतळा झाला पाहिजे असे माझं मत आहे.हॉस्पिटल बांधायचे असेल तर शक्ती मिलची भव्य जागा आहे तिकडे बांधावे. ज्या बाबांनी देश घडविला त्यांचे चैत्यभूमी हे स्मारक किती छोटसं आहे ते बघावं. युपी मध्ये जर आंबेडकर पार्क आणि त्यात १२ ग्रंथालय होऊ शकतात तर आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही ? सम्राट अशोकाने  ८४००० स्तूप बांधले .का ? धम्माचा प्रचार व्हावा आणि एक ऐतिहासिक पुरावा कायम रहावा म्हणून. असे असूनही आज कित्येक स्तुपांचे मनुवाद्यांनी दैवीकरण केले आहे. स्मारक,पुतळे हे इतिहासात दखल घ्यायला भाग पाडतात. आम्हाला स्मारकाची घाई नाही हा कोरोना जाऊ द्या मग सुरू करा भव्य स्मारक सोबत ग्रंथालय किंवा रिसर्च सेंटर पण त्यात बाबांचा पुतळा हवाच. राहिला विषय राज्याचा खर्चाचा तर राज्याचा GST तर केंद्राला राज्याला द्यायला भाग पाडा. आणि हो जेव्हा इंदूमिलचे भूमीपुजन झाले तेव्हा बाळासाहेब स्वतः तिकडे उपस्थित होते तेव्हा तर त्यांनी स्मारकाच्या भूमीपूजनाला कोणताही विरोध केला नाही मग आज विरोध का ? युपी मध्ये मायावतींनी बाबांचे भव्य स्मारक बनवलेच पण त्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात भव्य हॉस्पिटल बनवले आहे मग आपल्या महाराष्ट्रात का शक्य नाही ? आम्ही बाळासाहेबांवर टीका करत नाही केवळ आमची भूमिका मांडतोय त्यात काहींना चूक वाटत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे . 


                बाबांच्या नावे खुप हॉस्पिटल्स आहेत अगदी भायखळ्याला रेल्वे हॉस्पिटल आहे.आता इंदूमिल स्मारक झालं पाहिजे आणि त्यात ग्रंथालय किंवा रिसर्च सेंटर.टार्गेट कोणीही कोणाला करीत नाही.आज जर बाबांचे इंदुमिल ला स्मारक झाले नाही तर हे मनुवादी लोक भविष्यात एखादे तरी भव्य स्मारक होऊ देतील का ? आपल्या कित्येक लेण्या ह्या लोकांनी बळकावल्या आहेत . मग स्मारकासाठी पुन्हा अशी मिळालेली जमीन मिळेल का ? हॉस्पिटल अनेक बांधता येतील परंतु स्मारक,रिसर्च सेंटर साठी थेट चैत्यभूमीच्या शेजारी पुन्हा कधी जागा मिळेल का ? मध्ये तर चैत्यभूमी दुसरीकडे वळवण्याचे षडयंत्र चालू होते. स्मारकसोबत ग्रंथालय किंवा रिसर्च सेंटर असे बनवा की गरजू मुलांना शिक्षणासाठी त्याचा फायदा होईल पर्यटनस्थळ होऊन त्यातील पैसा गरजू लोकांच्या कामी येईल, विदेशी लोक भेटी देतील या वास्तूला.     

                 इंदु मिल येथे  उंच पुतळा उभारण्यापेक्षा  आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र उभारण्याची मागणी आद.बाळासाहेब आंबेडकरांनी करून पुतळ्याचा खर्च कोवीड च्या लढ्यासाठी करावा. अशी मागणी केली.   उंच पुतळे उभारण्याची कल्पना अलीकडीलच. भारतात  मोठमोठी धार्मिक स्थळे उभारलीत पण मोठमोठे पुतळे उभारलेले सहसा  दिसून येत नाही. आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट कौंसील ने बुद्ध गया येथे  ४५० फुट उंच मैत्रीय बुद्ध मुर्ती उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला. १०० एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. अब्जावधी रुपयांचा प्रकल्प. निधी प्रकल्प घोषणे च्या काही तासात गोळा झाला. यावर नॅशनल जिओग्राफी वर विस्तृत वृतांत आला होता. या प्रकल्पाची प्रेरणा घेऊन सरदार पटेल, छ.शिवाजी महाराज अरबी समुद्रातील स्मारक, अयोध्या येथे श्रीराम मुर्ती व इंदु मिल येथील स्मारकात बाबासाहेबांचा उंच पुतळा उभारण्याचा मानस विविध सरकारांनी केला.  १८ सप्टेंबरला स्मारक पाया भरणीचा शासकीय  कार्यक्रम पण आयोजीत केला गेला,मग रद्द पण झाला. 
                   आज पुतळा उभारण्याचा आग्रह धरणे म्हणजे रोम जळतांना निरो चे फिडलं बाजवणे. लोक ऑक्सीजन, औषधा करता तडफडत आहेत. अश्या स्थितीत बाबासाहेबांचे  स्मारक उभारणे  लांबणीवर टाकले पाहिजे.  ७० वर्षे झाली मागणी करून दोन चार वर्षे पुढे मागे झालीत तर काही बिघडणार नाही. आंबेडकरी आहोत इतरांच्या व आपल्या विचारधारेत फरक आहे. करूणा विसरता येत नाही.आद. बाळासाहेबांची भुमीका ही खरी  आंबेडकरी राजकीय  चळवळीची. यातून देशाला आंबेडकरी राजकीय प्रगल्भता दिसून येते. स्मारकावरुन अनेकांची अनेक मते आहेत. सर्व काही करा पण पुतळ्यासह करा अशीही मागणी पुढे येत आहे. पुतळा नसेल तर काही व्यवस्थित दिसणार नाही. आजपर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यापासूनच अनेक आंदोलने झाली आहेत. लढे उभारले गेले. ही स्फुर्ती व प्रेरणा केवळ बाबासाहेबांचाच पुतळा देऊ शकतो असे काहींचे म्हणणे आहे. 

गंगाधर ढवळे ,नांदेड 
संपादकीय २०.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *