◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
कवी – माधव जूलियन
कविता – प्रेमस्वरूप आई
डॉ.माधव त्रिंबक पटवर्धन (उर्फ माधव जूलियन)
जन्म – २१/०१/१८९४ (बडोदा).
मृत्यू – २९/११/१९३९ (४५ वर्षे).
माधव जूलियन हे प्रतिभावंत कवी होते. रविकिरण मंडळाचे ते संस्थापक व सर्वात यशस्वी सदस्य होते. फारसी आणि इंग्रजीचे ते प्राध्यापक होते.
इंग्लीश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःला जूलियन असे टोपण नाव घेतले (या टोपण नावाबाबत विविध मतप्रवाह सांगितले जातात).
गझल व रुबाई हा काव्यप्रकार फारसीतून मराठीत आणण्याचे श्रेय माधव जूलियन यांना जाते.
माधव जूलियन यांनी कवितेशिवाय भाषा शास्त्रीय लेखनही केले. त्यांनी भाषाशुद्धि विवेक हा ग्रंथ लिहिला.
उदरनिर्वाहासाठी त्यांनी अध्यापकीय पेशा स्विकारला होता. फारसी व इंग्रजी भाषा ते शिकवित असत.
गझल, सुनीते, खंडकाव्य, वृत्तबद्धकाव्य यांचा माधव जूलियन यांनी कलात्मक ताकदिने वापर केला. काव्यलेखन, काव्यविचार, काव्यसमिक्षा आणि भाषांतर अशा विविध माध्यमातून माधव जूलियन यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान मोलाचे आहे.
दित्जू, मा.जू. आणि एम. जूलियन या टोपण नावांनीही त्यांनी लेखन केले आहे. काही लेखन इंग्रजीतही आहे. कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन माधव जूलियन यांनी केले. ख्यातनाम फारसी कवी उमर खय्याम यांच्या रुबायांचा मराठी अनुवाद १९२९ मध्ये माधव जूलियन यांनी केला. प्रयोगशिलता हा त्यांच्या काव्यात्म व्यक्तीमत्वाचा महत्वाचा घटक होता.
गज्जलांजली, छंदोरचना, तुटलेले दिवे, द्राक्षकन्या, मधुलहरी हे काव्यसंग्रह आणि नकुलालंङकार, , विरहतरंङग, सुधारक हे खंडकाव्य आणि स्वप्नरंजन हा स्फुट कविता संग्रह अशा माधव जूलियन यांच्या विविध साहित्यकृती प्रकाशित झालेल्या आहेत.
१९३३ मध्ये नाशिक येथे झालेल्या कवीसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९३४ मध्ये बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनात कवीशाखेचे अध्यक्ष होते.
१९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
छोदोरचना या त्यांच्या अभ्यासपूर्ण काव्य छंद विषयक साहित्यकृतीसाठी मुंबई विद्यापिठाच्या मराठी साहित्यातील डि.लिट. ही मानाची पदवी त्यांना ०१/१२/१९३८ रोजी प्रदान करण्यात आली.
कशासाठी पोटासाठी…
जीव तुझा लोभला माझ्यावरी…
प्रेम कोणीही करीना…
प्रेमस्वरूप आई…
मराठी असे आमुची मायबोली…
अशा माधव जूलियन यांच्या अनेक गाजलेल्या कविता आहेत.
आईबद्दल अनेक कवींनी कविता केलेल्या आहेत. माधव जूलियन यांची “प्रेमस्वरूप आई” ही खूप गाजलेली रसिकमान्य कविता शालेय पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात होती. माधव जूलियन यांचे आई विषयी आर्त प्रेमळ भाव या कवितेत व्यक्त झालेले आपल्याला पहायला मिळतात. आईच्या आठवणीत व्याकूळ होणारा हा कवी आईने फिरून पुन्हा जन्म घ्यावा आणि मीही तुझ्याच पोटी पुन्हा जन्म घेईन अशी उत्कट आर्जव इच्छा व्यक्त करतो, तेव्हा नकळत आपलेही डोळे पाणावतात….
प्रेमस्वरुप आई
प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई
बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी
नाही जगात झाली, आबाळ या जीवाची
तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची
चित्ती तुझी स्मरेना काहीच रुपरेखा
आई हवी म्हणोनी सोडी न जीव हेका
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुजांचे वात्सल्य लोचनाही
वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतवाया हृस्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरुनी येईन मी ही पोटी
खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी
- माधव ज्युलियन
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/