◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – अनिल
कविता – १) अजुनी रुसून आहे
२) तळ्याकाठी
आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)
जन्म – ११/०९/१९०१ (मुर्तिजापूर)
मृत्यू.- ०८/०५/१९८२ (नागपूर)
कार्यक्षेत्र – कविता, साहित्य, समाजशिक्षण.
कवी अनिल यांना मुक्तछंद काव्याचे प्रवर्तक मानले जाते. तसेच दशपदी हा १० चरणांचा कविता प्रकार कवी अनिल यांनी प्रस्थापित केला.
महाविद्यालयिन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९३० पासून कवी अनिल यांचा काव्यलेखनाला प्रारंभ झाला. निसर्ग आणि मानवी भावभावना यावर त्यांची कविता बहरत राहिली.
रवीकिरण मंडळातील कवींचा बोलबाला असताना कवी अनिल यांनी त्यांची कविता वेगळ्या दिशेने नेली.
वृत्त, यमक यांचे कवितेवरील बंधन अनिल यांना मान्य नव्हते. ही बंधने झुगारून त्यांनी मुक्तछंद कवितेचा पुरस्कार केला. त्यामुळे त्यांना मुक्तछंद कवितेचे प्रवर्तक समजले जाते.
त्यासोबतच सुनित (सॉनेट) (१४ ओळीची कविता) या धर्तीवर १० ओळींची कविता “दशपदी” या नवीन प्रकारात अनिल यांनी कविता लिहील्या आणि दशपदी हा नवा प्रकार प्रास्थापित केला.
पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात कला शास्त्राचा अभ्यासक्रम करीत असताना कुसुम जयवंत यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे त्या दोघांचे लग्न झाले.
त्यांच्या प्रेमातील पत्रसंवाद “कुसुमानिल” नावाने प्रकाशित झाला.
कवी अनिल भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कलकत्ता इथे गेले होते.
वकीली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वकीली व्यवसायही केला.
भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळावर त्यांची सल्लागारपदी नेमणूक झाली होती.
कवी अनिल यांचे दशपदी, पेर्तेव्हा, फुलवात, भग्नमुर्ती (दीर्घकाव्य), सांगाती, निर्वासित चिनी मुलास (दीर्घकाव्य) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले.
१९५८ साली मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे कवी अनिल अध्यक्ष होते.
कवी अनिल यांच्या साहित्य कार्याची दखल घेऊन १९७७ मध्ये त्यांना दशपदी या साहित्यकृतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला.
शिवाय १९७९ साली त्यांना साहित्य अकादमी फेलोशीप प्रदान करण्यात आली.
कवी अनिल यांच्या अनेक गाजलेल्या कविता आणि गाणी आजही रसिकांच्या मनमनात आहेत –
अजुनी रुसून आहे…
आज अचानक गाठ पडे…
कुणी जाल का सांगाल का…
वाटेवर काटे वेचित चाललो…
गगनी उगवला सायंतारा…
थकले रे डोळे माझे…
अशा अनेक आजरामर ध्वनीमुद्रीत कविता आहेत.
कवी अनिल यांच्या गाजलेल्या अनेक कवितांपैकी “अजुनी रुसून आहे” आणि “तळ्याकाठी” या दोन कवितांचा आस्वाद आपण घेऊयात.
अतूट प्रेम असणाऱ्या पत्नीचे निधन झाल्यावर तिच्या विरहात कवी अनिल यांनी “अजुनी रुसून आहे” ही कविता लिहून त्यांच्या पत्नीसंबंधी निस्सीम प्रेमाच्या विरही भावना व्यक्त केल्या आहेत.
तर “तळ्याकाठी” या त्यांच्या दशपदी प्रकारातील कवितेत अनिल यांनी त्यांच्या मनातील अस्वस्थता कोलाहल भावभावना यांच्या पासून दूर कुठेसे शांत ठिकाणी जाऊन बसण्याची भावना व्यक्त केल्याचे दिसते. मनाला शांतता मिळावी, ह्रुदयात कोणतेच विचार नसावेत या करीता एखाद्या शांत तळ्याकाठी बसून मनःशांती घ्यावी अशी कल्पना कवी अनिल व्यक्त करतात. आणि ही त्यांना अभिप्रेत असलेली शांतता ते तळ्याकाठच्या निसर्गातील प्रतिमा प्रतिके वापरून आपल्या तरल शब्दांमध्ये काव्यरूपात मांडतात तेव्हा एक अजरामर कविता जन्म घेते. यावरून आपल्याला कवी अनिल यांचे प्रतिभावान शब्दसामर्थ्य दिसून येते.
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !
- कवी अनिल
◆◆◆◆◆
तळ्याकाठी
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
- कवी अनिल
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■