केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंबाजोगाईच्या वैभव वाघमारेचे यश
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील भूमिपुत्र वैभव विकास वाघमारे याने केंद्रीय लोकसेवा आयोग,दिल्ली यांच्या वतीने सप्टेंबर-2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत देशातून 771 रँक प्राप्त करत उज्ज्वल यश संपादन केले आहे.वैभव वाघमारे यांच्या स्पृहणीय यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.वैभव वाघमारे हे येथील शिक्षक विकास वाघमारे व शिक्षिका आशाताई वाघमारे (गवळी) यांचे सुपुत्र आहेत.तालुक्यातील नांदडी हे वाघमारे यांचे मुळ गाव आहे.वैभवचे आजोबा ईश्वर वाघमारे व आजी भिमाबाई वाघमारे हे दोघेही शेतमजूर होते.स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी वैभवचे वडील विकास वाघमारे यांना शिक्षक केले.विकास वाघमारे हे सध्या लातूर येथील शंभूलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत.तर आशाताई वाघमारे (गवळी) या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत.वैभवने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मंदिर विभागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले.तर माध्यमिक शिक्षण हे देशी केंद्र लातुर येथून पुर्ण केले.दहावीला असताना वैभवने शंभर टक्के गुण प्राप्त केले होते.तर शाहू महाविद्यालय,लातूर येथे अकरावी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले.बारावीला असताना वैभवने 87 टक्के गुण घेऊन मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला होता.पुणे येथे COEP महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.त्याने 2018 साली लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली.त्यानंतर सप्टेंबर-2019 साली केवळ दुस-याच प्रयत्नात त्याला हे यश प्राप्त करता आले.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वैभव विकास वाघमारे याने देशातून 771 वी रँक प्राप्त केली आहे.वैभव वाघमारे याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.