समीक्षा
मधुकर जाधव , सिन्नर.
नांदेड येथील एक प्रतिभावंत कवी गंगाधर ढवळे यांच्या ‘अग्निध्वज’ च्या कविता संग्रहातील कविता सम्यक विद्रोहाचा अग्निध्वज खांद्यावर घेऊन लढणारी, लढवय्यी, लढत राहणारी कविता आहे. कवी ढवळे यांनी २०११ मध्ये ‘प्रीत आणि प्रहार’ हा पहिला कविता संग्रह आपणांस दिला आहे. त्यानंतरचा ‘अग्निध्वज’ हे दुसरे साहित्य अपत्य. या कविता संग्रहाला जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. तर मलपृष्ठावर कवी आणि युवा साहित्यिक प्रशांत वंजारे यांचे दोन शब्द पुरस्कार मिळाले आहेत. ह्या कविता संग्रहाचं एक वैशिष्ट्य हे की, कवितांना नामाभिधान नाही. फक्त अनुक्रम आहे. पंचवार्षिक अनुभवाचं काव्य विश्व यात आलेलं आहे. हे कवी ढवळे आपल्या ‘मनोनिग्रह’ मध्ये कबूल करतात. ते त्यात ‘अग्निध्वज’ बद्दल सांगताना म्हणतात,’अग्नि ध्वज मध्ये समाविष्ट कवितांचे अर्थ लावतांना काही रूपे प्रत्यही येतील. ते आंबेडकरी कवितेचेच आदिबंध आहेत.
संतापाच्या भरात आक्रमक होऊन त्या लिहिलेल्या नाहीत. प्रत्येक कवितेमागे एक वास्तववादी जाणीव आहे. अश्लील शब्दांचे उपयोजन हे अमानुषतेवर तुटून पडणे, हेच आहें.’ अश्लील शब्दांचा केलेला लघु वापर त्याचे कारण त्यांनी आपल्या दीर्घ मनोगतात सांगून टाकले आहे. असे जरी असले तरी गेंड्याची कातडी पांघरलेल्या विषमवादी व्यवस्थेवर हे प्रहार घणाघाती असले तरी त्यांना काही एक फरक पडत नाही. आपण एकीकडे जर आंबेडकरवादाचे शस्त्र आणि शास्त्राचे पिक पेरणी करीत असू तर अंतिम लक्ष्य सम्यक विद्रोहाने त्यावर हल्लाबोल करावा लागणार आहे व तो आपण करीत आहोत. दुसर्याला लाखोली वाहायचे दिवस आता संपण्याच्या वाटेवर उभे आहेत. आपली उर्जा आपण आपले घर साकारण्यास लावायला हवी. का? तर अग्निध्वज घेऊन आपण आग ओकण्याचे काम कधीच करणार नाही. उलट आग विझविण्यासाठी हा अग्निध्वज सक्षम आणि समोर उभा ठाकला आहे. समोर लागलेला अग्नितांडव पाहून आपल्या घराला पाणी मारणे यात कुठली आलीय मर्दुमकी? आगीचे कारण शोधून वार्याच्या दिशेनं गवसणी घालत आग विझविण्याचे महत्तम कार्य आपणांस करावयाचे आहे. बोकाळलेल्या व्यवस्थेने लावलेली अराजकाची आग अग्निध्वज हातात घेऊन ती थांबविता आली पाहिजे आणि हे काम कवी गंगाधर ढवळे यांची कविता करते आहे, असे मला वाटते.
‘अग्निध्वज’ खांद्यावर ठेवून युद्धाला सज्ज झालेली कविता बरोबर एकसंघ सैनिकांना बरोबर घेऊन हा संगर ती लढवीत आहे. त्यासाठी कवी ढवळे एकसंघ समाज साथीला घेऊन अग्निध्वज खांद्यावर ठेऊन युद्धघोष करीत त्यांची कविता निघाली आहे. हातात शस्त्र आहे. ते मात्र लेखणीचं आहे. सम्यक विचारांचा आंबेडकरी विचार मनात ठेऊन कवी ढवळे यांची कविता लढते आहे. आयुष्यभर कार्यकर्ते दोन भूमिकेतून लढत असतात. एक कार्यकर्त्याची व दुसरी साहित्यिकाची. चळवळीत त्यांची अशी वाताहत होते, तरीही त्यांच्या डोक्यात विश्व कल्याणाची वास्तववादी कल्पना असते. ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणून हे गार्हाणं कवी स्पष्ट सांगतात,
सबंध आयुष्याची ज्यांनी होळी केली
चळवळीसाठी त्यांची झोळी रिकामीच राहिली (अग्निध्वज २/ २६)
शासित आणि शोषित यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, जी कालही होती आणि आजही आहे. तिने आधुनिक गुलामगिरीला जन्माला घातले आहे. ह्याचा तडाखा शोषितांचे जगणं अवघड करून टाकले आहे. म्हणून कवी म्हणतो,
हल्ल्याची जाणीव होते क्षणोक्षणी
आधुनिक गुलामगिरीतून निपजते
हुंकाराची पिढी (अग्निध्वज ३/२७ )
बापाच्या बापाने आमच्या हाती संविधान दिलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाने समृद्ध मानव कल्याणी लोकशाही दिली. ह्याचा दुरुपयोग इथं स्वार्थानी बरबटलेल्या देशद्रोह्यांनी केला. मुक्त लोकशाही राबवायची सोडून घटना बदलण्याच्या वाटेवर ते उभे आहेत. दवाब आणि वित्त तंत्राचा उपयोग करीत त्यांनी बळजबरी बोटाला शाई लाऊन इव्हीएम मशीन कार्यरत ठेवायला भाग पाडले. यासाठी कवी ढवळे नेमकेपणाने बोट ठेवतात,
स्वार्थी लोकशाहीने दिलाय
ठोकशाहीचा विचार इथे
दवाबाच्या राजकारणाचा
मुक्त निभाव इथे (अग्निध्वज ८/३२)
पराभवाचा इतिहास आम्हाला नवीन नाही. परंतु आम्ही ज्यांच्या बाजूने लढतो, ज्यांच्या खातीर लढतो तेथे विजय हा निश्चित असतो. भीमा कोरेगावचा इतिहास इथे साक्षी आहे. आमचे युद्ध नेहमीच सत्याच्या बाजूने राहिले आहे. यासाठी पराभव समोर दिसला तरी युद्धाला आम्ही कधीच भिक घालीत नाही. बाहुबळाचा वापर न करता लेखणीच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेले युद्ध पराभव कसा असेल? म्हणून कवी सहज शब्दात शब्द पेरून जातोय,
बुद्धाला साक्षी मानूनच
आरंभिले मी हे युद्ध
पराभव अटळ असले तरी
जोडिले शब्द न शब्द (अग्निध्वज ९/३४)
जातीयता नष्ट झालीय असं म्हणणार्यांना हे आवाहन आहे की, ती जातीयता गेलीय जिथं पाणी वरून वाढले जात होते आणि आमच्या सावलीचाही स्पर्श त्यांना विटाळ वाटत होता. आता नवीन जातीयतेने जन्म घेतला आहे. ती उफाळते आणि मग असत्याचा अन्यायी संगर अन्यायाचे बळी फ्रंट लाईन सोल्जर म्हणून आम्हीच ठरत असतो. मग ते नामांतर, खैरलांजी व भीमा कोरेगाव नियोजित हल्ले असो! नवीन जात समूह एकवटताहेत, म्हणून कवी ढवळे हे स्पष्ट नोंद नोंदवितात…
अनहिलेशन ऑफ कास्ट झालेच नाही
जातींचे डिजिटलायझेशन झाले आहे
गुगल, याहू, फेसबुक, ट्वीटर
उदयाला आले जातीतूनच (अग्निध्व्ज १३/३९)
तसे आपण सारेच उजेडाचे वारसदार आहोत. प्रकाश पुंजके हाती आल्यापासून ‘अत्त दिप भवं होऊन ही उजेडगाठ पेरण्याचे काम आमचे सम्यक कर्तव्य आहे. त्यात कवी ढवळेही मागे कसे राहणार! प्रज्ञा सूर्याची कुळकथा सांगत उजेड वारा पेरीत त्यांची कविता येते,
उजेड साखळीचा मी एक स्वयंदिप…
अंधार चिरणार्या बापाचा सूर्यपुत्र
मी एक उजेड(अग्निध्वज १९/४६)
दहशतवाद पृथ्वीवरील उभ्या माणसांचा एक नंबरचा शत्रू आहे. ही पिलावळ राजकारण्यांच्या वस्तीला पोसतेय. कवीनं इथं नवा दहशतवाद टिपण्याचा प्रयत्न केला आहे. जो वास्तव आहे,
दहशतवाद माखलाय अनेक रंगांनी
हिरव्या दहशतवादा विरुद्ध भगवा दहशतवाद
जोपासलाय इथल्या दाढीदीक्षित
अन् लंगोट धारकांनी… (अग्निध्वज २३/५१)
क्रांतीचा वारा आपल्या हाती आहे. क्रांतिवार्यास पाठ देत ही अस्मितेची लढाई आपणांस लढावीच लागणार आहे. भीमकार्याचा गाडा ओढवाचं लागणार आहे. असे असताना एखादे गालबोट ठरते उबग आणणारे. अन् सार्या कर्तृत्वावर पाणी फिरते. दोन्ही थंडीच्या मळवाटा सांभाळणार्या स्वकीयांवर कवी ढवळे यांनी ताशेरे ओढले आहेत,
बोधीवृक्षाच्या पानांतून सळसळतोय क्रांतीवारा
तरी उसवलाहे कोमट श्वास उबग आणणारा (अग्निध्वज ३२/६५)
कवीनं अग्निध्वज आपल्या खांद्यावर का घेतला आहे? याचे कारण स्पष्ट आहे. विचारांच्या उजेड उत्सवांचे चाललेले खंडन कवी आपल्या हाती असलेल्या अग्निध्वजाने थांबवू इच्छितो. इथल्या सनातनाला जाळण्याची भाषा म्हणजे समज देण्याची भाषा कवी सांगून जातोय,
तुझ्या विचारांच्या उजेडांचा विजयोत्सव मांडणारी
प्रकाश पिले ठेचली जातात इथल्या काळोखात
म्हणून मीच अग्निध्वज खांद्यावर घेऊन पिसाटणार आहे
‘सुसाट’ एकेका मनुवाद्याला जाळीत (अग्निध्वज ४८/८६)
इथं हरघडीला प्रत्येक ठिकाणी शासितांची पिलावळं शोषकांची लयलूट करीत आहे. विकासाच्या नावाखाली होणे विकासाचे कारखाने राज्यकर्त्यांच्या स्वविकासाचे केंद्र बनले आहेत. हा बोकाळलेला भ्रष्टाचार इथली व्यवस्था हातात हात घालून करीत असून गरीब-श्रीमंताची दरी रुंदावतेय. हा अर्थभेद, अराजक, शोषकखाने, राजकीय कुरणे, सामाजिक लुटारूंचे दलाल सारं काही अग्निध्वजाच्या प्रयत्नाने थांबविण्याचे कुशलकर्म कवी ढवळे यांनी आरंभिले आहे. म्हणून कवी देशातली परिस्थिती उघडपणे दाखवून देतोय,
आधुनिक भारतातले, आधुनिक कत्तलखाने
निर्माण केलेले आहेत इथल्या वर्तमान व्यवस्थेने (अग्निध्वज ५३/९१)
एकंदरीत कवी ढवळे यांच्या कविता उपरोधिक बाण्याने स्वत:चे, स्वकीयांना परीक्षण करायवयास भाग पाडते. तर प्रतिगाम्यांच्या कारवायांचे विश्लेषण करीत घणाघाती प्रहार करते. वास्तवाचे एकेक फक्त पाने न उलगडता त्याची कारणेही स्पष्ट व परखडपणे मांडते. आजचा वर्तमान अराजकतेच्या उंबरठ्यावर येवून उभा आहे. इथली व्यवस्था अविचारी विचारांचा खून डोळ्यादेखत करीत आहे. इथली तपास यंत्रणा दुबळी ठरली आहे. भूक, बेकारी, दारिद्य्र यासारख्या मुलभूत प्रश्नांना बगल देत त्यांना महासत्तेचा परीघ पूर्ण करावयाचा आहे. चांगल्या दिनांचे आमिष दाखवून पाच वर्षांसाठी मासे डिजिटलच्या जाळ्यात कायमचे अडकवून ठेवावयाचे आहेत. भारत सोडून त्यांना इंडिया, हिंदुस्थान करीत जात, धर्मांधतेच्या जुन्याच परंपरेचे रक्षण करावयाचे आहे. आम्ही ‘अत्त दिप भवं’ चा मार्ग क्रमित आमच्या विकासवाटा सांधताना आमच्या आहारावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही व्यवस्था गदा आणू पाहत आहे. पुरोगामी आम्ही ज्यांना म्हणतो ते खरचं पुरोगामी आहेत काय? हा आमच्यासमोर खरा प्रश्न आहे. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या मनातला आदर्श भारत ही वास्तववादी संकल्पना राबवायची सोडून त्यांना जुन्या धर्माचे जोखड ठेवून हिंदुत्व लादावयाचे आहे. अशा ह्या कडूकाळाच्या दिवसांत कवी ढवळे यांची कविता आपलेपण अस्मितेचा अग्निध्वज हाती ठेऊन आत्मभान जागविणारी आहे.
‘खाउजा’ आणि जागतिकीकरणाच्या गराड्यात सामान्य माणसांना लढण्याची उर्जा देणारी ठरते आणि सामान्य माणसांच्या बाजूने उभी राहते. ह्या कविता संग्रहात नव्याने येणार्या प्रतिमा व प्रतिके – आधुनिक गुलामगिरी, हुंकाराची पिढी, वाकलेलं स्वातंत्र्य, स्वार्थी लोकशाही, श्रीमंतांची कावकाव, गद्दार रक्त, विध्वंसाचे प्रवाह, स्वजातीय स्मशान, उजेडद्राव्य, प्रबुद्ध शिखर, निळा दहशतवाद, शोकदग्ध, नपुंसक वादळवारे, क्रांतीमंता, काव्यभाळ, वर्गणी फेसबुक, देहपारंब्या, मरणयात्रा, स्मरण कारंजे, कंठशोष, मढ्यांचे पिरॅमीड ही प्रतिके व प्रतिमा कुठेही अतिरेक न करता दुर्बोध ठरत नाहीत आणि कवितांचा अर्थसौंदर्य वाढवून जातात. काही ठिकाणी इंग्रजी शब्द जागा घेतात.
कवी ढवळे यांना जुन्या दलित वळणातील म्हणी, अश्लील शब्दांचे भावलेपण टाळता आले असते तर, आंबेडकरी आणि आंबेडकरवादी कविता शंभर टक्के म्हणता आली असती. ह्याचा कबुलीजबाब आणि गरज त्यांनी आपल्या ‘मनोनिग्रह’ मध्ये बोलून दाखविली आहे. कवी गंगाधर ढवळे हे आंबेडकरी कविता घेऊन दिशादर्शी बोटाच्या दिशेनं वादळवारा झेलत तसेच माणुसकेंद्री चळवळ लढती ठेवून क्रांतीच्या दिशेनं कार्यरत राहणारी प्रत्येक आंबेडकरी कविता सम्यक विद्रोह पेरणारी ठरली आहे. यासाठी कवी गंगाधर ढवळे यांना मंगल कामना आणि अभिनंदन!
अग्निध्वज – कवितासंग्रह
कवी- गंगाधर ढवळे, नांदेड.
समीक्षण-
- मधुकर जाधव, सिन्नर
मो. ९४०३५१५०९३
१५, श्रावस्ती, विजयनगर, नवीन कोर्टासमोर सिन्नर
जि. नाशिक
प्रकाशक- बळीवंश प्रकाशन , नांदेड.
किंमत – ₹ 100/-