कंधार ; प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी समविचारी पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे पक्षांतराचे वारेही वाहू लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी, सेवा जनशक्ती पार्टी व महाराष्ट्र राज्य समितीसह इतर समविचारी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय होण्याचीही शक्यता आहे.
गेल्या लातूर व नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता. यावेळी महाविकास आघाडी एकत्र येऊन लढली होती. तसेच लोहा-कंधार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला द्वितीय क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढविणार आहे. उमेदवारीसाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. अनेक इच्छूक कामाला देखील लागले आहेत. या निवडणुकीत अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.
जनतेच्या मनात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निश्चितच याही निवडणुकीत महाविकास आघाडीला नक्की विजय मिळणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी यावेळी सांगितले.

