संत नामदेव महाराज यांच्या वंशजावरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीला यश !
विश्व वारकरी संप्रदायाने प्रकाश आंबेडकरांचे मानले आभार
पंढरपूर : (सिद्धार्थ मोकळे)
श्री नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त गेल्या दोनशे वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेनुसार श्री क्षेत्र पंढरपूर नामदेव पायरी येथे आषाढी पौर्णिमा काला उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होतो. याही वर्षी कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून काला उत्सव साजरा करीत असताना श्री नामदेव महाराज यांच्या वंशजावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हे मागे घेण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर नामदेव पायरी येथे विश्व वारकरी संप्रदाय व संघटना यांनी आमरण उपोषण सुरुवात केली होती.
या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी विश्व वारकरी संप्रदाय यांना लेखी पत्राद्वारे पाठिंबा दर्शविला. व संत नामदेव महाराज यांच्या वंशजावरील चुकीच्या पद्धतीने दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्याबाबत शासनाकडे मागणी केली. या अनुषंगाने दाखल झालेले गुन्हे मागे घेणे बाबत शासनाकडून मान्यता देण्यात आल्याने विश्व वारकरी संप्रदाय यांच्यावतीने माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त केले व त्यांचे प्रतिनिधी या नात्याने सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीचेप्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक गणेश पुजारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विश्व वारकरी सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर महाराज अक्कलकोटे , जिल्हा सचिव अमर महाराज साळुंखे , महेश महाराज जाधव ,आनंद महाराज पवार ,संतोष माळवदकर, इरकल महाराज, कदम महाराज , सुतार महाराज व वारकरी संप्रदाय सदस्य उपस्थित होते.