कवी – सुरेश भट
कविता – जगत मी आलो असा
सुरेश श्रीधर भट (गझलसम्राट)
जन्म – १५/०४/१९३२ (अमरावती)
मृत्यू – १४/०३/२००३ (नागपूर) (७१ वर्षे).
कार्यक्षेत्र – काव्य, साहित्य, पत्रकारिता.
साहित्य प्रकार – कविता, गझल.
सुरेश भट यांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेत गझल काव्य प्रकार रुजविला म्हणून त्यांना गझलसम्राट असे संबोधले जाते.
सुरेश भट हे उत्तम गायक आणि तबला वादकही होते.
लहानपणातच त्यांना पोलिओ झाला होता आणि कुटुंबातही ते थोडे दुर्लक्षित राहिले.
बी.ए.ला ते दोन वेळा नापास झाले, तिसऱ्या प्रयत्नात पास झाले. पुढे त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला. अमरावती मध्ये ग्रामीण भागात नोकरी करीत असतानाच त्यांनी कवितेचा छंदही जोपासला. त्यांच्या आईला कवितांची आवड होती. आई कडून त्यांना कवितेचा वारसा मिळाला.
सुरेश भट यांनी लिहिलेल्या कवितांचे चोपडे ह्रुदयनाथ मंगेशकर यांना फुटपाथवरील एका दुकानात सापडले. त्यातील कविता वाचून सुरेश भटांना त्यांनी शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून अमर केले.
सुरेश भट यांच्या कविता, गझला ह्रुदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदी मान्यवर गायकांनी गाऊन अजरामर केल्या.
बालपणापासूनच सुरेश भट यांना परिस्थितीशी नेहमीच झगडत रहावे लागले. तरीही चिकाटी आणि जिद्द या जोरावर त्यांनी अथक मेहनत घेऊन गझलसम्राट अशी साहित्य क्षेत्रात आपली ओळख करून ठेवली.
मार्गदर्शक अशी गझलेची बाराखडी त्यांनी नवोदीत कवींना दिली. त्यातून पुढे अनेकजण गझल लेखनाकडे वळले.
गझलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सुरेश भट यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. मराठी गझलेतील त्यांचे योगदान हे बहुमुल्य आहे.
आयुष्यात आलेले अपयश, मानहानी, दुस्वास, गरिबी, कष्ट या साऱ्यांमधून आलेला जीवनातील विद्रोह त्यांच्या कविता, गझलांमध्ये उतरलेला दिसतो. त्यामुळे त्याच्या रचना आपल्याला जिवंत वाटतात.
सुरेश भट यांची त्यांच्या भारदस्त आवाजात कविता/गझला सादरीकरणाची एक विशिष्ट शैली होती. आणि त्यांचे सादरीकरण ऐकण्यासाठी अनेक लोक उत्सुक असत.
रुपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग, काफला, रसवंतीचा मुजरा अशा त्यांच्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या.
गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
रुपगंधा या त्यांच्या संग्रहाला राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.
रंग माझा वेगळा हा त्यांचा संग्रह विद्यापिठात एम.ए.ला अभ्यासक्रमात होता.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या पर्वात बौद्ध धर्माचा स्विकार केला.
साधे सोपे पण सटीक शब्द हे सुरेश भट यांच्या रचनांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या अनेक कविता, गझला मराठी साहित्यात सर्वमुखी आहेत…
जगत मी आलो असा, आकाश उजळले होते, आज गोकुळात रंग खेळतो हरी, केव्हातरी पहाटे, पहाटे पहाटे, वय निघून गेले, यार हो, अजून काही, रंग माझा वेगळा… अशा त्यांच्या अनेक दर्जेदार रचना रसिकमनावर आजही राज्य करीत आहेत.
सर्वसाधारणपणे आपल्या आयुष्यातले अनुभव, परिस्थिती, दुःख हे सारं कवीच्या कवितांमध्ये उतरलेलं दिसून येतं. सुरेश भट सुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या आयुष्यातील पदोपदी आलेल्या खडतर परिस्थितीचा विद्रोह त्यांच्या रचनांमध्ये परावर्तीत झाल्याचे दिसून येते.
“जगत मी आलो असा” या रचनेतही त्यांनी त्यांच्या जगण्याची कैफियत एकदम साध्या सोप्या भाषेत मांडली आहे. ही रचना वाचल्यावर आपल्याला त्यांच्या एकंदरीत आयुष्याची कल्पना येते…
जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा….
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
- सुरेश भट
(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो – विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/