महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

बीड दि.४ | महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केशबाईकाकूंचे चिरंजीव व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी बोलताना कै. केशरबाई काकूंचे अथक परिश्रम व त्यांनी समाजाप्रती केलेल्या प्रचंड कार्याला उजाळा देताना श्री. देशमुख म्हणाले, “केशरबाई काकूंनी बीड येथे सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेजची स्थापना केली. आजवर या होमिओपॅथिक कॉलेजमधून अनेक नामवंत होमिओपॅथी डॉक्टरांनी शिक्षण प्राप्त केले व लौकिक मिळवला आहे. कोविड -१९ महामारीच्या काळात जगभर सर्व उपचार पद्धती कोरोना रुग्णांवर शक्य ते सर्व उत्तम उपचार करत आहेत. त्यात होमिओपॅथीदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक व सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती आहे.” असेही श्री. देशमुख यांनी म्हटले.

एकीकडे भारतातील एकूण होमिओपॅथी वैद्यकीय कॉलेजपैकी एक चतुर्थांश कॉलेज ही एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात अजून एकही शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेज नाही यावर त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून उपस्थितांना खात्री दिली की त्यांच्या येत्या कार्यकाळात राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असेही श्री. देशमुख म्हणाले.

या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग, आमदार विक्रम काळे, काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. कालिदास थिगळे यांच्यासहित होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.

#amitvdeshmukh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *