भारतीय क्रांतीकारकांचे मेरुमणी हुतात्मा भगतसिंग.

शहीद भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सशस्त्र क्रांतिपर्वाचे अग्रणी होते.”भारतीय क्रांतीकारकांचे मेरुमणी”या शब्दात त्यांचा गौरव केला जातो.भगतसिंग यांचा जन्म २८सप्टेंबर १९०७रोजी पंजाबमधील लाहोरजवळ असलेल्या बांग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला.

त्यांचे संपूर्ण घराणेच क्रांतिकारक होते.त्यांचे वडील किशनसिंग हे स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय होते.देशासाठी अनेक वेळा त्यांनी कारावासही भोगला होता.त्यांच्या मनातील प्रचंड देशभक्ती पाहून भगतसिंग यांच्या कोवळ्या बालमनावर देशासाठी सर्वस्व त्यागण्याची प्रेरणा मिळत गेली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे “बांग”या गावी झाले.पुढे नॅशनल काॅलेजमध्ये शिकून १९२३साली ते बी.ए.झाले.शिक्षण चालू असतानाच त्यांनी अजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून दिले.१९२५ला भगतसिंग यांनी नौजवान भारत सभेची स्थापना केली.”इन्कलाब जिंदाबाद”व “हिंदुस्थान जिंदाबाद”या स्फूर्तीदायक घोषणांनी त्यांनी सर्वांना एकजूट करुन देशसेवेसाठी प्राणपणाला लावण्याची तयारी दर्शवली.फेब्रुवारी १९२५च्या रात्री लखनौजवळ काकोरी स्टेशनमधून सरकारी खजिना घेऊन निघालेल्या आगगाडीला वाटेतच अडवून खजिना,पिस्तुले,बाॅम्ब आदी हस्तगत केले.

काकोरी कटामुळे इंग्रजांनी क्रांतिकारकांवर करडी नजर ठेवली.त्यामुळे काही दिवस भगतसिंग भूमिगत होते.तरीही त्यांनी त्यांच्या कार्यात खंड पडू दिला नाही.याच काळात भगतसिंग यांची ओळख चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली.क्रांतिकारकांची नवी संघटना स्थापन करुन तिचे नाव”हिदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन”असे ठेवण्यात आले.स्वतंत्र भारतात शेतकरी आणि कामगारांचे राज्य स्थापन करणे व शोषणविरहित समाजाची निर्मिती करणे हीच या संघटनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.


३०आॅक्टोबर १९२८रोजी सायमन कमिशनविरुध्द लाहोर शहरात झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व वयोवृध्द काॅग्रेस नेते लाला लजपतराय यांनी केले.त्या वेळी इंग्रज पोलिसांनी निदर्शकावर अमानुष लाठीहल्ला केला.त्या लाठीहल्ल्यामध्ये लालाजींना जब्बर मार लागला आणि यातच पुढे त्यांचा अंत झाला.यामूळे देशात संतापाची लाट उसळली.लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या स्काॅट या इंग्रज अधिका-याला मारण्याची योजना आखली गेली.

यासाठी भगतसिंग,चंद्रशेखर आझाद,राजगुरु व जयगोपाल यांची निवड झाली.पण १७ डिसेंबर १९२८रोजी स्काॅटऐवजी सॅडर्स हा दुसरा इंग्रज अधिकारी ठार झाला.चिडलेले इंग्रज भगतसिंग व त्यांच्या अन्य साथीदारांचा कसून शोध घेऊ लागले.भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी ९एप्रिल १९२९रोजी कायदेमंडळाच्या सभागृहात”इन्कलाब जिंदाबाद”च्या घोषणा देत हातबाॅम्ब टाकून इंग्रजांना दणाणून सोडले.


यानंतर भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांच्यावर सरकारने विविध आरोपांखाली खटले भरले.भगतसिंग व त्यांच्या सहका-यांना अटक झाल्यानंतर देशाच्या जनतेत इंग्रजाविरुध्द संतापाची लाट पसरली.क्रांतीकारकांवर इंग्रज सरकारने गुप्तपणे खटला चालविला.या खटल्यात भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.शेवटी२३मार्च१९३१रोजी या तीन क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली.सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी हसत हसत मृत्यूला कवटाळले.”इन्कलाब जिंदाबाद”चा नारा श्वासात श्वास असे पर्यंत दिला.असे महान,वीर सुपूत्र ज्या मातेच्या पोटी जन्मले.ती माता खरच धन्य आहे…अन् तिचे बलिदान…धन्य ही पावन भूमी जिला बंधनमुक्त करण्यासाठी स्व:ताच्या जिवाची देखील पर्वा केली नाही अशा अनेक वीर,शहीद,हूतात्म्यांना माझा मानाचा मुजरा…”जय हिंद,जय भारत”.

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *