‘दादा’साहेब…….
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर
राजकारणातील दिगग्ज व्यक्तिमत्त्व.
०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. दादासाहेब या नावाने ते सर्वाना सुपरिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी लिलया सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते… माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातच त्यांना अतिशय जवळून पाहता आणि अनुभवता आलं. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘अल्फा मराठी’ च्या बातमीपत्रात ‘एक दिवस नेत्यासोबत’ या विशेष सिरीजसाठी त्यांच्यासोबत दिवसभर राहण्याचा योग आला. त्यावेळी मोठ्या दिग्गज राजकारण्यासोबत एक दिवस अशी निवडणूक विशेष सिरीज ‘अल्फा मराठी’वर सुरू होती. अतिशय नवखा असतानाही सुदैवाने हे कव्हर करण्याची जबाबदारी ऑफिसने माझ्यावर टाकली. आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्यासोबत निलंगा मतदारसंघात फिरता आलं. सकाळी साहेबांच्या निलंगा येथील ‘अशोक’ बंगल्याहुन साहेबांच्या गाडीत त्यांच्या बाजूला बसून निलंगा मतदारसंघात प्रवास सुरु झाला. साहेब हे अतिशय शिस्तप्रिय आणि कडक असल्याचे ऐकिवात होतं. त्यात पत्रकारितेत मी नवखा असल्यामुळे माझ्यावर मोठं दडपण होतं. पण साहेबांनी अगदी आत्मियतेने चर्चा करीत माझ्याविषयी, माझ्या पत्रकारितेविषयी विचारपूस करीत बोलतं केलं. त्यावेळी त्यांच्यातील सहजता दिसून आली. परिणामी माझ्यावरील दडपण काहीसं हलकं झालं. त्यावेळी त्यांच्यातील एक मोठा राजकीय नेता मला जवळून पाहता, अनुभवता आला. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी त्यांचे असलेले योगदान सांगितलं. याशिवाय इतरही अनेक रोचक राजकीय किस्से त्यात काही ऑन रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड असलेले किस्से साहेबांनी त्यावेळी दिवसभराच्या दौऱ्यात सांगितले. सायंकाळी निलंगा येथील ‘अशोक’ बंगल्यावर समारोप करताना साहेब पाठीमागील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. पुढे अनेकदा साहेबांच्या भेटी झाल्या. मात्र उतार वयात साहेब पत्रकारांच्या कुठल्याच वेड्या-वाकड्या प्रश्नांमध्ये अडकले नाहीत. कुठलेच वादग्रस्त विधान त्यांच्या उभ्या राजकीय आयुष्यात आणि उतार वयातील राजकारणातही केलं नाही. अतिशय परिपक्व उत्तरे ते नेहमीच मुलाखतीत, पत्रकार परिषदेत देत असत. कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी वयाच्या नव्वदीत ही मोठ्या जिद्दीने मात केली होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत पुणे येथील खाजगी रुग्णालयात मालवली. आणि राज्याच्या राजकारणातील पितामह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. गांधी घराण्याशी त्यांची जवळीकता असलेले ते काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत नेते होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर लातूर जिल्ह्यानेही एक मोठा नेता गमावला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती आई तुळजाभवानी त्यांच्या कुटुंबियांना, कार्यकर्त्यांना, समर्थकांना देवो ही प्रार्थना. ‘दादा’ या नावाला ते उभ्या आयुष्यात अगदी नावाप्रमाणे जगले… अशा ‘दादा’ साहेबांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.-
शशिकांत पाटील,पत्रकार- प्रतिनिधी/ झी २४ तास,लातूर जिल्हा.