परपीडा हेच पाप

शिवास्त्र –


परपीडा हेच पाप

काही जणांचं केवळ आपल्या सोबत असणं ही भावना देखील आपल्या जगण्याचा कैफ सहस्त्रगुणित करत जाते तर काहीजणांना नुसतं लांबुनच बघितलं तरी आपल्या कपाळावर आठ्या येतात. हे आपल्याही बाबतीत सुध्दा होतच असेल ना.? आपलं भेटणं काहीजणांना स्वर्गसुखाचा आनंद देणारं असेल तर आपल्याला लांबुनच बघितल्यावर काहीजण त्यांचा मार्ग बदलून आपल्याला टाळण्याचा आटापिटाही करत असतील कदाचित.! हे असं का व्हावं.? आवडत्या व्यक्तीचा भलामोठा अक्षम्य गुन्हा नकळत झालेली किरकोळ चुक वाटायला लागतो तर नावडत्या व्यक्तीची क्षुल्लक नजरचुकही दंडनीय अपराध वाटायला लागते. दुरियॉ बढती है तो गलतफहमियॉ भी बढ जाती है, फिर जमाना वो भी सुनता है जो आपने कभी कहा ही नही. जोपर्यंत पुढची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागणारी असते ती आपली आवडती असते पण पुढचा सत्यासोबत असुनही फक्त आपल्या मनाप्रमाणे वागला नाही की आपण लगेच त्यांना आपल्या नावडत्यांच्या यादीत टाकतो. सत्य पचवायला नेहमीच कटू असतं. इमानदारी महँगा शौक है जनाब, ये हर किसी के बस की बात नही. खोटं बोलणं सोपं आहे, धारिष्ट्य लागतं ते खरं बोलायला. अशा धैर्यशील मित्रांचा हल्ली दुष्काळ आहे, जिकडे तिकडे स्वार्थी लबाडांचा सुळसुळाट झालाय.
टाळी एका हाताने वाजत नाही तद्वतच विसंवादाचे एकतर्फी सुसंवादात रुपांतर होत नाही. ‘झाले गेले गंगेला मिळाले, आपण दोघेही एकमेकांच्या कळत नकळत घडलेल्या चुकांना माफ करु, इथून पुढे फक्त प्रगतीचा विचार करु, वितंडवाद संपवून टाकू’ एक पाऊल माघार घेत समंजस भुमिका घ्यावी लागते. आता प्रश्न हा आहे की माघार कुणी घ्यायची.? उत्तर सोपं आहे ज्याला सकारात्मक, आनंदी जीवन जगायचे आहे त्याने. हे लिहित असताना जो श्वास मी आत घेतलाय तो बाहेर येईलच याचीही खात्री नसलेल्या क्षणभंगुर जीवनात द्वेष, राग, मत्सर, लोभ, लबाडी, चोरी, गद्दारी, लाचारी हे अवगुण हद्दपार करून प्रेम, करुणा, माया, ममता, इमानदारी, सच्चाई, स्वाभीमान हे मुल्य अंगिकारणे इतकं अवघड आहे का.?
जगप्रसिध्द लेखक स्मृतिशेष डेल कार्नेगी यांचे हाऊ टू विन फ्रेंन्डस् अँन्ड इंनफ्ल्युएन्स पिपल या शिर्षकाचे वर्ल्ड बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात की तीन ‘सी’ पासून स्वतःला दुर ठेवले पाहिजे. क्रिटिसाईझ, कंम्प्लेन, कंडेम, या तीन ‘सी’ सोबतच आयुष्य व्यतित करणाऱ्यांपासुन स्वतःला सुरक्षित अंतरावरच ठेवले तरच आपली प्रगती होऊन जीवन सुखी, समाधानी व आनंदी होते. भुतकाळातील त्याच त्या नकारात्मक घिस्यापिट्या रेकॉर्ड वाजवणारे, सातत्याने नकारात्मक तक्रारी करणारे, सदैव इतरांच्या फक्त दोषांवर बोटं ठेवणारे, शारीरिक व्यंगावर टिकात्मक फुटकळ विनोद करणारे, कपोलकल्पित अभासी विश्वात वावरणारे, प्रत्येक वक्तव्याचा आपल्या सोयीने चुकीचा व नकारात्मक अर्थ काढणारे लोकं सहसा कुणालाही आवडत नाहीत. लोक आपल्याला का टाळतात याचा शांतपणे बसुन कधी विचार न करता आपण टाळणाऱ्याच्या माथी सगळा दोष देऊन मोकळे होतो. अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करावे की कळत नकळतपणे मी तीन ‘सी’ला कवटाळुन तर बसत नाही ना.?
स्माईल अ लॉट, इट कॉस्टस् नथ्थिंग.! खिन्न, दुःखी, मुर्दाड थोबाडं बघणं कुणालाच आवडत नसत. आपल्या चेहऱ्यावरील नकारात्मक भाव आपल्या आजुबाजुच्या वातावरणातही नकारात्मक स्पंदनं निर्माण करत असतात. ‘युँही नहीं चेहरे पे हँसी आ जाती है यारों के, जहाँ भी जाते है सच्चाई और इमानदारी की खुशियॉ बांटते है.’ माझे वडील मा. न्या. भि. तु. नरवाडे पाटील साहेब नेहमी सांगतात, ‘तुम्ही स्वतःला सिध्द करा, जग तुम्हाला प्रसिध्द करेल.’ लोकांना हवंहवंसं वाटणारं वलयांकित व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर जाणिवपुर्वक स्वतःत नखशिखांत व चांगले बदल करावे लागतील. असत्य, अभासी, काल्पनिक विचारांचा त्याग करून वास्तव, विज्ञानवादी विचार स्विकारावे लागतील. नकळत एखादी चुक होणं गैर नाही पण वारंवार तीच चुक करणं यापेक्षा मोठा गुन्हा नाही. स्वतःच्या चोऱ्या लबाड्या लपविण्यासाठी लाळघोटी लाचारी करणाऱ्या नालायकांवर भरवसा ठेऊन प्रामाणिकांवर कपोलकल्पित आरोप करणं, इमानदार व्यक्तीवर विनाकारण संशय घेणं, खोटे आरोप करणं, प्रँक्टिकल सोडून कल्पनाविलास रचणं, एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढणं, नेहमीच चिडचिड करणं, वस्तुंची आदळआपट किंवा तोडफोड करणं, बायालेकरांना मारहाण करणं, सतत रागातच राहणं, नेहमी नकारात्मक विचार करणं, इत्यादी महापापी कृत्यांना जगातील कोणत्याच न्यायालयात क्षमा नसावी बहुदा.! ‘बहुत आसान है जमींन पर आलिशान मकान बनाना, दिलों मे जगह बनाने मे उम्र गुजर जाती है.’ मनावर संयम ही जगातील सर्वात मोठी पुजाअर्चा, आराधना आहे. पावलोपावली द्वेषमूलक भावना पेरायची, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रेटून खोटे व काल्पनिक बोलायचे, चोऱ्या करायच्या, विनाकारण चिडचिड करायची, असंविधानिक कृत्य करायचे आणि गंगास्नान करून देवदेव करत बसायचे, हे कोणते अध्यात्म.? ही कुठली ध्यानधारणा.? जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात, ‘गंध टिळेमाळे, हे तर देहाचे गबाळे.!’ ज्याच्या अंगी प्रामाणिक करुणा नाही, इमानदार प्रेम नाही, खरी ममता नाही, संवेदनशील क्षमाभाव नाही, दयाबुध्दी नाही, चांगली जीवनमूल्ये नाहीत अशांना कोण जवळ करेल.? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘सच काम किया जग मे जिसने, उसने प्रभुनाम लिया न लिया.’ जगाला आवडेल असं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर बुढे नही बडे बनिये. प्रगल्भता फक्त वय वाढल्याने येत नाही, सद्गुण वाढवावे लागतात. निम्म्या गोवऱ्या मसनात पोहोचुनही काही जणांना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करता येत नाही त्यामुळे मी अमक्याचा मेहुणा, तमक्याचा दाजी, फलाण्याचा उजवा हात, बिस्ताण्याचा कार्यकर्ता अशी उसनी ओळख सांगत फिरावे लागते. असले लाजीरवाणे जीणे काय कामाचे.? आपल्या आधी आपली किर्ती किंवा अपकिर्ती लोकांपर्यंत पोहोचलेली असते. सलिका जिंदगी जीने का दमदार होना चाहिये, जो भीड मे अलग नजर आये ऐसा किरदार होना चाहिये. सतत टिका करण्यापेक्षा किंवा भूतकाळाच्या नकारात्मक बाबी प्रसारित करण्यापेक्षा नवीन, वास्तव, विज्ञानवादी, प्रगतीमुलक विचार पेरणाऱ्यांकडेच जग आकृष्ट होतं. जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात, ‘पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा’ खोचक, खोटे, काल्पनिक, भुतकालिक नकारात्मक बोलून मनोआघात करणे हे पाप तर सर्वांशी प्रेमाने वागणे, भविष्यकालिक सकारात्मक प्रगतीपर व नवकौशल्यपुर्ण बोलणे हेच पुण्य.! या जगात जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो, तोच जगावर राज्य करतो. जर तुमच्यात समजून घेण्याची ताकत नसेल तर समजून जा, तुम्ही लवकरच अपयशी होणार आहात.


इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील,

नांदेडमास्टर कोच – जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युट,

नवी दिल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *