फकिरागड’
नेर्ले येथील सुळकी डोंगराचे दलित महासंघाने केले ‘फकिरागड’ असे नामांतर
अण्णा भाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी केली फकिरा गडावर
दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०० वी जयंती नेर्ले येथे साजरी करत येथील सुळकी डोंगराचे ‘फकिरागड’ असे नामांतर केले.यावेळी बोलताना डॉ.मच्छिंद्र सकटे सर म्हणाले,अण्णा भाऊ साठे यांनी क्रांतीवीर फकिरा साठे यांचे क्रांतिकारक जीवन कादंबरीच्या माध्यमातून जगासमोर आणले. ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढा देणारे ते तसे पाहिले तर सांगली जिल्ह्यातील पहिले क्रांतिकारक होते.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याही आधी फकिरा साठे यांनी ब्रिटीश सरकार विरुद्ध युद्ध पुकारले होते. मात्र फाकिराचे कर्तृत्व दुर्लक्षित राहिले होते. सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी क्रांतीवीर फकिरा साठे यांची ओळख महाराष्ट्राला करून दिली. साहित्य क्षेत्रात फकिराला सन्मानाने उभे केले. मातंग आणि दलित बहुजन समाजातील तरुणांमध्ये फकिरा आता प्रेरणास्थान बनले आहे. ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध लढताना फकिराने ब्रिटिशांचे खजिने लुटले,गोदामे लुटली पण वाटप मात्र समानतेने केले.समतेचा विचार घेऊन लढणारे फकिरा हे खरे देशभक्त होता. न्यायप्रिय होते. ब्रिटिशांना फकिरा हवा होता. त्यांचावर पकड वॉरंट होते. अमानुष हजेरी प्रथा होती. पण क्रांतिवीर फकिरा ब्रिटिशांना सापडत नव्हते. ते वाटेगाव आणि नेर्ले या दोन गावांच्या मध्ये असणाऱ्या महादेव डोंगर आणि सुळकी डोंगरामधील दऱ्या- खोऱ्यात फकिरा वास्तव्य करुन होते.फकिरा हाती लागत नाही म्हणून ब्रिटीशांनी आपली छावणी नेर्लेच्या माळावर सुळकी डोंगराच्या पायथ्याशी स्थापन केली.तरीही फकिरा काही ब्रिटीशांच्या हाती लागत नव्हता. अखेरीस वाटेगावातील मातंग समाजातील अबाल वृद्धांना,स्त्री पुरूषांना व लेकरा बाळांना ब्रिटीशांनी ताब्यात घेऊन छावणीत डांबून ठेवले.आपल्या समाजाचे हाल होऊ नयेत म्हणून फकिराने ब्रिटीशांकडे आत्मसर्मपन केले.फकिरा आपल्या घोड्यांवरून छावणीकडे गेले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुर्वजांना दिलेली तलवार फकिराने ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या हातात दिली.मावळतीकडे झुकलेल्या सुर्याकडे आणि ज्या डोंगराने आपल्याला आश्रय दिला त्या सुळकी डोंगराकडे नजर टाकली व आपल्या समाजातील लोकांना मुक्त करण्याची मागणी केली. फकिराचा हा इतिहास अण्णा भाऊंनी जगासमोर आणला.फकिरामुळे अण्णा भाऊ देखील जगभर सन्मानित झाले.हे दोघेही आज मातंग बहुजन समाजाचे प्रेरणा स्थान बनले आहेत.अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने फकिराच्या कर्तुत्वाची उंची आणखी द्विगुणित व्हावी .वाटेगांवच्या या दोन्ही सुपुत्रांचा सन्मान व्हावा म्हणून दलित महासंघाच्या वतीने सुळकी डोंगराचे “फकिरागड”असे नामांतर केले.या फकिरा गडावर अण्णा भाऊ साठे व क्रांतीवीर फकिरा साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले आणि एक इतिहास घडवला. या ऐतिहासिक नामांतर आणि जयंती कार्यक्रमास दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.मच्छिंद्र सकटे, दलित महासंघाच्या नेत्या प्रा.पुष्पलता सकटे, सरचिटणीस प्रकाश वायदंडे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास बल्लाळ,वाळवा तालुका अध्यक्ष संतोष चांदणे,रवी बल्लाळ,अमर बनसोडे, अजिंक्य बल्लाळ, कृष्णप्रकाश बल्लाळ, अभिजित तडाखे, अभिजित धुमाळे, गणेश बल्लाळ,अक्षय बनसोडे,रोहन बंल्लाळ, राहुल बसवंत आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी फकिरा गडावर दलित महासंघाचा झेंडा रोवला.अण्णा भाऊ आणि फकिरा यांच्या जयजयकारानी फकिरा गड दुमदुमून सोडला.अत्यंत उत्साहाने अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करून दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते फकिरा गडावरुन उतरले.
*जय भारत! जय फकिरा!
*प्रा.अमोल महापुरे.* ९५०३३५९१२२