१आॅक्टोबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय संगीत दिवस”म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.संगीत हा सर्वच देशांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये संगीतशिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व होते.आपल्याही प्राचीन शास्त्रांमध्ये संगीताच्या उत्पत्तीविषयी अनेक मनोरंजक कथा आहेत.सिंधू संस्कृतीच्या काळात संगीताची उत्पत्ती झाली असे मानले जाते.भारतामध्ये अतिप्राचीन काळापासून संगीताची आराधना केली जाते.या संदर्भातील उल्लेख पुराणे,रामायण,महाभारत,
दंतकथा यामधून मिळतो.संगीत कलेच्या विकासाचे चार टप्पे मानले गेले आहेत.हिंदुस्थानी संगीत इतिहासाचे चार टप्पे पुढीलप्रमाणे सांगता येतील-वैदिक कालखंड,पौराणिक कालखंड,सुवर्णयुग किंवा मध्यकाल,ब्रिटिशकाळ.
‘सं’म्हणजे स्वर,”गी”म्हणजे गीत,आणि”त” म्हणजे ताल. संगीतकला ही सर्व कलांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.स्वत:ला एकांतात ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत.नादयुक्त गायन,वादन,आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत म्हणतात.संगीत आणि अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा भक्कम पाया आहे.संगीत ही एक उपासना आहे.छत्रपती शिवाजी महारांजाच्या काळात शाहीर आपल्या कवनांमधून मावळ्यांना प्रेरित करण्याचे काम करत असत.भजन,युध्द,उत्सव आणि प्रार्थनेच्या वेळी गाण्याचा उपयोग अगदी पूर्वीपासूनच केला जातो.संगीताचा मुख्य स्त्रोत नैसर्गीक ध्वनी आहे.संगीत पूर्व युगामध्ये मानवाने निसर्गाचा आवाज आणि त्याची मधूर लय समजून घेण्याचा प्रयत्न केला.मानवप्राणी हा भूमीशी जोडला गेला आहे.भौगोलिक स्थिती आणि तिथले संगीत यांचा परस्पर संबंध असतो.
भारतीय शास्त्रीय राग म्हणजे बारा स्वरांपैकी काही निवडक स्वरांना घेऊन केलेले गायन. रागातील कोमल,तीव्र व स्वरांच्या आधारे राग केव्हा गायचा हे ठरविण्याचा एक विशिष्ट सिंध्दांत आहे.त्याला रागसमयसिध्दांत म्हटले जाते.भैरव आणि तोडी राग हा सकाळी गातात तर यमन आणि भूपाली संध्याकाळी गातात.विविध ऋतूंवर आधारीत राग आहेत.वर्षाऋतूचा मल्हार राग,वसंतऋतूचा वसंत राग,हेमंत राग असे मौसमी राग प्रसिध्द आहेत.निसर्गातील बदलणारे ऋतू पाहून मानवाला संगीताप्रती आत्मीयता आणि जिव्हाळा वाढत गेला.यातूनच स्वरांची उत्पत्ती प्राण्यांच्या आवाजातून झाली.मोराचा षंड्ज,कोकीळेचा पंचम,बेडकाचा धैवत,हात्तीचा निषाद,चातकाचा रिषभ,तर कावळ्याचा मध्यमअसतो असे ग्रंथामध्ये लिखित आहे. गीतातील मधुर स्वर अथवा नाद जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा आपोआपच तणावाचे शरीरामार्फत उत्सर्जन होउन मनाला शांती लाभते.म्हणूनच की काय संगीतातील “नाद” व “स्वरांना” “मंत्रशक्ती”म्हणतात, कारण संगीत शांती,दया,प्रेम,करुणा,औदार्य,
क्षमा,आत्मीयता,सौजन्य ह्या भावना मनात रुजवते.संगीत जीवनाला जगण्याची ऊर्मी देते.म्हणूनच अशी एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही जिला संगीत आवडत नाही.संगीत मनातील वेदनेला अलवार कुरवाळत,दु:ख विसरण्याला मदत करते.संगीताची एक वेगळीच परिभाषा असते.उदात्त संगीतातून मन आनंदीत होते.संगीत शास्त्रीय पध्दतीने कळू लागले की गाण्याचा निखळ आनंद घेता येतो.सध्याची पिढी सर्जनशील व जबाबदार झालेली पाहायची असेल तर तिच्यावर संगीताचे संस्कार शालेय वयापासूनच करणे आवश्यक आहे.कारण…संगीत ऐकण्याचे बरेच फायदे आहेत.संगीतामुळे मनावरचा ताणतणाव क्षणात नाहीसा होतो.मेंदूच्या मज्जातंतूला चालना मिळते.श्वसन समस्येवर मात करता येते.स्मरणशक्ती वाढते.चांगली झोप लागते.संगीतामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते.संगीत समुद्रासारखे खोल आहे.त्याच्यामध्ये जेवढे खोलवर जाऊ तेवधे संगीत आपल्याला जवळचे वाटू लागते व संगीताचे नवनवे पैलू उलगडू लागतात.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संगीत आपल्याला साथ देते,अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवाचा खरा आधार आहे.प्रत्येक धर्मामध्ये संगीताला अनन्यसाधारण असे महत्व आहे.संगीत एक अदब आहे,संगीत विनम्रता आहे. तर निरोगी मनासाठी संगीत रामबाण औषध आहे.आपल्याला आपलं मन दिसत नाही परंतू संगीतामूळे मनाला आयाम मिळतो.हिंदी चित्रपट सृष्टीने आजपर्यंत एकापेक्षा एक अशी सुंदर,अवीट गाणी रसिकांना दिली आहेत.”संगीत”चित्रपटातील सर्वच गाणी आजही रसिकमनाला वेड लावतात.आज”आंतरराष्ट्रीय संगीत दिना”निमित्त समस्त संगीतप्रेमींना हार्दिक शुभेच्छा…!
“शब्द सुरांच्या झुल्यावर
संगीत चांदणे फुलते”
मनातील तरल भावनांचे
गीत नवे जन्मते”
रुपाली वागरे-वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१