दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आक्रमक; हिंदुत्वाचे धडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नीट शिकून घ्या…,

वाचा त्यांचे संपूर्ण भाषण..!

मुंबई;

 कोरोनाचे संकट आणि जीएसटी व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना सरकार पाडापाडीचे उद्योग करणे हे तर देशात अराजकाला आमंत्रण आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्रातील मोदी सरकारला रविवारी दिला. हिंदुत्वाचे धडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नीट शिकून घ्या, अशा कानपिचक्याही ठाकरे यांनी भाजपला दसरा मेळाव्यात दिल्या.

गेल्या वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने त्यास महाविजयादशमी मेळावा असे नाव देण्यात आले होते. शिवसेनेचे हिंदुत्वाशी असलेले नाते अधोरेखित करण्यासाठी हा मेळावा वीर सावरकर सभागृहात ठेवण्यात आला. तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, या शब्दांनीच उद्धव ठाकरे यांनी भाषणास सुरुवात के ली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या दसरा मेळाव्यात सकाळी के लेल्या भाषणातील हिंदुत्वाबाबतच्या विधानांचे दाखले देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. हिंदू व हिंदुत्वाबाबत काही लोक संभ्रम पसरवत आहेत. हिंदुत्वाला संकुचित के ले जात आहे, अशा मोहन भागवत यांच्या विविध विधानांचा दाखला ठाकरे यांनी दिला. मंदिर, पुजाअर्चा हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे, याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी भाजप आणि कोश्यारी यांना लक्ष्य केले. राजकारण म्हणजे शत्रूशी युद्ध नव्हे, विवेक पाळा हा भागवत यांचा संदेशही समजून घ्या, असेही ठाकरे म्हणाले.

हे आहे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण :

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…

आज महा विजयादशमी आहे, त्या निमित्ताने दसऱ्याच्या तर शुभेच्छा आहेच.

पुढच्या महिन्यात एक वर्ष होतंच आहे. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!

आज मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला दसरा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुफान महासागर लोटला असता. मला खात्री आहे तो तुफान महासागर, त्या लाटा इथपर्यंत आल्या नसल्या तरी तो महाराष्ट्रामध्ये उचंबळून, उसळून हा सोहळा बघतोय.

नेहमीप्रमाणे शिवसेनाप्रमुखांचे भाषण असायचेच. तेच विचारांचे सोने अजूनही आपल्या हृदयामध्ये आहे आणि तेच विचारांचे सोने घेऊन आपण पुढे चाललो आहोत.

आज महिलांवरती अत्याचार होताहेत, हत्या होताहेत. हे नुसतं आरोपासाठी मी बोलत नाहीये, की बघा तुमच्या राज्यामध्ये काय चाललंय, नाही, हे कुठेच होता कामा नये!

सकाळी मोहन जी भागवत यांनी हिंदीतून देशाला उद्देशून एक भाष्य केलं. हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर का डोकं असेल तर त्या डोक्याला म्हणावं विचार करा, हे हिंदूत्व तुमचं पटतं का? निदान सरसंघचालकांनी सांगितलेलं हिंदुत्व तुम्ही मानता आहात की नाही? आणि त्यांचं वाक्य आहे, “हिंदू, हिंदुत्त्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है।” कौन है? कहां है? कौन ये लोग है? पता है आपको? कहा रह रहें है?

छत्रपती शिवाजी महाराजांकडून जर आपण काही शिकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचा आपल्याला काही अधिकार नाही. छत्रपतींनी आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर का कोणी पाठीत वर केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही.

मला पहिला दसरा आठवला, प्रबोधनकारांचे भाषण आठवले. त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते, महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा प्रदेश नाही, ही वाघाची औलाद आहे. त्याला जर का डिवचलं तर काय होतं ह्याचे इतिहासात दाखले आहेत, भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील, तोच हा महाराष्ट्र आहे!

सध्या कोरोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. पण आपल्याकडे काही जणांना लस, इंजेक्शन देण्याची गरज असते. काही जणांना माणसांची इंजेक्शन चालत नाही, गुराढोरांची द्यावी लागतात आणि काही जणं तर अशी बेडकं असतात,सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात. मी लहान असताना एक गोष्ट, कविता की गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली. मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय. पण चिरका, किरका आवाज येतोय तर बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल, होऊच शकत नाही.

आज आम्हाला सुद्धा तोबा गर्दीचा मेळावा करता आलाच असता की. परंतू आम्ही हे नियम पाळतो, का पाळतो? कारण मी मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर मी महाराष्ट्र राज्याचा कुटुंबप्रमुख आहे. मला माझ्या जनतेची काळजी आहे. तुम्हाला नसेल, तुमच्यासाठी महाराष्ट्रातील जनता फक्त मतं असतील, मात्र माझ्यासाठी ती माझ्यासारखी हाडामासांची, रक्ताची माणसं आहेत. ती माझी माणसं आहेत! माझे ते कुटुंबिय आहेत. मी उगाच नाही हे लावून फिरत ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’!

जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देताय, त्यातलं थोडसं लक्ष तुम्ही देशावर द्या! आज देश रसातळाला चाललाय. मी मुख्यमंत्री म्हणून गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झालेल्या भागात गेलो होतो, शेतकऱ्यांची घरदारं वाहून गेलीत, विहिरी बुजल्यात, रस्ते वाहून गेलेत, इलेक्ट्रिक खांब पडलेत, मदत करायचीये, मदत करतोय… पण मदत करताना सुद्धा पैसे आणायचे कुठून? कारण आपल्या हक्काचा GST जवळपास २८ हजार कोटी व वरचे १० हजार कोटी म्हणजे ३८ हजार कोटी येणं आजही केंद्राकडे बाकी आहे. ते देत नाहीयेत. आमचे ३८ हजार कोटी देत नाहीयेत आणि बिहारला फुकट लस देताहेत… कोणाच्या पैशाने देताहेत?

काय केलं शिवसेनेनं? मराठी माणसाला वडापाव दिला? हो दिला, भीक मागून खायचं नाही, जे काय खाशील ते मेहनतीने आणि हक्काने खा, हा त्यातील संदेश होता.

एकाने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र! त्याने आत्महत्या केली, त्यात काही काळबेरं असेल तर माझ्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते ही शोधून काढलं असतं. पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला. त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागलात? महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदेश, ठाकरे कुटुंबिय, आदित्यवर चिखलफेक करायला लागलात. तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलतोय, तोंडात शेण भरून गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावर टाकल्या. काय झालं? आता तेच शेण आणि गोमुत्राने भरलेलं तोंड, ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा. तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत, पापी वृत्तीची माणसं आम्ही नाही आहोत.

कोरोनाचे संकट असताना सुद्धा जवळपास १६००० कोटी, त्यातल्या दोन चिनी कंपन्या बाहेर काढल्या तरी येत्या आठ-पंधरा दिवसात आपण आणखीन काही हजार कोटींचे सामंजस्य करार करतो आहोत. महाराष्ट्रात चहुबाजूने उद्योजक येऊ इच्छित आहेत, त्यांना आपण आमंत्रण देतोय.

आज आपण हजारो कोटींचे MoU केलेले आहेत काय झालं त्यांचं ? पहिल्या सरकारच्या काळात सुद्धा झाले होते पण आपण जे MoU जून जुलै मध्ये केले होते, बहुतेक सगळ्या उद्योजकांना आपण जमिनी दिलेल्या आहेत, बहुतेक उद्योजकांच्या अटी शर्थी काढून नाही म्हटलं तरी त्यांनी एक सुरुवात केली आहे.

हे शिवसेना करतेय, महा विकास आघाडीचं सरकार करतंय. हजारो कोटींचे MoU आणि गुंतवणूक येतेय ती कोणासाठी येतेय तर या महाराष्ट्रातील भूमी पुत्रांसाठी येतेय.

जे उद्योग येतील ते जाहीर केले जातील आणि तिथे ज्या पद्धतीचे कुशल किंवा अकुशल काम करण्यासाठी माणसं लागतील ती मला या मराठी मातीतलीच हवी आहेत.

का म्हणून तुम्ही कर्ज उचलताय व आम्हाला उचलायला लावताय? कर्ज फेडणार कोण? कर गोळा करण्याचा जो आमच्याकडे अधिकार होता, त्याही वेळा शिवसेनेने GST ला विरोध केला होता. सरळ द्यायचं ते फिरवून कसं देणार तुम्ही? म्हणजे इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली मग सगळीकडे वाटणार.

पण येत नाहीए पैसा! मग GST जर का तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल, तर आज या महा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, या पुढे या आपण चर्चा करू यावर.

GST ची जी काही करपद्धत आहे, ती जर का फसली असेल आणि मला वाटतं फसलीये ती. आमच्या हक्काचा पैसा जो आम्हाला मिळायला हवा तो आम्हाला मिळत नाही. प्रत्येक जण बोंब मारतोय, पत्रावर पत्र लिहिली जाताहेत, त्या पत्रांना केराची टोपली दाखवली जातेय.

ते पैसे जर का मिळणार नसतील आणि ही करप्रणाली जर चुकली असेल, तर पंतप्रधानांनी देखील प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा करावी. नाहीच तर GST ची पद्धत रद्द करून, पुन्हा जुन्या करप्रणाल्या आणायची आज गरज असेल तर ते केलं पाहीजे.

देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही. मुंबई तर ते महाराष्ट्रापासून तोडू शकतच नाहीत. कारण शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरून इशारा दिला आहे, जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

ही शिवसेना जिवंत आहे आणि शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही. जो काही कारभार आम्ही करत आहोत, तो तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आहोत. पण भारतीय जनता पक्ष जे काही करत आहे, ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात, निदान त्या मातीशी तरी ईमान ठेवा ना, मित्रपक्षाशी ठेऊ नका. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर फटाके नका वाजवू पण निदान खोटं तरी बोलू नका.

एक निर्णय आपण घेतला, तो म्हणजे आरेचं जंगल वाचविण्याचा! जवळपास ८०८ एकर, हे असं उदाहरण संपूर्ण जगात दुसरीकडे कुठेही नसेल. जंगल उजाड करून शहरं वसवली गेलेली आहेत पण शहरामध्ये जंगल राखणे हे तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं आहे. मेट्रोची कारशेड, तिथे रातोरात झाडांची कत्तल करून तिकडे करणार होते. ती कारशेड, मी आल्याआल्या पहिली त्याला स्थगिती दिली, त्यानंतर अभ्यास झाला. आता अभ्यास किती काळ करायचा? तुमचं सरकार गेलं तरी तुमचा अभ्यास होत नाही त्याला मी काय करू?आपण ती कारशेड कांजूरमार्गला नेतोय. एक रुपया खर्च न करता सरकारची जमीन आपण मेट्रोसाठी घेतली आहे.

ते काय म्हणाले? विलासी राजा आणि त्याची अहंकारी मुलं? मग मी असं म्हटलं तर, “अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या.” कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आता महाराष्ट्राने संपवला आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इकडे मर्द मावळ्यांचंच सरकार येणार आहे.

जे काही चालले आहे संपूर्ण देशात, हे फार विचित्र चालले आहे. कोरोनाचे संकट आहेच, जगभरात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये भाजपला रस असेल तर मला असं वाटतं की, आपण अराजकाला आमंत्रण देत आहोत.

मी मराठा, ओबीसी, धनगर समाज, सर्वांना सांगतो की, आम्ही तुमचे आहोत, हे सरकार तुमचे आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सगळ्यांना वचन आहे आणि हा न्याय देताना कोणाचंही काही काढून देणार नाही.

मी हात जोडून एकच नम्र विनंती करतो की, जातीपाती आणि समाजामध्ये जे कोणी महाराष्ट्रद्वेष्टे भिंती उभ्या करू इच्छित असतील, तर त्यांच्या कारस्थांनाना बळी पडू नका. कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात, तुम्ही म्हणजे शिवरायांचे मर्द मावळे आहात. तुमच्यामध्ये जर तुटफुट झाली, तर महाराष्ट्राचे तुकडे करायला ते मागेपुढे बघणार नाहीत.

महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असे मी काही करणार नाही, ही शपथ दसऱ्याच्या निमित्ताने घेऊन तूर्त मी आपली रजा घेतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *