राखी पौर्णिमेच्या पावन पर्व आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी
आज रक्षाबंधन. राखी पौर्णिमेच्या पावन पर्वावर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती साजरी करुन आम्ही युगसाक्षी लाईव्ह या वेबपोर्टलला प्रारंभ केला. या पोर्टलचे प्रमुख दिगांबरराव वाघमारे यांच्या जन्मदिवसाची झालरही या नवप्रारंभास आहे. महाराष्ट्राच्या माणसांनी मराठी माणसांसाठी अखंड तेवत राहणारी चळवळ सुरु झाली आहे. हा माणसांचा उत्सव आहे. आजरक्षाबंधनाचा उत्सव 3 ऑगस्ट 2020 रोजी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटात रक्षा सूत्र बांधतील. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सांगितला आहे. रक्षाबंधन 2020 मुहूर्त म्हणजेच राखी बांधण्याची वेळ सकाळी 09:27:30 ते रात्री 21:11:21 पर्यंत अशी दिली आहे. याचा कालावधीः 11 तास 43 मिनिटे तर रक्षाबंधन दुपारी मुहूर्त 13:45:16 ते 16:23:16 पर्यंत देण्यात आला आहे. मात्र आपण विज्ञानवादी असल्यामुळे कोणत्याही चांगल्या कामासाठी मुहूर्त पाहत नाही. रक्षाबंधन हा बहिणीच्या रक्षणासाठी आणि बहिणीने भावाच्या समृद्धतेसाठी केल्या जाणाऱ्या मनोकामनांसाठी आयोजित केला जातो. हा सण म्हणजे मने जुळविणारा आणि एकतेत बांधणारा सण आहे. मात्र कोरोनाचे सावट या बहिण भावाच्या पवित्र भावनेवर पडले आहे. लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेणारा आणि हजारोंना मृत्युमुखी पाडणारा हा कोरोना कोणताही मुहूर्त पाहून आलेला नाही.
रक्षाबंधनासाठी बहिणीने आणि भावानेही आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटाईझर यांचीही उपस्थिती राखीसोबत असणार आहे. ओवाळणी आणि इतर कार्यक्रमांसाठी कोणतीही निष्काळजी धोकादायक ठरू शकते. एकमेकांविषयी प्रेम, आदर आणि उत्कर्षभावना असणाऱ्या बहीणभावांनी एकमेकांना कोरोनाची भेट मिळणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या पौर्णिमेला श्रीदत्तशिखर माहूरगड परिक्रमा यात्रा आयोजित करण्यात येते. या यात्रेत लाखो भाविक भक्त सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही नियोजित परिक्रमा यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीदत्तशिखर संस्थानाने घेतला आहे, यासाठी आम्ही मनापासून धन्यवाद देतो. कोणत्याही भाविक भक्तांनी परिक्रमा यात्रा आहे म्हणून श्रीदत्त शिखर माहूरगड येथे येऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती दत्तशिखर संस्थान विश्वस्त मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आहे.
कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे संपुर्ण जगासह भारतात उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मार्च 2020 पासून सर्वच मंदिरे भाविक भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना अंमलात आणल्या. परंतु हे संकट वरचेवर गडद होत चालले आहे. अशा संकटकाळात मिडियातील सर्व प्रतिनिधी मोठ्या हिरीरीने आपापल्या परीने बातम्या पोहचविण्यात, जनजागृतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच मार्गाने जाणाऱ्या पायवाटेवर युगसाक्षी लाईव्ह या न्युज पोर्टलने हे आश्वासक पाऊल ठेवले आहे.
गंगाधर ढवळे ,नांदेड