स्काऊट गाईडचे जिल्हा मुख्यालय आयुक्त अरविंद जावळे कालवश


सातारा-

सातारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे मुख्यालय आयुक्त तथा जेष्ठ लीडर ट्रेनर अरविंद शंकरराव जावळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक, तालुका मास्तर, होमगार्डचे जिल्‍हा समादेशक ते स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेचे मुख्यालय आयुक्त असा त्यांचा प्रवास झाला.ते हॅम रेडिओ चे साताऱ्यातील पहिले ऑपरेटर होते. शालेयस्तरावर विविध सामुदायिक विकास कार्यक्रम व सेवा उपक्रम राबविल्यामूळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पंतप्रधान ढाल पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट् राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई या संस्थेने त्यांच्या स्काऊट-गाईड चळवळीतील संख्यात्मक व गुणात्मक कार्याची नोंद घेऊन ” राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर” आणि “बार टू मेडल ऑफ मेरीट ” या पुरस्काराने ने गौरवान्वित केले . जावळे सर आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसह तालुका ते राष्ट्रीय स्तरावरील जांबोरीत हिरिरीने सहभाग घेत असत. सेवानिवृत झाल्यावर ही महात्मा फुले ओपन स्काऊट पथकाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना राज्यपुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले. मॅपिंग व स्टार गेझिंग,फर्स्ट एड, आपत्ती व्यवस्थापन , सिग्नलींग , मॅसेंजर ऑफ पिस व फ्रि बिईंग मी असे अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणे घेऊन जिल्ह्यातील व राज्यातील अनेक स्काऊटमास्टर व गाईड कॅप्टन शिक्षक- शिक्षिका यांना प्रशिक्षित केले. कडक शिस्त , करारी आवाज व कामातील तत्परता,शांत, संयमी व प्रेमळ स्वभावाचे जावळे सर अजातशत्रू राहिले. त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने स्वतःच्या वैयक्तीक ग्रंथालयात विविध विषयांची ग्रंथसंपदा जमविली. मंदीर समजून जिल्हा स्काऊट-गाईड कार्यालयात नियमित उपस्थित राहून दैनंदिन कामकाजात कुठलेही मानधन न घेता मदत करत .त्यांच्या कार्याचा वसा या मंदिरात शिष्योत्तमांच्या अनंत हस्ते स्काऊट चळवळीत अखंडपणे निनादत राहो हीच प्रार्थना. त्यांच्या आकस्मात जाण्याने शिक्षणक्षेत्रात व स्काऊट-गाईड चळवळी मध्ये पोकळी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील स्काऊट ,गाईड विद्यार्थी , शिक्षक , पदाधिकारी व अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *