उद्याची श्रीदत्तशिखर माहूरगड परिक्रमा यात्रा रद्द!
नांदेड -( गंगाधर ढवळे)
दरवर्षी रक्षाबंधनाच्या पौर्णिमेला श्रीदत्तशिखर माहूरगड परिक्रमा यात्रा आयोजित करण्यात येते. या यात्रेत लाखो भाविक भक्त सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही नियोजित परिक्रमा यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीदत्तशिखर संस्थानाने घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही भाविक भक्तांनी परिक्रमा यात्रा आहे म्हणून श्रीदत्त शिखर माहूरगड येथे येऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती दत्तशिखर संस्थान विश्वस्त मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे संपुर्ण जगासह भारतात उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्री दत्तशिखर मंदिर व अनुसया माता मंदिर ही दोन्ही मंदिरे दि. १७ मार्चपासून भाविक भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत श्रीक्षेत्र माहूरगड येथील दर्शनव्यवस्था बंदच राहील असेही श्रीदत्तात्रय संस्थान शिखर माहूरचे सचिवांनी दि. ३० जुलै रोजीच काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.